Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पनवेलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा छळ
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:14 AM (IST)
Tags: crime,   tribal student,   torcher,   panvel,   mumbai

नवीन पनवेल - पनवेलजवळील खांदा वसाहतीमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याच्या तक्रारी आज वसतिगृहातील मुलांनी पनवेलचे नायब तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्याकडे केली. मागील अनेक महिन्यांपासून येथील मुलांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. याविषयी वसतिगृहाचे गृहपाल विजय मोरे यांना माहीत असूनही त्यावर कारवाई करत नसल्याने येथील मुले गृहपालांच्या कार्यपद्धतीविरोधात संताप व्यक्त करीत आहेत. येथील व्यवस्थेबाबत कानाडोळा करणाऱ्या गृहपाल मोरे यांच्या बदलीची मागणी ही विद्यार्थी करीत आहेत.

खांदा वसाहतीत अनेक वर्षांपासून आदिवासी मुलांच्या राहण्याच्या सोयीसाठी शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहाची क्षमता 50 विद्यार्थ्यांची आहे. मात्र येथे 170 विद्यार्थी राहतात. मुंबई व नवी मुंबईत राहून आदिवासी विद्यार्थ्यांना इतर मुलांच्या तुलनेत शहरात शिक्षण घेता यावे यासाठी सरकारने ही वसतिगृह नवी मुंबईला लागून असलेल्या खांदा वसाहतीत सुरू केली. मात्र आजही गावातील मागासवर्गीयांप्रमाणे येथील आदिवासी मुलांची वसतिगृहात पिळवणूक होत आहे. या वसतिगृहात अभियांत्रिकी व महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी राहतात. येथे राहणाऱ्या मुलांना अनेक महिन्यांपासून आरोग्याच्या व जेवणाच्या समस्या भेडसावत आहेत. याविषयी या मुलांनी वसतिगृहाचे गृहपाल विजय मोरे यांच्याकडे तक्रारी केल्या, मात्र येथून मुलांना समस्या सुटण्यापेक्षा अरेरावीचा दंडुका मोरे यांच्याकडून मिळाला. आज येथील मुलांनी धाडस करून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना संर्पक केल्यानंतर पनवेलचे तहसीलदार डॉ. संदीप माने यांना येथील परिस्थिती समजली. माने यांनी नायब तहसीलदार चंद्रसेन पवार यांना या ठिकाणी निरीक्षणासाठी पाठवल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तहसीलदार पवार यांनी मुलांशी वसतिगृहाच्या व्यवस्थेविषयी विचारणा केली. या मुलांनी "आम्ही आदिवासी पण माणंसच आहोत' अशा शब्दात आपल्या व्यथा पवार यांच्यासमोर मांडल्या. गृहपाल मुलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात, जेवणात कुजक्‍या भाज्या, अळ्या असलेला भात व डाळीत पाणीच असते, अशा प्रकारच्या तक्रारी केल्या. या व्यतिरिक्त मासिक भत्ते मागीतले असता गृहपाल मोरे यांनी मुलांना मारहाण व दमदाटी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. "तुमच्यासमोर आम्ही केलेल्या तक्रारीमुळे आम्हाला पुन्हा मारहाण होऊ शकते, आम्हाला पोलिस संरक्षण द्या! अन्यथा गृहपाल मोरे यांची बदली करा' अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

यानंतर या वसतिगृहाच्या स्वयंपाक घराची पाहणी पवार यांनी केली. त्यावेळी भातामध्ये चक्क अळ्या सापडल्या, भाज्याही कुजलेल्या दिसल्या. खोल्यांच्या क्षमतेपेक्षा प्रत्येक खोलीमध्ये जास्त विद्यार्थी असल्याचे पवार यांना आढळले.

याप्रकरणी सारवासारव करणाऱ्या गृहपाल मोरे यांनी तहसीलदार पवार यांच्या येण्यापूर्वीच एक नोटीस संबंधित जेवणाच्या कंत्राटदाराला दिल्याचे सांगीतले. मात्र तहसीलदार पवार यांनी जेवणाच्या कंत्राटदाराच्या संस्थेचे व मालकाचे नाव विचारले असता तेही मोरे सांगू शकले नाही.

याबाबत गृहपाल मोरे म्हणाले, की आम्ही संबंधित जेवणाच्या कंत्राटदाराला 1200 रुपये प्रति मुलासाठी महिन्याला जेवणाचे शुल्क देतो. आजच्या प्रकारामुळे जेवण पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला निकृष्ट दर्जाच्या जेवणासाठी नोटीस बजावली आहे. सरकारचा निधी येण्यासाठीही कधी कधी उशीर होतो. येथे मुलांवर कोणत्याही प्रकारचा छळ होत नाही. आम्ही मुलांची काळजी घेतो. यामुळे मुले कधी चुकली तर आम्हाला त्यांना समज देण्यासाठी हात उगारावा लागतो.

याबाबत तहसीलदार पवार हे म्हणाले, की आजच्या घटनेबाबत आम्हाला वसतिगृहात स्वयंपाक घरातील जेवणात आळ्या दिसल्या. यापूर्वीही जून महिन्यात येथील वसतिगृहात तहसीलदार डॉ. माने यांच्या पथकाने येथील वसतिगृह प्रशासनाच्या व्यवस्थेविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले होते. त्यावेळी येथील मुलांच्या तक्रारी होत्या. आजही मुलांच्या अनेक तक्रारी आहेत. गृहपाल मोरे यांच्या मुलांच्या वर्तणुकीबाबतचा अहवाल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय व वसतिगृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणार आहोत. मुलांनी असुरक्षिततेची भावना गृहपालांविषयी बोलून दाखविल्यामुळे ही बाब गंभीर आहे. वेळ पडल्यास वसतिगृहात पोलिस संरक्षणही ठेवू ,असे पवार म्हणाले. याबाबत आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहांचे प्रकल्प अधिकारी एस. टी. भालेकर हे म्हणाले, मी सध्या एका बैठकीत आहे. ही बैठक संपल्यानंतर मी पनवेल येथील या वसतिगृहाला भेट देतो. मुलांशी चर्चा केल्यानंतर याप्रकरणी कायदेशीर कारवाई करीन.
प्रतिक्रिया
On 07-09-2010 18:28:22 HaribhauGavit said:
आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवितासी खेळणार्या गृहपाल श्री मोरे यांच्या कार्यापाधातीची सखोल चोकशी प्रकल्प अधिकारी श्री भालेराव यांनी करून श्री मोरे याना तात्काळ निलंबित कार्ये. कारण या सर्व भ्रष्टाचाराची जड स्वतः मोरे आहेत. असे मला वाटते.संगनमताशिवाय कंत्राटदार तरी कशाला निकृष्ट जेवण देईल! हा प्रकार म्हणजे निव्वळ मलई लाताण्याचाच आहे.एका विद्यार्थ्यामागे जर १२०० रु. असतात तर मग इतक्या निकृष्ट दर्जाचे विद्यार्थ्यांना जेवण का देता? हा प्रश्न कुलालाही पडणे साहजिकच आहे. मोरे यांना चौकशीकरूननिलंबीत करा


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: