गैरव्यवहार प्रकरणी लालूप्रसाद न्यायालयात हजर
पीटीआय
Tuesday, September 07, 2010 AT 12:00 AM (IST)
पाटणा - कोट्यवधी रुपयांच्या पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र सोमवारी विशेष "सीबीआय' न्यायालयात हजर राहिले.
बांका आणि भागलपूर येथील कोषागारातून 1990 ते 1997 या कालावधीत सुमारे 46 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका या दोघांसह आणखी काही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्याची सुनावणी न्या. विमलकुमार जैन यांच्यापुढे सुरू आहे. गेल्या महिन्यात 18 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्व आरोपींनी पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्या. जैन यांनी दिले होते. त्यानुसार या दोघा नेत्यांसह संयुक्त जनता दलाचे खासदार जगदीश शर्मा, राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार आर. के. राणा, माजी मंत्री विद्यासागर निषाद आणि काही निवृत्त "आयएएस' अधिकारी आज न्यायालयात उपस्थित होते. आपल्यावरील आरोप रद्द करण्यासाठी या सर्वांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आता त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.