Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आसोद्यातील विजयी उमेदवाराचे अपहरण
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:04 AM (IST)

जळगाव - आसोदा (ता. जळगाव) ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढविणाऱ्या चंदन बिऱ्हाडे या ग्रामविकास पॅनेलच्या विजयी उमेदवाराचे पोलिसाच्या मदतीने आज दुपारी अपहरण झाल्याने समजताच ग्रामस्थ व समर्थकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार तास ठिय्या आंदोलन केले. नाट्यमयरित्या घडामोडीनंतर उमेदवार परतला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात वेगवेगळे दोन गुन्हे नोंदविण्यात आले.

आसोदा ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात काट्याची लढत होती. मतदान शांततेत पार पडले. जळगाव शहरातील संत हरदासराम मंगल कार्यालयात आज मतमोजणी झाली. आसोद्यात ग्रामविकास पॅनलला सतरा पैकी 10 जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले. परिवर्तन पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले. सत्ता संघर्षात मतमोजणी केंद्रावरून "ग्रामविकास' विजयी उमेदवार चंदन अंकुश बिऱ्हाडे यांना परिवर्तन पॅनेलच्या समर्थकांनी जबरदस्तीने गाडीत बसविले. संबंधितांनी आपल्याला जामनेरकडे खासदार ईश्‍वरलाल जैन यांच्या बंगल्यावर घेऊन गेल्याचे चंदन बिऱ्हाडे यांनी सांगितले.

अशी घडली घटना
विजयाची घोषणा होताच दुपारी दोनच्या सुमारास ग्रामविकास पॅनेलच्या चंदन बिऱ्हाडे हे तुषार महाजन (ग्रामविकास पॅनेलचे कार्यकर्ते) यांच्या सोबत गर्दीतून बाहेर पडत होते. त्यावेळी परिवर्तन पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक प्रकाश पवार व मुंबई पोलिस दलातील रवींद्र देशमुख यांच्या सहकार्याने तुषार महाजन याला मारहाण केली. चंदन बिऱ्हाडे यास पांढऱ्या रंगाच्या बोलेरोतून बसवून अजिंठा चौफुली मार्गे जामनेर येथे घेऊन गेले. तेथे ईश्‍वरलाल जैन यांच्या (सुपारी बाग) बंगल्यावर चंदन बिऱ्हाडे यास सुनील बाळू पाटील, रवी देशमुख (पोलिस हवालदार), हेमंत पाटील, अनिल कोळी व वाहन चालक आदींनी "मामा, तुम्हाला काहीच त्रास होणार नाही, तुम्ही फक्त साथ द्या', असे सांगून डांबून ठेवले. याबाबतची माहिती मिळताच आसोद्यातील जमाव, ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. आमच्या उमेदवाराला समोर आणा, पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, हवालदार रवी देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, चंदन बिऱ्हाडे यांच्यासह कुटुंबीयांना पोलिस संरक्षण द्या आदी मागण्या केल्या.

पोलिस ठाण्यातील वातावरण पाहून अपहरण केलेल्या चंदन बिऱ्हाडे यांना घेऊन दुपारी सव्वातीनच्या सुमारास बोलेरो (एमएच 19,4501) जामनेरकडून जळगावात दाखल झाली. अजिंठा चौफुलीवर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे हवालदार सूरज पाटील यांनी चंदन बिऱ्हाडे यांना सोबत घेतले. सव्वाचारला बिऱ्हाडे यांना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले.

दरम्यान, ग्रामविकास पॅनेलचे कार्यकर्ता तुषार रमेश महाजन यांना पोलिसांनी मतमोजणीच्या ठिकाणी पकडून बेदम मारहाण केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चौकशीचा अर्ज देण्यात आला आहे. तक्रारदार महाजन यांना मारहाण ही गर्दीत ओळख न पटल्याने झाली असून, चौकशी करणार असल्याचे अप्पर अधीक्षक धनंजय कुळकर्णी यांनी "सकाळ'ला सांगितले.

पोलिसात गुन्हा दाखल
चंदन ऊर्फ चंद्रकांत अंकुश बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून हेमंत पाटील, सुनील पाटील, रवि देशमुख, अनिल कोळी, हरीश भोळे व बोलेरोचालक यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. उपनिरीक्षक व्ही. आर. शिंत्रे तपास करीत आहेत.
प्रतिक्रिया
On 9/7/2010 7:54 PM amol bhole said:
aropi var niymanusar kadak karvai karnyat yavi, police yani dilelya jababa nusar te ka konalahi marhan karu shaktat ka? agar olakh patli aso va naso.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: