गणेश मूर्ती यंदा महागल्या
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 10, 2010 AT 12:15 AM (IST)
बीड - विविध प्रकारच्या अडचणींमुळे यंदा छोट्या गणेश मूर्तींची आवक कमी झाली आहे. यामुळे या वर्षी छोटी गणेश मूर्ती महागली आहे. गेल्यावर्षी पन्नास रुपयांना मिळणारी छोटी गणेश मूर्ती यंदा पंचाऐंशी रुपयांवर गेली आहे.
गणेशोत्सव हा सर्वांना एकत्र आणणारा उत्सव आहे. यात दरवर्षी मोठ्या गणेश मूर्तींचे आकर्षण असते. तसेच प्रत्येक गणेश मंडळाचा आपली गणेश मूर्ती ही मोठी व भव्य असावी, असा प्रयत्न असतो. परंतु घराघरांमध्ये बसवण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती छोटी असते. मोठ्या गणेश मूर्ती खरेदी करणाऱ्यांची संख्या मोजकीच असते; पण छोटी गणेश मूर्ती घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. यावर्षी छोट्या गणेश मूर्तींची अन्य जिल्ह्यांतून होणारी आवक कमी प्रमाणात झाल्याने त्यांची किंमत वाढली आहे. गेल्या वर्षी छोटी मूर्ती 50 रुपयांस होती यावर्षी 85 पासून तीनशे रुपयांपर्यंत आहेत.
बीड शहरात सहा ते आठ ठिकाणी गणेश मूर्ती तयार केल्या जातात. यात छोट्या मूर्तींची संख्याही असते; परंतु अन्य जिल्ह्यांमध्ये तयार केलेल्या मूर्तींची कला, कुसर, सुबकता आणि आकर्षपणा हा स्थानिक भागात तयार केलेल्या मूर्तींमध्ये कमी असते. यामुळे विशेष करून नगर जिल्ह्यातून आलेल्या मूर्ती खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो.
बीड शहरात तयार करण्यात आलेल्या मूर्तींर्त्या जिल्ह्यातील वडवणी, गेवराई, माजलगाव, केज, आष्टी तालुक्यांत विक्रीसाठी जातात. बीड शहरात याची कमी प्रमाणात विक्री होते. शहरातील सिद्धीविनायक व्यापारी संकुलाच्या मैदानामध्ये गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहे. यात पन्नास स्टॉल आहेत. बीडमध्ये नगर, उस्मानाबाद, पाथर्डी आदी ठिकाणांहून मूर्तींची आवक केली जाते. साधारण 175 रुपयांपासून पंधरा हजार रुपये किमतीपर्यंत गणेश मूर्ती शहरात उपलब्ध झाल्या आहेत. छोट्या गणेश मूर्ती आणणे, त्यांची वाहतूक सुरळीत होणे, पावसाळ्यात या मूर्तींची देखभाल करणे अशा अनेक अडचणी विक्रेत्यांना भेडसावतात. त्यातून खर्च वाढतो. त्यामुळे आम्ही यंदा छोट्या गणेश मूर्तींची आवक कमी केली असल्याचे विक्रेते शशीकांत राऊत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.