Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आंबेडकरी सूर्यांकुरांचे रक्त वाया गेलेले नाही!
सकाळ वृत्तसेवा
Friday, January 14, 2011 AT 12:30 AM (IST)

केवल जीवनतारे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर - मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, या मागणीचे आंदोलन निळी पाखरे 14 वर्षे लढलेत. नामांतराच्या या धगधगत्या वणव्यात 23 भीमसैनिक शहीद झाले. आंबेडकरी सूर्यांकुरांसाठी क्रांती म्हणजे नामांतर होते. रिपब्लिकन नेत्यांनी सत्तेसाठी नामांतराचे राजकारण केले; परंतु मार्शल रेस कार्यकर्ते डोक्‍याला निळे कफन बांधून नामांतराच्या रणांगणात लढत होते. म्हणूनच 16 वर्षांनी नागपूर महापालिकेला नामांतर शहीद अग्निपुत्रांचे शिल्प तयार करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावे लागले. या निर्णयामुळे नामांतराच्या लढ्यातील शहीद सूर्यांकुरांचे रक्त वाया गेले नाही, हे मात्र निश्‍चित.

"मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात येईल', असा ठराव 27 जुलै 1978 रोजी दोन्ही सभागृहांत संमत झाला आणि मराठवाड्यात आंदोलनाला तोंड फुटले. राज्यात 340 गावांतील दलितांच्या घरावर हल्ले झाले. अडीच हजार दलितांची कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली. एक हजार आठशे घरे बेचिराख झालीत. नामांतराची घोषणा वणवा पेटण्यास कारणीभूत ठरली आणि 48 तासांच्या आत नामांतराची अंमलबजावणी होणार नाही, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे प्रवक्ते समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी केली. निर्णय घेऊन अंमलबजावणी होणार नाही, ही वार्ता पसरताच आंबेडकरी निखाऱ्यांनी पेट घेतला. 4 ऑगस्ट 1978 रोजी आंबेडकरी सूर्यांकुरांनी कोणी चैत्यभूमी, तर कोणी दीक्षाभूमीची माती कपाळाला लावली आणि आंदोलनाला प्रारंभ केला. नामांतराचा एल्गार राज्यात पुकारला गेला. कार्यकर्त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होत होते; परंतु माघार घेत नव्हते. पुढारी तडजोड करीत राहिले; परंतु कार्यकर्त्यानी निष्ठेने लढा तेवत ठेवला. यामुळेच नामांतर आंदोलनाची धार तेजाने तळपत राहिली. उत्तर नागपुरातील ज्ञानसंग्रह वाचनालय आणि दक्षिण नागपुरातील जोगीनगर नामांतर नागपूर आंदोलनाचा केंद्रबिंदू होता. 14 जानेवारी 1994 ला नामांतर झाले. नामांतराच्या या लढ्यात कार्यकर्त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले; परंतु ओठावर मात्र नामांतराच्या विजयोत्सवाचे गीत होते. आजही ऍड. विमलसूर्य चिमणकर, सुरेश घाटे, मधू दुधे, बाळू हिरोळे, यशवंत पाटील, प्रकाश बनसोड, ऍड. रमेश शंभरकर, सुनील लामसोंगे, केतन पिंपळापुरे, राजन वाघमारे यांसारख्यांचे आयुष्य चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. तत्कालीन लॉंग मार्चमध्ये नरेश वहाने हा बारा वर्षांचा मुलगा सिंदखेडराजापर्यंत पायी गेला होता; हा इतिहास अजूनही ताजा आहे.

नामातंर लढ्यातील शहीद
उत्तर नागपुरात दहा नंबरी पुलाजवळ "नामांतर झालेच पाहिज', अशी घोषणा देत चिमुकला अविनाश डोंगरे रस्त्यावर येताच त्याच्या डोक्‍यात बंदुकीची गोळी शिरली आणि तो जमिनीवर कोसळला; ही आठवण आजही ताजी आहे. तसेच राज्यभरातील दिलीप रामटेके, रोशन बोरकर, ज्ञानेश्‍वर साखरे, डोमाजी कुत्तरमारे, चंदर कांबळे, पोचिराम कांबळे, जनार्दन मवाळे, शब्बीर अली काजल हुसैन, गौतम वाघमारे, रतन मेंढे, सुहासिनी बनसोड, नारायण गायकवाड, अब्दुल सत्तार, दिवाकर थोरात, जनार्दन मस्के, भालचंद्र बोरकर, शीला वाघमारे, प्रतिभा तायडे, गोविंद भुरेवार, मनोज वाघमारे, कैलास पंडित, रतन परदेशी नामांतरासाठी शहीद झाले असल्याची माहिती समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक ऍड. विमलसूर्य चिमणकर यांनी दिली.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: