पाटणा - बिहारमधील लखिसराय जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या तीन पोलिसांची आज सकाळी माओवाद्यांनी बिनशर्त सुटका केली. या पोलिसांच्या बदल्यात माओवाद्यांनी त्यांच्या आठ साथीदारांच्या सुटकेची अट घातली होती.
पोलिस फौजदार अभय यादव, रूपेश सिन्हा आणि हवालदार एहसान खान अशी सुटका झालेल्या तिघा पोलिसांची नावे आहेत. लखिसरायपासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या शृंगीऋषी धामजवळील सिमरातरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात नातेवाइकांच्या ताब्यात अपहृत पोलिसांना देण्यात आले. त्यांना या भागात माओवाद्यांनी आधीच बोलावले होते. पोलिसांच्या सुटकेनंतर माओवाद्यांचा प्रवक्ता अविनाश याने सांगितले, की अपहृत पोलिस जंगलात आतमध्ये होते. त्यांना डोंगराच्या पायथ्याशी आणण्यासाठी वेळ लागला.
आठ दिवसांपूर्वी लखिसराय जिल्ह्यात माओवादीविरोधी कारवाई करण्यासाठी पोलिस गेले होते. या वेळी झालेल्या चकमकीत सात पोलिस ठार झाले होते; तर चार पोलिसांचे माओवाद्यांनी अपहरण केले होते. यापैकी एक पोलिस हवालदार लुकास टेटे यांची माओवाद्यांनी नंतर हत्या केली. यानंतर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. यात माओवाद्यांनी पोलिसांना सोडून द्यावे, अशी सर्वच पक्षांनी एकमुखी मागणी केली.
राज्याचे पोलिस महासंचालक नीलमणी यांनी सांगितले, की माओवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत आतापर्यंत आठ जणांना पकडण्यात आले आहे. अपहृत पोलिसांच्या सुटकेनंतरही ही मोहीम अशीच सुरू राहील. दरम्यान, अपहृत पोलिसांपैकी अभय यादव यांना त्यांच्या खगडिया गावात, तर रूपेश कुमार आणि एहसान खान यांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले. तिघांच्याही घरात आनंदाचे वातावरण आहे.
'होय, मी मारले लुकासला'
अपहृत पोलिसांपैकी लुकास टेटे या हवालदाराची माओवाद्यांनी हत्या केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या तपासात पिंकू यादव आणि बहादूर यादव या दोन माओवादी म्होरक्यांना अटक करण्यात आली. यापैकी पिंकू याने लुकासवर गोळ्या झाडल्याचे मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये बिहार आणि झारखंडमधील माओवाद्यांचे संपर्क क्रमांक मिळाल्याचे समजते.
माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीची बातमी वाचा