Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

परदेशी हातातून साकारली गणेशमूर्ती (फोटो फिचर)
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 08:32 PM (IST)

पुणे - शाडूच्या गोळे पाहता पाहता आकार घेत होते. आधी बैठक. त्यानंतर "तुंदील तनू' आणि मग "वक्रतुंड'. मूर्ती आकार घेत असतानाच "त्या' चेहऱ्यांवरही हसू उमटत होते. अवघ्या दोन तासांत छान, सुबकशी बैठी गणेशमूर्ती साकारली गेली आणि एकेक "ग्रुप' आनंदाने खिदळायला लागला. आज (सोमवार) हा सारा माहौल होता गोखले नगरातील एका लहानशा सभागृहात आणि "मूर्तीकार' होते सॅम...मेगन...मॅथी...जस्टीन...आणि असे एकूण २६ अमेरिकन विद्यार्थी-विद्यार्थीनी !

वैज्ञानिक विचारसरणी व कौशल्यवृद्धीसाठी स्थापन झालेल्या "शास्त्रवाहिनी' संस्थेतर्फे हा उपक्रम घेण्यात आला. असोसिएटेड कॉलेजेस्‌ ऑफ मीडवेस्टच्या कल्चर, ट्रॅडिशन्स्‌ अँड ग्लोबलायजेशन्‌च्या उपक्रमांतून पुण्यात सहा महिन्यांसाठी आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हौसेने यामध्ये भाग घेतला. इंडॉलॉजीचा अभ्यास आणि "यूथ एक्‍स्चेंज'च्या मार्फत हे विद्यार्थी-विद्यार्थिनी पुण्यात शिकत आहेत.

मूर्ती बनविण्यापूर्वी या विद्यार्थी गटाला श्री गणेशाचे महत्व आणि त्याचे भारतीय संस्कृतीतील स्थान समजावून सांगण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मूर्ती बनवून दाखविण्यात आली. या प्रात्यक्षिकानंतर विद्यार्थ्यांनी कामाला सुरूवात केली. दोन तासांच्या कारागिरीतून प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातून सुबकशी गणेशमूर्ती साकारली गेली.

विशेष म्हणजे या गटाने आज निर्मिती केलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहे. "शास्त्रवाहिनी'च्या विश्‍वस्त सौ. सुनीता खरे यांनी विविध प्रयोगांद्वारे या मूर्तींची प्रमाणे ठरविली आहेत, ज्यामुळे १० वर्षापासून पुढील वयाच्या कोणत्याही व्यक्तीस अतिशय प्रमाणबद्ध मूर्ती तयार करता येते. "शास्त्रवाहिनी'चे प्रमुख माधव खरे, सौ. अंजू भागवत यांनी या उपक्रमाचे संचलन केले. सिंबायोसिस, न्यू इंडिया, सिटी प्राइड, जयहिंद स्कूल पिंपरी व शास्त्रवाहिनीच्या चार केंद्रांवर मिळून यंदा सहाशे विद्यार्थ्यांनी पर्यावरण-पूरक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.

मूर्ती साकारली कशी?
त्यासाठी मातीचे सारख्या आकाराचे आठ गोळे तयार केले. यातील २.५ भागातून पाय, दीड भाग छाती व पोट, एका भागातून चार हात, दीड भागातून डोके, कान व सोंड तर एक भाग मुकुटासाठी वापरला. उरलेल्या एका गोळ्यामधून दागिने, उपरणे, उंदीर, मोदक इ. वस्तू तयार केल्या.
 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रतिक्रिया
On 9/6/2010 11:01 PM amol said:
खूप सुंदर मूर्ती बनवल्या अमेरिकन विधार्थ्यानी.कलेचा प्रसार व्हावा हि चांगली घटना आहे. अभिनंदन .
On 9/6/2010 10:33 PM aparna, hyderabad said:
भारतीय संस्कृती संपूर्ण जगाला भुरळ पाडत आहे, अभिमान आहे मला भारतीय असल्याचा.
On 9/6/2010 10:03 PM jay said:
एक दिवस हेच अमेरिकन आपल्या कारागीरान पेक्षाही सुंदर अशा गणेश मूर्ती बनवून भारतात विकतील. त्यांचे धाडस, एकाग्रता आणि कल्पकता याला जोड नाही.
On 9/6/2010 8:55 PM PAM said:
मिरवणुकीत दारू पिऊन नाचणार्यांना दाखवा हे


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: