Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बीआरटीसाठी अतिक्रमण हटवणे गरजेचे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 02:15 AM (IST)
Tags: brt,   pune
खडकवासला- नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड रस्ता) रस्त्यावरील बीआरटी बससेवा सारसबाग ते धायरी फाट्यापर्यंत होणार आहे. सुमारे पावणेसात किलोमीटरचा हा रस्ता आहे. कॉंक्रीटचे काम जवळपास पूर्ण झाले असून काही भागातील अतिक्रमणांमुळे सायकल ट्रॅक व पादचारी मार्गाचे काम राहिले आहे.

या रस्त्याच्या एका बाजूला 2.1 मीटरचा पादचारी मार्ग(यात झाडांचा समावेश आहे), दोन मीटरचा सायकल ट्रॅक, दीड ते अडीच मीटरची पार्किंग लेन, सर्व वाहनांसाठी 10 मीटरचा रस्ता, 1.25 मीटर ते 2.50 मीटरचा दुभाजक अशी परिस्थिती आहे. पानमळा, विठ्ठलवाडी, माणिकबाग, वडगाव खुर्द (धायरी फाटा) परिसरात पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक व पार्किंग लेनसाठीची जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. अशी माहिती "जेएनएनयूआरएम' चे प्रमुख विनय देशपांडे व कार्यकारी अभियंता विजय शिंदे यांनी दिली. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते विठ्ठलवाडी (मंदिर कमान) पर्यंतचा अडीच किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे तयार आहे. माणिकबाग पेट्रोल पंप ते त्रिमूर्ती हॉस्पिटल चौक (धायरी फाटा) परिसरातील काम पूर्ण झाले आहे. असेही शिंदे यांनी सांगितले.
धायरीपासून पान मळ्यापर्यंत येताना रस्त्याच्या बाजूला सुमारे ऐंशी अतिक्रमणे आहेत. यातील 40 निवासी घरे, 20 अनिवासी बांधकामे (दुकाने) व 20 टपऱ्या आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धायरीकडे जाण्याऱ्या रस्त्यावर सहवास हॉल परिसरातील अतिक्रमणे आहेत. त्याचा अद्याप सर्व्हे झालेला नसल्याचे टिळक रस्ता क्षेत्रीय अधिकारी अविनाश सकपाळ यांनी सांगितले.

विठ्ठलवाडी, माणिकबाग व धायरी फाटा परिसरातील खासगी मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केल्याचे भूमी जिंदगीचे उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. ते म्हणाले, ""या परिसरात तीन- चार प्रकरणे आहेत. त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. त्यांच्याकडून परवानगी मिळताच पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल.'' सध्या कॉंक्रीट रस्त्याचे काम अभिरुची पोलिस चौकीच्या पुढील बाजूपर्यंत म्हणजे त्रिमूर्ती चौकापर्यंत पूर्ण झाले आहे. धायरी फाटा चौकात उड्डाणपुलाचे काम होणार आहे. त्यामुळे तेथील रस्ता रुंदीकरण व कॉंक्रीटीकरणाचे काम झालेले नाही. भा. द. खेर चौकातीलही अन्य कामे रेंगाळलेली आहेत. तेथेही उड्डाणपूल प्रस्तावित आहे. ब्रम्हा गार्डन ते माणिकबाग पेट्रोल पंप या दरम्यान, तीन लेनचा रस्ता तयार आहे. परंतु तेथेही पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक व पार्किंग लेनसाठी जागा आवश्‍यक आहे. ब्रम्हा हॉटेल चौकात रस्ता मोठा आहे. मात्र अद्याप त्याचे काहीच नियोजन झालेले नाही. त्यामुळे बीआरटी सुरू करण्यापूर्वी पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक व पार्किंग लेनसाठी अतिक्रमणे काढल्यानंतर बीआरटी सुरू करा, अशी नागरिकांची मागणी आहे. बीआरटी धावणाऱ्या रस्त्याच्या परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस नगरसेवकांचे वर्चस्व आहे. उपमहापौर, शहर सुधारणा समितीचे उपाध्यक्ष, टिळक रस्ता प्रभाग समितीचे अध्यक्षपदही याच परिसरात आहे. त्यामुळे बीआरटी सुरू व्हावी, असे वाटत असेल तर या परिसरातील रस्ता रुंदीकरणाला अडचण येण्याचे कारण नाही.

अशी धावणार बीआरटी
बीआरटीच्या मार्गासाठी एकूण पावणेसात किलोमीटर अंतर आहे. रस्त्यावर वाहने धावण्यासाठीची रुंदी साडेदहा मीटर (एका बाजूला) आहे. त्यातील अवघे साडेतीन मीटर अंतर बीआरटीसाठी आहे. उर्वरित सात मीटर व पार्किंग लेन चे दीड मीटर अंतर गृहीत धरून साडेआठ मीटर अंतर इतर वाहनांसाठी राहणार आहे.
प्रतिक्रिया
On 9/7/2010 11:19 AM Sunil said:
सिहागड रस्त्याच्या कडेला भाजीवाले , पार्किंग अशी अतिक्रमणे आहेत. फक्त अतिक्रमणे जरी हटवली तरी रस्ता इतका मोकळा होईल कि BRT ची गरजच राहणार नाही. कल्पना करा कि BRT झाली आहे आणि अतिक्रमणे सुद्धा आहेत तर उरलेल्या जागेतून बाकीची वाहने कशी जातील. थोडक्यात BRT जर राबवायची असेल तर भविष्यात रस्त्याच्या कडेला अतिक्रमणे होणार नाहीत ह्याची जबाबदारी पण घ्या.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: