पाटणा - लखीसराय जिल्ह्यात माओवाद्यांबरोबरच्या चकमकीदरम्यान अपहरण केलेल्या तीन पोलिसांनी अखेर सुटका झाली. आज (सोमवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांची सुटका झाल्याच्या वृत्ताला बिहार पोलिसांनीदेखील दुजोरा दिला. सुटका झालेले तीनही पोलिस सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
अभय यादव, एहसान खान, रुपेश कुमार या तीन पोलिसांची सुटका करण्यात आली आहे. हे तिघेही लखीसराय शहरात पोचले आहेत. त्यांच्या प्राथमिक उपचार सुरू असून, त्यानंतर ते पाटणा येथे रवाना होतील. मुख्यमंत्री नितीशकुमार यांची ते भेट घेणार आहेत. सरकार आणि नक्षलवादी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर अपहृत पोलिसांना सोडण्यात आल्याची चर्चा आहे.
लखीसराय जिल्ह्यात मोहिमेवर असलेल्या सात पोलिसांची माओवाद्यांनी मागील रविवारी हत्या केली होती आणि दोन अधिकाऱ्यांसह चार पोलिसांचे अपहरण केले होते. त्यात बिहार मिलिटरी पोलिसचे अधिकारी अभय यादव, एहसान खान, रुपेश कुमार, लुकास टेटे यांचा समावेश होता. अपहृत पोलिसांच्या बदल्यात राज्यात विविध कारागृहांमध्ये असलेल्या आठ माओवाद्यांची एक सप्टेंबरपर्यंत सुटका करण्याची मागणी माओवाद्यांचा म्होरक्या अविनाशने केली होती. दरम्यान हवालदार टेटे यांची हत्या त्याने केली होती. त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांच्या सुटकेसाठीची शोधमोहीम तीव्र करण्यात आली होती.
माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीची बातमी वाचा