कामावर पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:22 AM (IST)
मुंबई - माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यातील शिपायाने आज कामावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. राजाराम पवार (50) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. मधुमेहाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली आहे.
वाशी येथे राहणारे पवार हे शेअर बाजार परिसरात असलेल्या ज्यू मंदिराजवळ रात्रपाळी करीत होते. त्यांनी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्याकडे असलेल्या एसएलआर रायफलमधून स्वतःच्या डोक्यात एक गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या पवार यांना सहकाऱ्यांनी तत्काळ जे.जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव कोकीळ यांनी दिली.
या घटनेची माहिती काही वेळातच त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली. त्यांची पत्नी विमल आणि तीन मुलगे रुग्णालयात सकाळीच पोचले. गेल्या महिन्यापासून ते तणावाखाली होते. त्यातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यताही त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या पोलिसांनी वर्तविली. ""रविवारी दुपारी चारच्या सुमारास नोकरीनिमित्त घरातून बाहेर पडलेल्या पतीसोबत मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र त्यांनी फोन उचलला नाही. आज सकाळी साडेआठला त्यांच्या सहकाऱ्यांनी दूरध्वनीवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली,'' असे पवार यांच्या पत्नी विमल यांनी सांगितले.