तिशीच्या हमीदचे मानसिक वय पंधराच
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:15 AM (IST)
लंडन - "मॅच फिक्सिंग' प्रकरणात सलामीचा फलंदाज यासीर हमीद याने पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आरोप केले असले तरी, एकदिवसीय सामन्यांसाठीचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असे वक्तव्य केले. तो म्हणाला, 'यासीर वयाने तिशीचा असला, तरी त्याचे मानसिक वय पंधराच आहे.''
यासीरच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आफ्रिदी म्हणाला, 'तो कशा पद्धतीचा माणूस आहे, हे सगळ्यांना चांगले ठाऊक आहे. त्याच्याकडून काय अपेक्षा धरायच्या आणि काय नाहीत, हे प्रत्येक जण चांगले जाणतो. तो विश्वास ठेवण्यासारखा आहे असे अजिबात वाटत नाही. ज्या व्यक्तीची माहिती नसतानाही, त्याच्याशी तो पाकिस्तानी क्रिकेटबद्दल बोलतो, यावरूनच तो किती भरवशाचा आहे, हे स्पष्ट होते.''
ब्रिटिश दैनिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने पाकिस्तानचा प्रत्येक क्रिकेटपटू फिक्सर असल्याचे वक्तव्य केले आहे; पण नंतर त्यानेच "आपण असे बोललोच नाही', असे सांगितले. आता तो मला दैनिकाकडून "ब्लॅकमेल' केल्याचे सांगतो. नेमके खरे काय? हे त्याचे त्यालाच माहीत. अर्थात, तो कुणाबरोबर बसला होता आणि कुठल्या परिस्थितीत त्याने हे वक्तव्य केले हे माहीत नाही, असेही आफ्रिदी म्हणाला.
या सगळ्या गदारोळात पाकिस्तानी क्रिकेटपटू पुन्हा मैदानात उतरले. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी 20 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आफ्रिदी म्हणाला, ""पराभवानंतर मी खेळाडूंना अजिबात वृत्तपत्र वाचू नका, असा सल्ला दिला आहे. मैदानावर खेळायला मिळाल्याने मनाला एक प्रकारची शांती मिळाली. कामगिरी चांगली झाली नसली, तरी आम्ही भविष्यात कामगिरीत निश्चित सुधारणा करून दाखवू. "मॅच फिक्सिंग'चे आरोप आता इतिहास झाला आहे आणि "आयसीसी'ची चौकशी चालू असेपर्यंत आम्ही कोणी त्याविषयी काहीच बोलणार नाही.