जळगाव जिल्ह्यात संपाला ८० टक्के प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 03:20 PM (IST)
जळगाव - राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने आज पुकारलेल्या देशव्यापी संपात सुमारे ऐंशी टक्के प्रतिसाद मिळाला. काही संघटना सहभागी झाल्या नव्हत्या. वाढती महागाई, सरकारी व सार्वजनिक सेवांचे आणि उद्योगांचे खासगीकरण, कंत्राटीकरण, उदारीकरण रद्द करावे, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, रिक्तपदे त्वरित भरावे यासह विविध मागण्यासाठी आज संप पुकारण्यात आला होता.
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्ण सेवेवर काहीसा परिणाम झाला, रूग्णांच्या सेवेसाठी अस्थायी कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आल्याने ही सेवा फारसी प्रभावित झाली नाही. महागाईच्या विरोधात व एक तारखेला वेतन देण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चक्क जिवंत व्यक्तीची प्रेतयात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. विविध शासकीय कार्यालयात कर्मचारी नसल्याने अधिकाऱ्यांना स्वतःची कामे स्वतः करावी लागली. अनेक शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट होता.
जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा रुग्णालय कर्मचारी व नर्सेस संघटना यासह विविध संघटनांनी संपात सहभाग घेतला. सर्व संघटनांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.