पोलिस ठाण्यात प्रगटले काल्पनिक 'भूत'
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 10, 2010 AT 12:15 AM (IST)
औरंगाबाद - पती आणि मूल आजारी असतानाही रात्रीची ड्युटी, वरिष्ठांकडे याबाबत सांगूनही ते ऐकत नसल्याने सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात भुताटकीचे भूत उभे करण्यात आल्याचे समोर आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव शहाजी भोसले यांनी भूत दाखवणाऱ्याला 21 लाखांचे बक्षीस जाहीर केल्याने तर प्रसारमाध्यमांकडे भुताटकीला दुजोरा देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोबडी वळली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकूण 16 महिला पोलिस कर्मचारी काम करतात. रात्रपाळीची ड्युटी असणाऱ्या महिला पोलिसांना रात्री 9 वाजेपासून ड्युटी करावे लागते. येथील पोलिस निरीक्षकांकडे कोणत्याही बाबतीत लेखी माहिती द्यावी लागते. येथील महिला पोलिस पद्मा म्हस्के यांनी आपणास भूत दिसले, ते भीती दाखवत होते असे सांगून अमावास्येच्या दिवशी बुधवारी (ता. आठ) रात्रपाळीची ड्युटी देऊ नये, अशी आपल्या वरिष्ठांकडे विनंती केली. त्यांनी शिरस्त्याप्रमाणे स्टेशन डायरीत नोंद करा, असे सांगितल्यानंतर त्यांनी स्टेशन डायरीत ""आपणास भूत दिसले होते, ते भीती दाखवते अशीच नोंद केली,'' आणि या आधारे पोलिस निरीक्षक नामदेव ठोंबरे यांनी पोलिस ठाण्यात भुताटकी असल्याच्या वृत्ताला प्रसार माध्यमांकडे दुजोरा दिला.
यासंदर्भात पोलिस ठाण्यात जाऊन सात-आठ पोलिस कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, आपण गेल्या चार-पाच वर्षांपासून या ठाण्यात दिवस-रात्र ड्युटी करत आहोत, मात्र आपणास कधीच भूत काय साधी सावलीदेखील दिसली नाही. मुळात भूत अस्तित्वात नाही, सामान्य माणसांचे ठीक आहे. मात्र, पोलिस खात्यातील वरिष्ठच जर भूत आहे, असे म्हणून राईचा पर्वत करत असतील तर सामान्य माणसांचे काय? त्यांनी भूताला घाबरावे की, पोलिसाला असा त्यांनी प्रतिप्रश्न केला. पाच वर्षांपासून या पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यानेही भुताटकीचा विषय काढताच तो हसण्यावारी नेला.
21 लाखांचे बक्षीस
भुताटकीच्या वृत्ताला पोलिस निरीक्षकांनीच दुजोरा दिल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, हे वृत्त ऐकून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यसचिव शहाजी भोसले यांनी सिडको पोलिस ठाण्याला भेट देऊन याची सविस्तर माहिती घेतली. अनेकांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, आयुक्तांनी परवानगी दिली तर सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच दिवस रात्रीची ड्युटी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते करून त्या भूताचा शोध घेतील. येथे कोणीही भूत दाखवावे, त्यांना आम्ही 21 लाखांचे बक्षीस देऊ, अशी घोषणाही त्यांनी केली.
रात्रपाळीचा कंटाळा म्हणून
पोलिस निरीक्षक नामदेव ठोंबरे म्हणाले रात्री 9 वाजेपासून रात्रपाळीची ड्युटी करावी लागते. या ड्युटीसाठी या ठाण्यातील चार-पाच महिला कर्मचाऱ्यांना कंटाळा येतो. यातूनच हा भुताटकीचा बनाव करण्यात आला आहे. आपण या वृत्ताला दुजोरा दिला नाही, एवढेच काय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आपल्याशी संपर्कच केला नसल्याचा खुलासा त्यांनी केला. रविवारी (ता.12) पोलिस ठाण्याच्या आवारात भंडारा आयोजित केला आहे आणि याचे संयोजक स्वत: पोलिस निरीक्षक नामदेव ठोंबरे आहेत.
आयुक्तांचा कोट : केवळ रात्रपाळीची ड्युटी नको म्हणून भूताचा केलेला हा बनाव आहे, याप्रकरणी त्या ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी चौकशी करतील आणि दोषींवर कारवाई केली जाईल. - पोलिस आयुक्त श्रीकांत सावरकर.