
मुंबई - छोट्या पडद्यावरील करमणूक क्षेत्रात जोमाने वाटचाल करीत असलेल्या साम मराठी वाहिनीची नव्या रूपातील बातमीपत्रे सोमवारपासून (ता. 6 सप्टेंबर) सुरू होत आहेत. माहिती, ज्ञान आणि मनोरंजन यांचा खजिना या नव्या ढंगातील बातमीपत्रांतून उलगडणार आहे. सकाळी सातपासून सुरू होणारी ही सफर थेट रात्रीपर्यंत आपल्याला आवडीच्या विषयांची माहिती अपडेट करण्यासाठी मदत करणार आहे.
केवळ बातमी नव्हे; तर त्या पलीकडच्या घडामोडी मराठी प्रेक्षकांसमोर आणण्याचा साम मराठी वाहिनीने सातत्याने प्रयत्न केला आहे. या बातमीपत्रांची आखणी करीत असताना समाजाच्या सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. आम्हाला काय द्यायला आवडते, यापेक्षा लोकांना काय आवडते याचा विचार करून ही बातमीपत्रे आखण्यात आली आहेत. महिला, युवक वर्ग, राजकारणाची आवड असणारे लोक, संगीत-कला नाट्याची आवड जपणारे, बॉलिवूडचा विषय जवळिकीने पाहणारे, लाइफस्टाइलचा वेध घेत स्वतःची लाइफस्टाइल ठरविणारे अशा सर्वांनाच या बातमीपत्रांमधून आपल्याला हवे ते मिळेल.
माणसाची उत्सवप्रियता लक्षात घेऊन विविध सण-उत्सवांच्या काळात साम मराठी वाहिनीतर्फे विशेष बातमीपत्रे सादर केली जातील. गणेशोत्सवानिमित्त पूर्वतयारी व प्रत्यक्ष उत्सवाची लगबग यावर सकाळी पावणेनऊ व सकाळी पावणेदहा या वेळात पंधरा मिनिटांचे आणि रात्री नऊ व अकरा वाजता अर्ध्या तासाची "बाप्पा मोरया' ही विशेष बातमीपत्रे असतील. त्यात मुंबई, पुण्यासह राज्यभरातील वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिरे आणि मंडळे, तिथल्या दैनंदिन घडामोडी यांचा समावेश असेल.
केवळ काय घडले ते न दाखवता नागरिकांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. त्यासाठी दर मंगळवारी व गुरुवारी दुपारी पावणेतीन ते साडेतीन या वेळात "प्रश्नचिन्ह' या कार्यक्रमात एक विषय निवडून त्यावर प्रेक्षकांना आपल्या शंका, प्रश्न विचारण्याची संधी देण्यात येणार आहे. हे नवे बदल खास प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन करण्यात आले आहेत.
अशी असतील नवी बातमीपत्रेसकाळी 7 - "सकाळ' (अर्धा तास) प्रामुख्याने रात्रीच्या घटना वा आदल्या दिवशीच्या महत्त्वाच्या घटना आणि अपडेट
सकाळी 8 - "गुड न्यूज' (पंधरा मिनिटे) विधायक आणि विविध समाजघटकांना प्रेरणा देणाऱ्या बातम्या. त्याशिवाय रोजच्या घडामोडींतील एखादा सकारात्मक अँगल
सकाळी 9 - "आज' (पंधरा मिनिटे) दिवसभरात होऊ घातलेल्या घटनांची माहिती व अपडेट
सकाळी 11 - "साम न्यूज' (अर्धा तास) सकाळपासूनचे अपडेट, दिवसभरात काय, मनोरंजनाचे विश्व आणि ठळक घडामोडी
दुपारी 1 - "पैसा वसूल' (अर्धा तास) मनोरंजन विश्वातल्या घडामोडी, हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हॉलिवूडचाही आढावा
दुपारी 2.30- "ऐकलं का?' (पंधरा मिनिटे) महिलांना केंद्रस्थानी ठेवून आखलेले बातमीपत्र, "कानगोष्टी' हे गॉसिप सदर
सायं. 6.30 -"सामराज्य' (अर्धा तास) महाराष्ट्रकेंद्रित घडामोडींना प्राधान्य, रोज सर्व अंगांचा विचार करून केलेली एक "बिग स्टोरी'
रात्री 10- "शहरनामा' (अर्धा तास) मुंबई, पुण्यासह राज्यातल्या मोठ्या शहरांतील पायाभूत सुविधा, नवे प्रकल्प, जीवनशैली यांचा आढावा
रात्री 12 - "टेक्स्ट हेडलाइन्स' (अडीच मिनिटे) दिवसभरातल्या ठळक घडामोडींची माहिती
याशिवाय आणखी काहीकाही सांगायचंय : एखाद्या विषयावर लोकांना काय वाटते, यावर खास कार्यक्रम
डे वुईथ (रविवारी) : विविध क्षेत्रांतल्या सेलिब्रिटींच्या मुलाखती, त्यांचा दिवसभराचा दिनक्रम
व्हॉट्स युवर राशी : दर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता - राशी भविष्याचा वेध
फिल्मी रविवार (अर्धा तास) : हिंदी, मराठी चित्रपटांतील घडामोडींचा आढावा.