नेहरूंच्या मंत्रिमंडळाशी तुलना हास्यास्पद
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Tuesday, September 07, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळाची तुलना पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळाशी करणे हास्यास्पद आहे. पंतप्रधानांचे त्यांच्या सहकारी नेत्यांनी व मंत्र्यांनी ऐकले तरी झाले, अशा शब्दांत भाजपने आज टीका केली. त्यानंतर काही तासांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात "विलक्षण अशांत व स्फोटक काश्मिरात सुरक्षा दलांचे अधिकार कमी करू नयेत,' असे बजावले.
दरम्यान, सर्व गरिबांना मोफत धान्य देणे शक्य नाही, असे पंतप्रधानांचे वक्तव्य म्हणजे न्यायसंस्थेचा अवमान करणारे आहे. गोदामांमध्ये गहू सडला तरी चालेल. पण तो गरिबांना वाटणार नाही, हीच या सरकारची कार्यपद्धती आहे, अशी टीका भाजपने केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रविशंकर प्रसाद म्हणाले, की डॉ. सिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळाची तुलना जगातील कोणाशी करावी, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना पंतप्रधानपदी किती काळ ठेवायचे, याचा निर्णय कॉंग्रेस नेतृत्वाचा आहे. मंत्रिमंडळातील चिदंबरम किंवा कपिल सिब्बल आदी मंत्र्यांवर दिग्विजयसिंह व केशव राव यांच्यासारखे कॉंग्रेसचेच नेते टीका करतात, याचे विस्मरण डॉ. सिंग यांना झालेले दिसते. डॉ. सिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळाला सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वाचे आधी स्मरण करून द्यावे. आपण निवृत्त होणार नाही, असे सात वर्षे पंतप्रधानपदी राहूनही त्यांना वारंवार सांगावे लागते यातच सगळे काही आले, असाही टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासह विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज व अरुण जेटली यांनी आज सायंकाळी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना काश्मीरबाबत निवेदन दिले. काश्मिरात फुटीरतावाद्यांच्या दबावाखाली सुरक्षा दलांचे अधिकार कमी करण्याच्या सरकारच्या हालचाली घातक आहेत. फुटीरतावाद्यांना सीमेपलीकडून थेट मदत मिळत आहे. त्यांच्या मागणीला काय महत्त्व द्यायचे हे केंद्र सरकारने विवेकाने ठरवावे. सुरक्षा दलांचा विशेष अधिकाराचा हक्क फुटीरतावाद्यांच्या दबावाखाली सरकारने रद्द करू नये, असे त्यांनी निवेदनात बजावले आहे.
कॉंग्रेसची दशा आणि दिशा!
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान झाल्यावर सोनिया गांधी यांना पक्षाचे एक संस्थापक दादाभाई नौरोजी यांचे विस्मरण होणे, हे या पक्षाची सध्याची दिशा व दशा स्पष्ट करते, अशी टीका भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली. जावडेकर म्हणाले, की कॉंग्रेस नेत्यांचा पक्ष पंडित नेहरूंपासून सुरू होतो आणि राहुल गांधींजवळ संपतो. नेहरू-गांधी घराण्याच्या पलीकडेही विशाल कॉंग्रेस संस्कृती आहे. दादाभाईंनी स्वातंत्र्यासाठी देशात आणि लंडनमध्येही मोलाचे कार्य केले आहे, हे सध्याच्या कॉंग्रेसला माहिती नसणे यात त्या पक्षाची स्थिती स्पष्ट होते.