जोधपूरमध्ये डॉक्टरांचा संप; ३८ जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था
Tuesday, September 07, 2010 AT 01:24 PM (IST)
जोधपूर - राजस्थानमधील जोधपूर, जयपूर, अजमेर, उदयपूर, कोटा व बिकानेर शहरांमधील सरकारी रुग्णांलयातील डॉक्टर संपावर असल्यामुळे उपचार न मिळाल्याने आतापर्यंत (मंगळवार) ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार (ता. ४) रात्रीपासून डॉक्टर संपावर गेले आहेत.
जयपूरमधील एसएमएस रुग्णालयातील २२ नागरिकांचा तर जोधपूरमध्ये ७ लहान मुलांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एका गर्भवती महिलेचाही मृत्यू झाला आहे.
शनिवारी रात्री एमडीएम रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयावर हल्ला करून सहा डॉक्टरांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले होते, मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
डॉक्टर संपावर असल्याने सरकारी रुग्णालयांतून रुग्ण उपचारांविना घरी परतत आहेत. काही रुग्ण रुग्णालयाच्या आवारामध्येच बसून उपचाराची वाट पाहत आहेत.