Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

सप्तशृंग निवासिनी ट्रस्टवर स्थानिकांना प्रतिनिधित्त्व नाही
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 25, 2010 AT 12:00 AM (IST)

मालेगाव -  सप्तशृंगगड (ता. कळवण) येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या नवीन विश्‍वस्तांची निवड झाली आहे. या निवडीत मावळत्या पाचपैकी फक्त एकाची पुन्हा नियुक्ती केली आहे. दरम्यान, विश्‍वस्त मंडळात सप्तशृंग गडावरील एकाही ग्रामस्थाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दुपारी काही ग्रामस्थांनी ट्रस्टच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्री सप्तशृंगीदेवी निवासिनी देवी ट्रस्टची स्थापना 1975 मध्ये झाली. विद्यमान विश्‍वस्तांची मुदत 21 सप्टेंबरला संपली. त्यामुळे नवीन विश्‍वस्तांची निवड करण्यात आली. मावळत्या विश्‍वस्तांमध्ये चौघांना अर्धचंद्र मिळाला; तर शरद अष्टपुत्रे यांची पुन्हा निवड झाली आहे. याखेरीज ऍड. दिलीप वनारसे, ऍड. मोहन बक्षी, नरेन हिंगे व पाळे (ता. कळवण) येथील वसंतराव देशमुख यांची विश्‍वस्त म्हणून निवड झाली आहे. ही नावे जाहीर होताच कळवण शहरासह गडावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विश्‍वस्त मंडळात कळवणचा एक व सप्तशृंगगडाचा एक प्रतिनिधी असावा, अशी सर्वसाधारण मागणी होती.
 
दुपारी माजी सरपंच अर्जुन सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, माजी सदस्य बाळासाहेब वरगळ, रामप्रसाद बत्तासे, नीलेश कदम, लक्ष्मीकांत पाठक, किरण कदम, तुषार बर्डे, किशोर बेनके आदींसह शेकडो ग्रामस्थांनी ट्रस्टच्या कार्यालयात जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. 1975 ते 2005 या कालावधीत सप्तशृंगगडाचा एक प्रतिनिधी विश्‍वस्त मंडळात कायम होता. मात्र, पाच वर्षांपासून गडाला प्रतिनिधीत्व दिले जात नाही. आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी स्थानिक प्रतिनिधींची आवश्‍यकता आहे. त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली. ग्रामस्थांच्या भावना संबंधितांपर्यंत पोचविण्याचे आश्‍वासन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
 
 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: