भाषांतर हवे? संगणकाला सांगा...
सकाळ वृत्तसेवा
Friday, February 11, 2011 AT 02:15 AM (IST)
पुणे - संगणक वापरायचे म्हणजे इंग्रजी यायलाच पाहिजे, ही अट आता मागे पडणार आहे. आतापर्यंत केवळ काहीच सॉफ्टवेअर मराठीत होते, पण आता इंग्रजीतील कोणताही मसुदा मराठीत भाषांतरित होऊन तुमच्यासमोर येऊ शकेल. एवढेच नव्हे, तर इंग्रजी मसुदा भारतीय 22 भाषांमध्ये भाषांतरित होऊ शकेल, अशी संगणक प्रणाली पुण्यातील दोन संगणकतज्ज्ञांनी शोधून काढली आहे. "स्पीड सूट' नावाची ही प्रणाली अतुल तुळशीबागवाले व राजीवलोचन फडके यांनी निर्माण केली आहे.
तुळशीबागवाले म्हणाले, ""बहुतांश संगणक हे मुख्यतः ओरॅकल, सॅप, मायक्रोसॉफ्ट, डायनॅमिक्स आदी प्रणालींवर कार्यरत असतात. या प्रणाली परदेशात विकसित झालेल्या आहेत. त्यात भारतीय भाषांचा विचार करण्यात आला नाही. आपल्याकडे इंग्रजी जाणणारे लोक केवळ पाच टक्केच आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक संगणकीय ज्ञानापासून दूर राहतात. ही माहिती मातृभाषेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला. संपूर्ण प्रणाली भाषांतरित करणारी ही पहिली प्रणाली आहे.''
फडके म्हणाले, ""जन्मदाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंतची अनेक कागदपत्रे नागरिकांना सरकारी कार्यालयांतून घ्यावी लागतात. संगणक वापरल्यावर ही सर्व कागदपत्रे मात्र इंग्रजीत येतात. त्यातील बहुतांश माहिती सामान्य नागरिकांना कळत नाही. भाषांतराची प्रणाली वापरल्यास प्रत्येक जण संगणक वापरू शकेल. खेड्यात इंग्रजीचे ज्ञान असलेले लोक कमी असतात. त्यामुळे बॅंका किंवा इतर कार्यालयांत शहरातून लोक पाठवावे लागतात. या माणसांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. मातृभाषेत संगणक प्रणाली उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येकाला हे सहज समजेल. स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल. चीन, जपान येथे सर्व संगणक प्रणाली स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत.''
अरेबियन देशातही स्पीड सूट
अरेबियन देशांमध्ये स्थानिक भाषांत संगणक प्रणाली भाषांतरित करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे, असे तुळशीबागवाले यांनी सांगितले. ते म्हणाले, ""या प्रणालीत जगातील 122 भाषा भाषांतरित होऊ शकतात. अरेबियन देशातही इंग्रजी भाषेपेक्षा स्थानिक भाषा वापरणारे नागरिक अधिक आहेत. त्यामुळे ते स्पीड सूट वापरणार आहेत.''