Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'लिटल चॅम्प्स'च्या स्वरांनी दुमदुमला नाशिकचा गोदाकाठ
सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 03, 2011 AT 12:28 AM (IST)
नाशिक - छोटे असले तरी कणखर आवाज, हळूहळू सुरांना चढलेला रंग, मध्येच भावगीत- मध्येच लावणीचा ठसका, गण-गवळणीचा जल्लोष, गोंधळ सुरू केल्यानंतर आपोआप थिरकणारी पावले, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात गोदाकाठचा परिसर केवळ मोहित झाला नाही, तर तो चक्क दुमदुमला. भुजबळ फाउंडेशन आयोजित नाशिक फेस्टिव्हलमध्ये आज "लिटल चॅम्प्स'चा परफॉर्मन्स उत्तरोत्तर रंगला...

"सारेगमप'फेम लिटल चॅम्प्समधील पाचही गायकांनी एकच धमाल उडवून दिली. केवळ धमाल नव्हे, तर त्यांनी नाशिककरांना थिरकायलाही लावले. त्यातच राहुल सक्‍सेनाचा भारदस्त आवाज, त्याने गायलेल्या "हर हर महादेव...' (चित्रपट- "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय') या गीताने तर थंड वातावरणात एक वेगळीच ऊब दिली. एकीकडे गीतांचा जल्लोष सुरू असतानाच नाशिकच्या मातीत जन्मलेली आणि आता आंतरराष्ट्रीय ख्यातीची मॉडेल व अभिनेत्री असलेली सायली भगत, तसेच प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर आल्यानंतर नाशिककरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या दोघींनी सोहळ्यासाठी शुभेच्छा देत नाशिक फेस्टिव्हलच्या सूत्रबद्ध आयोजनाचे कौतुक केले. दोन्ही अभिनेत्रींचा भुजबळ फाउंडेशनतर्फे येवल्याची पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.

दरम्यान, आजच्या सोहळ्यात "मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून, नायतर देवा देवा मी जातो दुरून...', "चांगभलं रं, देवा चांगभलं...', "सरणार कधी रण, घागर घेऊन...', "अभीर गुलाल उधळीत रंग', "लटपट लटपट तुझं चालणं...' यांसारखी मराठी गीते आणि पंजाबी, हिंदी अशा एकाहून एक सरस गीतांचा नजराणा तब्बल तीन तासांहून अधिक काळ पेश करण्यात आला. कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशपांयन, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या "लिटल चॅम्प्स'नी आपल्या खुमासदार शैलीत नाशिककरांना मंत्रमुग्ध केले. वातावरणात जोश भरण्यासाठी ही मंडळी चांगलीच सज्ज होऊन आली होती. आपल्या खास शैलीत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिने सूत्रसंचालन केले. छोट्या लिटल चॅम्प्सची अदाकारी पाहण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने आले होते. फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ, उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे, नाशिक फेस्टिव्हलची ब्रॅंड ऍम्बेसिडर सावरपाडा एक्‍स्प्रेस कविता राऊत, अरुणा टाकळकर, बाबूराव हरगोडे, वर्षा राऊत, पुंडलिक जाधव, दामोधर जाधव, नाना महाले आदी उपस्थित होते. 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: