जळगाव जिल्ह्यातील बड्या ग्रामपंचायती सत्तांतराच्या लाटेवर
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:15 AM (IST)
जळगाव - जिल्ह्यातील 565 ग्रामपंचायतींची मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडली. त्यात अनेक बड्या ग्रामपंचायती परिवर्तनाच्या लाटेवर स्वार असल्याचे दिसून आले आहे. तथापि, एकंदर निवडणुकीचा निकाल पाहता बहुतांश गावांमध्ये तरुणांना संधी मिळाल्याने सत्तेच्या चाव्या आता त्यांच्या हातात आल्या आहेत. अनेक ठिकाणी सत्तांतर झाले आहे. अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे, तर काही ठिकाणी पॅनल आले; पण पॅनलप्रमुख पराभूत झाले आहेत. पाचोरा तालुक्यात निंभोरी बुद्रुक येथे अतिक्रमण आणि रोगराईला पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध ग्रामस्थांचा संताप मतपेटीतून बाहेर आला आहे. येथे सत्ताधाऱ्यांचे पॅनल चारीमुंड्या चीत झाले आहे.
बोदवड तालुक्यात राष्ट्रपतींचे माहेर असलेल्या नाडगावमध्ये भाजपने कॉंग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली आहे, तर साळसिंगी, शेलवड येथेही भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत पॅनलचा पराभव केला आहे. मनूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता कायम राखली आहे, तर वरखेड येथे "राष्ट्रवादी'ने भाजपला सत्तेतून दूर केले आहे. बोदवड ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे.
जळगाव तालुक्यात भाजपने बहुतेक मोठ्या गावांमध्ये आपली सत्ता कायम राखल्याचा दावा केला आहे, तर तालुक्यातील चिंचोली आणि उमाळा या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यातून गेल्या आहेत. असोदा, भादली बुद्रुक, नांद्रा, कडगाव, म्हसावद, मन्यारखेडा, बोरनार, वडली, सावखेडा, दापोरा येथे भाजपने सत्ता कायम राखली आहे. नशिराबाद येथे सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे.
नशिराबाद येथे भाजपचे सरपंच पंकज महाजन यांचा गट अल्पमतात आला असून, श्री. महाजन यांच्या मातोश्री पराभूत झाल्या आहेत. ममुराबाद येथे सरपंच भरत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. असोदा येथे सरपंच विलास चौधरी यांच्या ग्रामविकास पॅनलने सत्ता कायम राखली आहे, तर म्हसावद येथे माजी सरपंच भूषण चिंचोरे यांच्या पॅनलला बहुमत मिळाले आहे. कानळदा येथे पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांचे वडील व पत्नी विजयी झाले आहेत. भादली बुद्रुक येथे पंचायत समितीच्या सभापती हेमलता नारखेडे यांचे पती सरपंच प्रकाश नारखेडे विजयी झाले आहेत.
भुसावळ तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या वरणगाव येथे भाजपने, तर साकेगावला "राष्ट्रवादी'ने सत्ता कायम राखली आहे. कुऱ्हे पानाचे येथे शिवसेना- भाजप युतीने सत्ता पटकावली आले आहे. कंडारीत सरपंच शिवराम मोरे पराभूत झाले असून, उपसरपंच दीपाली मगर पुनश्च विजयी झाल्या आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी जनतेने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
मुक्ताईनगर येथे भाजपच पुन्हा वरचढ ठरला आहे, तर अंतुर्लीत "राष्ट्रवादी'च्या विनोद तराळ यांच्या पॅनलला मतदारांनी धूळ चारली आहे. रावेर तालुक्यात 46 पैकी 24 ग्रामपंचायतींमध्ये भाजप, तर 12 ग्रामपंचायतींमध्ये "राष्ट्रवादी'ला सत्ता मिळाली आहे. विवरा बुद्रुक येथे "राष्ट्रवादी', ऐनपूरला कॉंग्रेस, निंबोलला "राष्ट्रवादी', तांदळवाडीत भाजप, तर पाडळे खुर्द येथे "मनसे'ने प्रवेश केला आहे. यावल तालुक्यातील डांभुर्णी, वनोली, राजुरी, अंजाळे या चार ग्रामपंचायतींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रवेश केला आहे.
जामनेर तालुक्यातील पहूर, पाळधी, तोंडापूर या ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस आघाडीची सत्ता आली आहे, तर नेरीदिगर, फत्तेपूर व पहूर-कसबेत भाजपला सत्ता मिळाली आहे. मात्र, वाकोद येथे उद्योगपती भवरलाल जैन यांचे नेतृत्व मानणाऱ्या महिला विकास आघाडीला पंधरापैकी केवळ आठ जागा मिळवून काठावर बहुमत मिळविता आले आहे.
भडगाव तालुक्यातील वाडे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, "राष्ट्रवादी', भाजप, कॉंग्रेस या पक्षांना सारखेच यश आल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. गिरडमध्ये "राष्ट्रवादी'ने शिवसेनेकडून सत्ता खेचून घेतली आहे. कोठलीत शिवसेना व कॉंग्रेस या एकत्रित आघाडीला यश मिळाले आहे. पांढरदमध्ये शिवसेनेने "राष्ट्रवादी'ला चीत करीत सत्ता प्रस्थापित केली आहे, तर वडजीत "राष्ट्रवादी'ने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथे सत्तांतर होऊन प्रा. हुकूमचंद जाधव यांच्या पॅनलची सरशी झाली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश जाधव यांची पत्नी सरपंच सागरबाई जाधव यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. बहादरपूर येथे माजी सरपंच गोकूळ चौधरी यांची पत्नी व पंचायत समितीच्या माजी सभापती सुनंदा चौधरी यांचे पॅनल पराभूत झाले आहे. तेथे सोमनाथ चौधरी यांच्या पॅनलने बहुमत मिळवीत सत्तांतर घडविले आहे. तामसवाडी येथे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या पॅनलने सत्ता कायम राखली आहे.
चोपडा तालुक्यातील दोंदवाडे व कुसुंबे येथे पॅनल विजयी, तर पॅनलप्रमुख पराभूत झाले आहेत. विटनेर येथे केवळ पॅनलप्रमुख विजयी व इतर सर्व पॅनल पराभूत झाले आहे. येथे सत्तांतर होऊन शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा इंदिराताई पाटील यांचे पॅनल पराभूत झाले आहे. मात्र, पॅनलप्रमुख भानुदास पाटील विजयी झाले आहेत. दोंदवाडे येथे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून, येथे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता प्राप्त केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. डी. पी. पाटील यांच्या पॅनलचाही खेडीभोकरीत धुव्वा उडाला आहे. तेथेही सत्तांतर झाले आहे. कुरवेल येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील यांच्या पॅनलने सत्तांतर घडवून आणले आहे, तर वढोदा येथेही सत्तांतर होऊन तिसऱ्या आघाडीचे पॅनल विजयी झाले आहे. हातेड येथे शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचे पुत्र पराभूत झाले आहेत.
अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मालोजीराव पाटील यांचे पॅनल आणि त्यांचे पुत्र व देखरेख संघाचे संचालक महेश पाटील पराभूत झाले आहेत. शिवाजी तापीराम पाटील यांनी त्यांची सत्ता उलथवली आहे. प्रगणे डांगरी येथे बाजार समितीचे संचालक कॉंग्रेसचे अनिल शिसोदे यांच्या पॅनलने सत्ता कायम राखली आहे. मांडळ येथे किरण जैन यांच्या पॅनलची सत्ता कायम राहिली आहे. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव झाला आहे. कळमसरे येथे मुरलीधर महाजन यांच्या पॅनलने सत्ता पटकावली आहे; तर निंभोऱ्यात शेतकी संघाचे अध्यक्ष सुरेश पिरन पाटील पराभूत झाले; परंतु त्यांच्या पॅनलने सत्ता कायम राखली आहे.
एरंडोल तालुक्यातील उत्राण गुजर हद्द येथे सत्तांतर होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेचा पराभव केला आहे. जळू येथेही कॉंग्रेसने शिवसेनेकडून सत्ता हिसकावली आहे, तर फरकांड्यातही कॉंग्रेसने भाजपकडून सत्ता हस्तगत केली आहे.
धरणगाव तालुक्यातील साळवा येथे पंचायत समितीचे माजी सभापती दीपक सोनवणे वत्सलाबाई सोनवणे यांच्या मातोश्री विजयी झाल्या आहेत. सरपंचपदाची जागा आरक्षित असल्याने श्रीमती सोनवणे याच सरपंच होणार आहेत. हिंगोणे बुद्रुक येथे पंचायत समितीचे माजी सभापती नवल बोरसे यांचे पॅनल विजयी झाले; परंतु त्यांच्या पत्नी सुरेखा बोरसे पराभूत झाल्या आहेत. पिंप्री खुर्द येथे भाजपचे नेते पी. सी. पाटील यांचे समर्थक वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरले आहेत. हिंगोणे खुर्द येथेही भाजपने सत्ता कायम राखली आहे.
पाचोरा तालुक्यात शिवसेनेने 40, "राष्ट्रवादी'ने 64, तर कॉंग्रेसने 25 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. तालुक्यात आमदार दिलीप वाघ यांच्या बांबरूड राणीचे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत पॅनलने अकरा जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले, तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटील यांच्या अंतुर्ली ग्रामपंचायतीवरही "राष्ट्रवादी'चा झेंडा फडकला आहे. तारखेडा येथे "राष्ट्रवादी'चे सतीश पाटील यांच्या पॅनलला धक्का बसला आहे. चिंचपुरे येथील "राष्ट्रवादी'चे पंचायत समितीचे सदस्य विजय पाटील यांच्या पॅनललाही पराभवाचा धक्का बसला आहे. निंभोरी ग्रामपंचायतीत पंधरा वर्षांपासून नेतृत्व करणाऱ्या रमेश पाटील यांना मतदारांनी नाकारले आहे. अंतुर्ली क्रमांक तीन येथे शिवसेनेच्या पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना पाटील यांचा प्रभाव कायम राहिला आहे. खडकदेवळा खुर्द येथील माजी सरपंच जयसिंग राजपूत यांचे नेतृत्व मतदारांनी नाकारले आहे, तर नांद्रा येथे "राष्ट्रवादी'चे तालुकाध्यक्ष नितीन तावडे यांना जबरदस्त धक्का देत शिवसेनाप्रणीत पॅनलने बहुमत प्राप्त केले आहे. शिंदाड येथे युवक कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ऍड. अभय पाटील यांनी जोरदार मुसंडी मारून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
जिल्ह्यातील एकूणच निवडणुकीचा निकाल पाहता मतदारांनी या वेळी तरुण मतदारांना अधिकाधिक संधी दिली आहे. यानिमित्ताने नव्या रक्ताला विकासाची संधी चालून आली आहे. तरुणांच्या विकासाच्या मुद्याला मतदारांनी हा दिलेला हा सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे. बहुतेक ठिकाणी मातब्बर आणि प्रस्थापित उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे.