नवी दिल्ली - लहान मुलांना चांगले व संस्कारित शिक्षण देणे, ही राष्ट्राची दीर्घकाळाची गुंतवणूक असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर "हे विश्वचि माझे घर' ही शिकवण लहान वयातच बिंबवावी व त्यांचे आकाश व्यापक करावे, असे आवाहन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज केले.
शिक्षक दिनानिमित्त देशातील 374 आदर्श शिक्षकांना येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, या वर्षी राज्यातील 28 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात 16 शिक्षिकांचाही समावेश आहे.
राष्ट्रपतींनी या वेळी बोलताना शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच वैश्विक जाणिवा समृद्ध करण्याच्या कालसुसंगत शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यावर भर दिला. मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल, राज्यमंत्री पुरंदरेश्वरी, देवीसिंह शेखावत आदी उपस्थित होते. दरम्यान, या शिक्षकांनी काल (ता. 4) पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना क्रूरपणे शिक्षा करण्याबाबत नापसंती व्यक्त केली. शिक्षणाच्या अधिकारात अशा शिक्षेला थारा नाही, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
पुरस्कारप्राप्त शिक्षकपुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये अंधेरी उर्दू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सय्यद नकहत फातिमा जलील अहमद, नागपूरच्या भगवती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिंधू सेलूकर, पुण्याच्या भावे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गायकवाड आणि शिवाजी मराठा विद्यालयाच्या प्रमिला गायकवाड, रुईया मूक-बधिर विद्यालयाच्या प्राचार्य नीलाक्षी क्षीरसागर, नागपूरच्या सिंधी हायस्कूलचे डॉ. शशिकांत शर्मा व आजनगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश इखार, मुलुंडच्या लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्याराणी कर्णिक, नाशिकच्या खिर्डी शाळेचे अंबादास सरोदे, सातारा जिल्ह्यातील वाघोलीचे साहेबराव होळ, नगरच्या केंद्रीय विद्यालयाचे नंदकुमार देशपांडे, औरंगाबादच्या न्यू हायस्कूलच्या शोभाताई कर्डेल आदींचा समावेश आहे.
राज्यातील अन्य विजेते शिक्षक असे (कंसात गावाचे नाव) - रामचंद्र दौंडकर (शिरूर), श्वेता आंबेरकर (ठाणे), कल्पना लांडगे (वर्धा), भगवान पाटील (यवतमाळ), सीमा दाते (नागेवाडी, सातारा), शशिकांत ढोमणे (वाशिंबा, अकोला), हेमलता शिंदे (गुडमुडासिंधी, कोल्हापूर), गीता नलावडे (गोरेगाव), विजय काकडे (पानोली, नगर), ज्ञानदेव पवार (सोलापूर), बंकटलाल गट्टाणी (पळगाव, हिंगोली), सुमन पाटील (नरवाळ, धुळे), सुमित्रा वट्टमवार (उदगीर), जयराम श्रीदगडे (सोलापूर), नारायण पाटील (घाटकोपर), शिवाजी कांबळे (वाघी, नांदेड), वर्षा सोनवणे (सिन्नर, नाशिक).
-------

नवी दिल्ली - शिक्षक दिनानिमित्त रविवारी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना सिन्नर (नाशिक) येथील वर्षा सोनवणे. खिर्डी (ता. नांदगाव) येथील अंबादास सरोदे. शेजारी मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल.
------

नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना नरव्हाळ (ता. धुळे) येथील सुमन पाटील. शेजारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल व राज्यमंत्री पुरंदरेश्वरी.