Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पुजारी टोळीचे पाच गुंड जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:25 AM (IST)
Tags: crime,   ravi pujari,   mumbai

मुंबई - वेगवेगळ्या कंपन्यांना कुशल कामगार पुरविणाऱ्या "लेबर सप्लायर्स सर्व्हिस'च्या नावाखाली बेरोजगार तरुणांना गुन्हेगारीकडे वळविण्याचा प्रयत्न कुख्यात डॉन रवी पुजारी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बिल्डर आणि सराफांची कार्यालये; तसेच दुकानांवर गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या रवी पुजारीच्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली. त्यातील चौघांना लेबर सप्लायर्स सर्व्हिसच्या नावाखाली पुजारी टोळीत भरती करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. या पाचही गुन्हेगारांवर "मोक्‍का'नुसार कारवाई होणार आहे.

पश्‍चिम उपनगरांत गेल्या काही दिवसांत रवी पुजारी टोळीच्या गुंडांनी उच्छाद मांडला होता. बिल्डर्स आणि सराफांच्या कार्यालयांवर गोळीबार करून त्यांच्यात दहशत निर्माण करायची, त्यातून खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न सुरू होता. अनेकदा शूटर बिल्डर अथवा सराफाच्या दुकानात एक चिठ्ठी सोडून जात. त्यावर रवी पुजारीचा मोबाईल क्रमांक नमूद करीत. या प्रकारांमुळे बिल्डर आणि सराफांत भीती पसरली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशेष पथक तयार केले. पथकाच्या तपासात पश्‍चिम उपनगरांत गोळीबार करणारे रवी पुजारी टोळीचे शूटर अहमदाबाद येथे वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काल (ता.5) रात्री अहमदाबाद येथे जाऊन हर्षद कानजी मारू (26), कन्नू ठाकूर (20), परेश नेपाळी ऊर्फ पी. डी. (26) आणि नरेंद्र सोनी ऊर्फ लाला (27) यांना अटक केली. त्यांच्या माहितीवरून या चौघांना रवी पुजारी टोळीत मूळचा अहमदाबादचा असलेल्या हर्कबहादूर ऊर्फ राजू भंडारी (30) याने भरती केल्याचे आढळले. सर्व प्रकारचे कुशल कामगार पुरविण्याचा व्यवसाय असलेल्या राजू भंडारी याने त्यांची रवी पुजारी टोळीत भरती केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली. भंडारी याला मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकासमोर नेपाळला पळून जाण्यापूर्वी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली आहेत.

दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांसोबत सांताक्रूझ येथे चकमकीत मारला गेलेला रवी पुजारीचा निकटवर्तीय राजेंद्र चौधरी ऊर्फ थापा याने भंडारीला ही भरती करण्यास सांगितले होते. थापाच्या इशाऱ्यावरून एप्रिलमध्ये भंडारीने या चौघा शूटरना टोळीत दाखल केले होते. पुजारी टोळीच्या गुंडांनी मुंबईत केलेल्या सर्वच गोळीबाराच्या घटनांचा थापा सूत्रधार होता. एका बिल्डरवर गोळीबार करण्यासाठी या चौघांना 20 हजार रुपये दिले जात होते. त्यासाठी लागणारी शस्त्रे नेपाळमधील एकाकडून राजेंद्र चौधरी घेऊन यायचा. मुंबईत राजू भंडारीकडे शस्त्रे सोपविल्यानंतर गोळीबार करण्याच्या तारखेला ती चौघांकडे दिली जात. काम झाल्यावर ही शस्त्रे पुन्हा भंडारीकडे गोळा केली जात होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी दिली.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: