राजारामबापू सहकारी बॅंक राज्यभरात विस्तार करणार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:00 AM (IST)
पुणे - राजारामबापू सहकारी बॅंकेला रिझर्व्ह बॅंकेने संपूर्ण राज्याचे कार्यक्षेत्र मंजूर केले आहे. त्यामुळे बॅंकेला राज्यभरात शाखाविस्तार करता येणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष शामराव पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, 'राजारामबापू बॅंकेने 600 कोटी रुपयांच्या ठेवी मिळविल्या असून, 353 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. एनपीएचे प्रमाण शून्य टक्के असून, 952 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला आहे. मार्च 2011 अखेर एकूण व्यवसाय एक हजार कोटी रुपयांचा करण्याचे बॅंकेचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने बॅंकेने ठोस पावले उचलली आहेत.''
बॅंकेच्या 32 शाखा कोअर बॅंकिंग सुविधेने जोडल्या गेल्या आहेत. लवकरच सर्व मोठ्या शाखांमध्ये एटीएम सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल. एक सप्टेंबरपासून ठेवींच्या दरात वाढ केली असून, एक ते तीन वर्षांपर्यंत आठ टक्के, तर त्यापुढील मुदतीसाठी सव्वा आठ टक्के व्याजदर असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक व्याज दिले जात आहे. कर्जावरील व्याजदर तुलनेने कमी असल्याने व्यवसायात वाढ होत आहे, असे पत्रकात नमूद केले आहे. बॅंकेने कर्मचारी वैद्यकीय निधी निर्माण केला असून, गंभीर स्वरूपाच्या आजारासाठी कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक साह्य केले जाते, असे पाटील यांनी सांगितले.