मिहान प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला
सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 30, 2010 AT 12:15 AM (IST)
नागपूर - मिहान प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळणार असल्याचे संकेत महसूलमंत्री नारायण राणे यांनी दिले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पुनर्विचार करण्याबाबतचे निर्देश दिल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा काही प्रमाणात का होईना पल्लवित झाल्या आहेत.
श्री. राणे म्हणाले, 'मिहानग्रस्तांची वाढीव मोबदल्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे. त्यासाठी ते सातत्याने लक्ष वेधत आहेत. पुनर्वसन होत असताना त्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळणेही अपेक्षित आहे. त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून आपल्याकडे आला होता. त्या फाइलवर विचार करावा, तपासणी करावी, अहवाल सादर करावा, असे आपण सांगितले आहे.'' इतर ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला देताना मिहानग्रस्तांचेही समाधान होणे आवश्यक असून; तशा सूचनासुद्धा देत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
मिहानग्रस्तांचे पुनर्वसन पॅकेज अद्याप जाहीर व्हायचे आहे. प्रकल्पग्रस्त मिळालेल्या मोबदल्याने असमाधानी आहेत. त्यांनी ही बाब शासनापर्यंत सातत्याने पोचविली. वेळोवेळी आंदोलन केले. कवडीमोल भाव मिळत असल्याची तक्रार केली. योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी जमीन द्यायला तयार नाहीत. शिवणगावच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणाहून पळ काढावा लागल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्र्यांनी दिलेले संकेत मिहान प्रकल्पात जमीन जाणाऱ्यांसाठी समाधान देणारी असल्याची चर्चा आहे.