Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

संत्रानगरीत साकारणार "नामांतर शहीदस्मारक'
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 23, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: nagpur,   vidarbha
नागपूर - मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती सदैव तेवत ठेवण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने संत्रानगरीत "नामांतर शहीदस्मारक' उभारण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

अनेक वर्षांपासून आश्‍वासनांच्या विळख्यात अडकलेल्या या कामाला आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या स्वाक्षरीनंतर हिरवी झेंडी मिळाली. येत्या 31 जानेवारीच्या आत स्मारकाचे भूमिपूजन होणार असून पुढील आठ महिन्यांत याचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी एकूण दीड कोटीचा खर्च असून; यंदाच्या अर्थसंकल्पात 25 लाख रुपयांची तरतूददेखील यापूर्वीच करण्यात आली. आर्किटेक्‍ट उदय गजभिये यांनी या स्मारकाचे डिझाइन तयार केले आहे. बगीचा आणि रेस्टॉरेंटसारख्या गोष्टींचा समावेश न करता परिसरात भक्तिमय वातावरण असेल, या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात येत असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले.

अर्धा एकर जागेत साकार होणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातील एकमेव असावा, असेही बोलले जात आहे. नामांतर चळवळीतील 27 हुतात्म्यांची नावे याठिकाणी ब्लॅक ग्रेनाइटवर कोरण्यात येणार आहेत. तसेच खुले व्यासपीठ आणि समाजभवन या स्मारकाचे वैशिष्ट्य असेल.

1977 ते 1994 या कालावधीत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आलेत. या चळवळीत नागपूरकरांचाही समावेश होता. कामठी मार्गावरील क्रमांक दहाच्या पुलाजवळ झालेल्या अशाच एका आंदोलनात गोळीबार झाला होता. 17 वर्षांच्या या आंदोलनाला अखेर यश आले; पण त्यासाठी 27 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. त्यानंतर 10 ते 12 वर्षांपासून नामांतर शहीद स्मारकाची विविध पातळ्यांवर मागणी सुरू होती. विविध संघटना व पक्षांनी ही मागणी लावून धरली होती. अखेर यावर्षी त्याला हिरवी झेंडी मिळाली. पुढील आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्यात येईल; असे सांगून या प्रकल्पासाठी कार्यकारी अभियंता राहुल वारके, मुख्य अभियंता ए. एन. शंभरकर, नगरसेवक किशोर गजभिये, राजेश माटे, संदीप सहारे आदींनी विशेष परिश्रम घेतले, असेही श्री. जोशी म्हणाले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: