औषधांची नशा, करी जीवनाची दुर्दशा
-
Monday, September 06, 2010 AT 12:15 AM (IST)
नितीन चव्हाण - सकाळ वृत्तसेवा
मुंबई - कुणाला दारूचा पेग रिचविल्याशिवाय "झोप' येत नाही, तर कुणाला सिगारटेचा एक झुरका; तर कुणाला तंबाखू दाढेत ठेवल्याबिगर "किक' बसत नाही. गांजा, चरस, अफू, मॉर्फिन, फ्रेंच पॉलिश... नादखुळेपणाची अशी अनेक व्यसने आहेत. ही यादी अजून लांबविता येईल. औषधांमार्फत केले जाणारे "नशापाणी' हा या व्यसनांतील आणखी एक प्रकार आहे. नशेच्या झोकात "हर फिक्र को मैं धुए मे उडाता चला गया...' असे म्हटले तरी आयुष्यच संपवून टाकणारे हे व्यसन आहे. गेल्या काही वर्षांत हे व्यसन समाजात मोठ्या प्रमाणात वाढत असून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे.
ज्यांना बारमध्ये जाऊन महागडी इंग्लिश दारू ढोसणे परवडत नाही ते "गावठी' किंवा "देशी'च्या वाटेला लागतात, असे म्हणतात. या दोन्ही वर्गांतील दारू पिणारे अथवा कोणत्याही नशेचे एकदा पक्के "नशाबाज' झाले, की या पारंपरिक नशा कमी वाटायला लागतात. मग शोध सुरू होतो अधिक कडक आणि दमदार नशेतून "धुंदी' मिळविण्याचा. गेल्या काही वर्षांमध्ये खोकल्याच्या, झोपेच्या आणि वेदनाशामक औषधांतून नशा मिळविण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे.
औषधांमध्ये "कोडीन' हा घटक असलेले कोणतेही "कफ सिरप' नशा आणते. त्यामध्ये फॅन्सीडिल, मेटसलिंटस कोडीन, ग्लायकोडीन, कोरॅक्स, व्हेनड्रिल या कफ सिरपसह झोपेसाठी घेतल्या जाणाऱ्या एटीव्हॅन, रेस्टील, एव्हील या गोळ्याही नशा आणतात. डेक्सट्रॉप्रॉपॉझ्कीफेन, पेन्टाजोसीन, ब्रुफेनॉफिन, मॉरफीन सल्फेट, ट्रमाडॉल हायड्रोक्लोराईड, ब्युट्रॉफॅनोल या वेदनाशामक (पेनकिलर) औषधांचा; तसेच ऍम्फिटॅमिन या स्मरणशक्ती वाढविणाऱ्या गोळीचा नशेसाठी वापर केला जातो, अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातली तज्ज्ञांनी दिली. डॉक्टरांच्या "प्रिस्क्रिप्शन्स'शिवाय केमिस्टकडे कफटोन, डीकॉलबेनाड्रील, ग्लायकोडीन, झीट, क्लोरोफिनामाईन, कोरॅक्स यासह वर उल्लेख केलेली काही कफसिरप, गोळ्या मिळत असल्याच्या वृत्ताला तज्ज्ञांनी दुजोरा दिला आहे.
दुकानांत फरक काय?
मोठ्यांबरोबरच अल्पवयीन मुलेही या नशेच्या मायाजालात ओढली जात आहेत. सिगारेट, मावा, गुटख्यापासून सुरू झालेली नशा दारूकडेही आपसूकच वळते. मात्र बऱ्याचदा लहान मुलांना वाईन शॉपमधून "अल्कोहोल' दिले जात नाही. त्यामुळे औषधांतून नशा मिळविण्याचा एक पर्याय त्यांच्याकडे असल्याचे मत रहेजा रुग्णालयाचे न्युरॉलॉजिस्ट रमेश पाटणकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. डॉक्टरांच्या "प्रिस्क्रिप्शन्स'शिवाय औषधे देऊ नयेत असा नियम असतानाही मेंदूला गुंगी येणारी औषधे केमिस्टकडे सहज मिळतात. आपल्याकडील केमिस्ट आणि किरकोळ सामान खरेदी करण्याच्या दुकानात आता कोणताही फरक राहिलेला नाही, अशी खंत डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केली.
नशा म्हणजे सवयीचा गुलाम
माणूस एकदा या औषधातून नशा मिळविण्याच्या सवयीचा गुलाम झाला की नशा टाळणे कठीण असते. हृदय, मेंदू, फुफ्फुसे, किडनी, लिव्हरवर या नशेचा गंभीर परिणाम होतो. ब्रेन हॅमरेज, फिट येणे, श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम दिसून येतो. नशेचे प्रमाण वाढू लागल्यानंतर चेतनाशक्ती कमी कमी होत जाते. नैराश्य येणे, चिडचिडेपणा वाढणे, हात-पाय थरथरणे, एकलकोंडेपणाचे प्रकार वाढीस लागतात. नशा करण्यासाठी पैसे नसल्यास कोणतेही कृत्य करण्यास व्यक्ती तयार होते. या नशेचा शेवट माणसाच्या मृत्यूत होणे अटळ असल्याचा धोका डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केला.