अणुशास्त्रज्ञ होमी एन. सेठना यांचे निधन
मुंबई - देशाने केलेल्या पहिल्या अणुचाचणीचे मार्गदर्शक आणि अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होमी नसरवानजी सेठना यांचे काल रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मलबार हिल येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. सेठना यांच्या मागे एक मुलगा आणि कन्या आहे. डुंगरवाडी येथील अग्यारीत उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
रसायनशास्त्रातील अभियंता आणि अणुशास्त्रज्ञ असलेल्या सेठना यांच्यावर 1959साली ट्रॉंबे येथे प्लुटोनिअम आधारित पहिली अणुभट्टी उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तातडीने निर्णय घेणारे आणि अत्यंत कार्यक्षम अभियंता अशी त्यांची ओळख होती. राजस्थानातील पोखरण येथे 18 मे 1974 रोजी देशाने केलेल्या पहिल्या शांततापूर्ण अणुस्फोटासाठी त्यांनीच मार्गदर्शन केले होते. "स्माईलिंग बुद्धा' या नावाने ही मोहिम राबवण्यात आली होती. त्यानंतर 1967मध्ये सेठना यांच्या मार्गदर्शनाखालीच बिहारमधील जदूगुडा येथे युरेनियम आधारित अणुभट्टी उभारण्यात आली. याशिवाय 1956ते 58 या कालावधीत कॅनडाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या 40 मेगावॉट क्षमतेच्या अणुभट्टीचे (सीरस) ते प्रकल्प व्यवस्थापक होते.
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या "पद्मविभूषण' या नागरी पुरस्काराने होमी सेठना यांना सन्मानित करण्यात आले होते.
ट्रॉंबेमधील अणुभट्टीच्या कामासाठी मुंबईत येण्यापूर्वी ते केरळमधील इंडियन रेअर अर्थचे संचालक होते. अणुउर्जा आयोगाच्या अध्यक्षपदावरून सेठना 1984 मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर 1889 ते 2000 या कालावधीत सेठना हे टाटा पॉवर कंपनीचे अध्यक्ष होते. तसेच टाटा सन्स, बॉंबे डाईंग आणि अन्य काही कंपन्यांच्या संचालक मंडळात होते.
Follow
Us on
Twitter