जेठवा हत्येप्रकरणी खासदाराच्या भाच्याला अटक
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 01:38 PM (IST)
अहमदाबाद - खाणमाफियांविरुद्ध लढणारे आणि गीर अभयारण्याच्या सिंहांच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी भाजपचे खासदार दिनूभाई सोलंकी यांचा भाचा शिवा सोलंकी यांना आज (मंगळवार) अटक केली.
शिवाला राजकोट येथून अटक करण्यात आली. तो मुंबईला निघाला होता, असे गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी मोहन झा यांनी सांगितले.
उच्च न्यायालयासमोरील एस. जी. हायवेवर 20 जुलै रोजी रिव्हॉल्व्हरमधून चार गोळ्या झाडून जेठवा यांची हत्या केली गेली होती. रात्री पावणेनऊच्या सुमारास आपल्या वकिलांशी बोलत जेठवा मारुती जिप्सी गाडीत बसत असताना पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी तीन फुटांवरून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. जेठवा यांनी त्याही परिस्थितीत जोरदार प्रतिकार करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी गोळ्या झाडणे सुरूच ठेवल्याने जेठवा खाली कोसळले. पळून जाताना एका हल्लेखोराने आपली रिव्हॉल्व्हर, तसेच मोटारसायकल तेथेच सोडून दिली. दोन जिवंत काडतुसे आणि हल्लेखोरांची एक चप्पलही पोलिसांना सापडली. त्याआधारे श्वानपथकाने तपासाचा प्रयत्न केला. जेठवा यांनी गीर अभयारण्यातील सिंहांची वाढती शिकार रोखण्यासाठी मोहीम उघडली होती. गीर अभयारण्यात बेकायदेशीरपणे 31 खाणीही सुरू आहेत. या खाणी चालवणारे बहुतांश राजकारणीच आहेत. बेकायदेशीर खाणी चालवतानाच कोट्यवधी रुपयांचा महसूलही ते चुकवत आहेत. या खाणमाफियांविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यात भाजपचे जुनागढचे खासदार दिनूभाई सोलंकी यांचाही समावेश होता. हत्येमागे जुनागढचे भाजपचे खासदार दिनूभाई सोलंकी यांचा हात असल्याचा आरोप जेठवा यांच्या वडिलांनी केला होता.