अंजली जोगळेकर (टेक्सास) माझे नाव अंजली जोगळेकर. मी मूळची मुंबईची. आई - वडील दोघेही प्रख्यात बायोकेमिस्ट ज्यांनी हाफकिन्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि शॉ वॉलेस यांसारख्या संस्थांमध्ये काम केले. त्यांच्या संशोधन कारकिर्दीदरम्यान त्यांनी ऑइल फॅट केमिस्ट्री विषयावर अनेक शोधनिबंध लिहिले आणि नवीन उत्पादने तयार केली. माझ्यावर खाण्याबाबतचे संस्कार लहानपणापासूनच होत गेले आणि आजच्या यशामागे हे संस्कारच कारणीभूत आहेत.
मुंबईच्या किंग जॉर्जमधून शालेय शिक्षण संपल्यानंतर मी मुंबईच्या एस.एन.डी.टी.मधून होम सायन्स, फूड आणि न्युट्रिशनची पदवी घेतली, तसेच बेकरी आणि कन्फेक्शनरीची पदविका पूर्ण करत असताना प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी मुंबईच्या जसलोक आणि नानावटी या नामवंत इस्पितळांत आहारतज्ज्ञांबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. लग्नानंतर आम्हाला मुंबई, लखनौ आणि दिल्ली असे स्थलांतर करावे लागले. दिल्लीत मी चॉकलेट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला फक्त नातेवाईक आणि मित्र परिवारांपर्यंत मर्यादित असणाऱ्या व्यवसायामध्ये चांगली कमाई करता आली. नंतर मात्र ग्राहक मिळत गेले ज्यामध्ये दिल्लीचे भूतपूर्व राजे, भारतीय क्रिकेट टीम, तसेच भारतीय डेव्हिस संघाचा समावेश होता.
माझे पती टेक्सासला एका सॉफ्टवेअर कंपनीत वरिष्ठ कार्यकारी अधिकारी होते, आता त्यांची स्वतःची रिक्रुटमेंट फर्म आहे. परदेशात आपल्याला भारतीय पदार्थांची चव चाखायला मिळाली तर त्याची लज्जत काही निराळीच असते. त्यामुळे मी जानेवारी २००२ मध्ये "अंगीठी' नावाने व्यवसायाला सुरवात केली. सुरवातीला घरच्या संगणकावर पत्रकं छापून जवळच्या भारतीय दुकानांमध्ये वाटली. तोंडी जाहिरातीमुळे आठवड्याला किमान २ ऑर्डर्स मिळू लागल्या.
मार्च २००२ मध्ये जिओसिटीजवर आम्ही संकेतस्थळ सुरू केले, ज्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्वतंत्रपणे
www.angeethi.com नावाचे संकेतस्थळ सुरू केले, लवकरच त्या संकेतस्थळावरून स्वीकारण्याचा आणि ऑनलाईन पेमेंटचा मानस आहे. माझ्या व्यवसायात पतीचा, मुलीचा आणि मित्रांचाही सहभाग आहे. अमेरिकेतला बहुतांश भारतीय उच्च शिक्षित असल्याकारणाने तो कामाकरिता मेहनत आणि वेळ द्यायला तयार असतो. बऱ्याच घरात नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे असल्याने, त्याच्याकडे स्वयंपाकासाठी खूप कमी वेळ असतो. अमेरिकेत मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला पैसा, बाजारात जाण्याचा सहज व सुलभ मार्ग आणि स्थानिक लोकसंख्येची खरेदी करण्याची ताकद, या गोष्टींमुळे माझा व्यवसाय यशस्वी झाला.