पुणे - ""मुलांनी पोलिस दलात दाखल व्हावे, यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे,'' अशी अपेक्षा पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.
पुणे शहर पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने, प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम यश संपादन करणाऱ्या मराठी माध्यमाच्या दीडशे विद्यार्थ्यांना बोरवणकर यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. त्या वेळी त्या बोलत होत्या. सहआयुक्त अशोक धिवरे, न्यासाचे उपाध्यक्ष राजीव साबडे, विश्वस्त राहुल सोलापूरकर, डॉ. मिलिंद भोई, चांदमल परमार, इर्शाद जाफर आदी उपस्थित होते.
""पोलिस दलात येऊ इच्छिणाऱ्या मुलीला केवळ ती मुलगी आहे म्हणून भरती होण्यापासून रोखू नये,'' असेही मत बोरवणकर यांनी व्यक्त केले.
विघ्नहर्ता न्यासातर्फे चार वर्षांपासून विद्यार्थी शैक्षणिक पालकत्व योजनेंतर्गत, घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही घवघवीत यश मिळविणाऱ्या इयत्ता आठवी ते दहावीच्या गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. या वेळी आठवीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले; तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वह्यांचे वाटप करण्यात आले. साबडे यांनी प्रास्ताविक केले. पोलिस उपायुक्त ज्ञानेश्वर फडतरे यांनी आभार मानले. डॉ. भोई यांनी सूत्रसंचालन केले.