Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मुंबई निर्देशांकाची त्रिशतकी मजल
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: sensex,   mumbai,   business

मुंबई - अमेरिकेच्या वाढत्या रोजगारीच्या आकडेवारीने मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कमालीचा उत्साह संचारला. जागतिक मंदी संपल्याचे द्योतक मानून भांडवली बाजारात आज बॅंक, पोलाद कंपन्यांच्या शेअरना जोरदार मागणी राहिली. तब्बल त्रिशतकी निर्देशांकवाढीमुळे मुंबई शेअर बाजाराने गेल्या अडीच वर्षातील (31 महिन्यांतील) उच्चांक गाठला. तसेच निफ्टीही 5500 पुढे गेला. दोन्ही निर्देशांकात पावणेदोन टक्‍क्‍यांची भर पडली.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात संमिश्र वातावरण राहिले. असे असले तरी मुंबई निर्देशांक 18 हजार अंशांवर होता. अमेरिकेत रोजगारवाढीची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर बाजारात आज सत्राच्या अगदी पाचच मिनिटात निर्देशांकात सुमारे दीडशे अंशांची भर पडली. बाजार त्याच वेळी 18 हजार 500 अंशांच्या पुढे गेला होता.

आजच्या मोठ्या निर्देशांक वाढीमुळे गेल्या 31 महिन्याचा उच्चांक गाठला गेला. बाजार या पातळीवर यापूर्वी फेब्रुवारी 2008 दरम्यान होता. दिवसअखेर सुमारे 338.62 अंशांच्या वाढीमुळे मुंबई निर्देशांक 18,560.05 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारात 97.55 अंशांची वाढ झाल्यामुळे निफ्टी 5576.95 वर बंद झाला.
पोलाद निर्देशांकात टाटा स्टील, हिंदाल्को, स्टर्लाईट, जिंदाल स्टील; बॅंक क्षेत्रात आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक, एचडीएफसी बॅंक यांच्या शेअरच्या खरेदीकडे गुंतवणूकदारांचा आज अधिक कल होता. याचबरोबर बांधकाम, तेल व वायू क्षेत्रातील शेअरनाही मागणी राहिली. अमेरिकेच्या आकडेवारीमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, टीसीएस, इन्फोसिस यांचेही शेअर आज चमकले. गेल्या अनेक सत्रातील सततच्या घसरणीमुळे एक हजाराखाली गेलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज तीन टक्के अधिक भाव मिळविला.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: