Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जुन्या पदार्थांना हवंय नवं आयसिंग
विष्णू मनोहर
Monday, May 09, 2011 AT 12:21 PM (IST)

आपल्याला सतत नवीन काही तरी हवं असतं. नवीन मिळालं तर जुनं आपोआप विस्मरणात जातं. पण आता वेळ आली आहे अशा या पारंपरिक पदार्थांना नव्याने पुढे आणण्याची. पारंपरिक पदार्थांत थोडेफार बदल करून, त्यांना सोपं करून नवीन पिढीला रुचतील असे बनवण्याची. आपल्याच परंपरेतले हे सोपे, पौष्टिक आणि आकर्षक पदार्थ....

माणसाने जेव्हापासून अन्न शिजवून खायला सुरूवात केली तेव्हापासून त्याच्या खाद्यसंस्कृतीचा विकास व्हायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या मानवी समूहांनी खाण्यात आपलं वेगळेपण जपलं. प्रांतानुसार पदार्थ, पदार्थाची चवही बदलत गेली. ज्या मातीत जे पिकतं त्यापासूनच वेगवेगळे पदार्थ त्या त्या भागात तयार होतात. मग ते पदार्थ आपण आपलेसे करताना त्यात काही बदल करतो, आपल्याला आवडणाऱ्या चवी त्यात घालतो. यामुळे एखादा पदार्थ परप्रांतीय असूनसुद्धा आपल्याला खावासा वाटतो.

पारंपरिक पदार्थ हा माझा आवडीचा विषय. आपल्याला आपले जुने पारंपरिक पदार्थ पुन्हा आपलेसे करून घ्यायचे आहेत- त्यांच्यात बदल करून पुन्हा नव्याने रुजवायचे आहेत. कारण हे पदार्थ घरातल्याच वस्तूंपासून तयार होतात. त्यातून शरीराला आवश्‍यक असणारी अनेक पोषणमूल्यं भरपूर प्रमाणात मिळतात.

इतिहास पाककलेचा
खाद्यपदार्थांच्या बाबतीत अभ्यास करताना असं लक्षात आलं, की संपूर्ण भारतात पदार्थांच्या वैविध्यात महाराष्ट्र व त्याखालोखाल दक्षिण भारत आणि कोलकता हे अग्रेसर आहेत. भारतीय इतिहासातल्या काही व्यक्तिरेखा या पाककलेत निपुण असल्याचे दाखले आहेत. भीम आणि नलराजा हे पाककलेत प्रवीण होते. भीमाला स्वयंपाकाची आवड होती, म्हणूनच अज्ञातवासात त्याला बल्लवाचार्याची भूमिका मिळाली, असं महाभारतात सांगितलं आहे. श्रीखंडाचा शोध भीमाने लावला असं म्हणतात. दही आणि साखर एकत्र करून त्यात वेगवेगळी फळं टाकून त्याला त्याने शिखरणी असं नाव दिलं होतं. श्रीकृष्णानेही चक्‍क घीवर हे पक्वान्न शोधलं असं म्हटलं जातं. नलराजाने तर पाककलेवर संस्कृतमध्ये पुस्तकही लिहिलं होतं. हा नलराजा तसा उत्तरेतला, पण त्याच्या पाककलेचं कौतुक मात्र दक्षिण भारतीयांनी जास्त केलं. त्याचीच आठवण म्हणून दक्षिणेत व महाराष्ट्रातल्या काही भागांत धुंधूर मास (पौष महिन्यात) साजरा करतात.

उत्तरेविषयी बोलायचं तर तिथे बंगाली पाककृतींचा प्रभाव जाणवतो. काही काळापूर्वी बंगालमधल्या विधवा स्त्रियांना वाराणसीला गंगेच्या किनारी आणून सोडत. असं करता करता इथे त्यांची खूप मोठी वस्ती तयार झाली. बंगाली लोक तसे कलासक्त. बंगाली मिठाईच्या बाबतीत तर त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. त्यामुळे इकडे जशी बंगाली वस्ती वाढत गेली तसे बंगाली मिठाई बनविणारे कारागीरसुद्धा वाढले व त्याला जोड मिळाली रसिक उत्तर प्रदेशातल्या पद्धतींची. त्यामुळे नवनवीन बंगाली मिठायांचा जन्म तिथे झाला आणि बंगाली खाद्यसंस्कृती फोफावत गेली.

दुर्गाबाईंच्या टिप्स
धर्मशास्त्र, समाजशास्त्र, आदिवासी जीवन, मानववंशशास्त्र या विषयांच्या अभ्यासक आणि प्रसिद्ध साहित्यिका दुर्गाबाई भागवत यांनाही पाककलेत प्रचंड रस होता. त्यांच्या लिखाणात प्रचंड माहितीचा खजिना होता. त्यांनी "दुपानी' या पुस्तकात पाककलेच्या इतिहासाबद्दल बरंच सांगितलं आहे. त्यात नैसर्गिक रंगाच्या कवठाच्या, रायआवळ्याच्या, पेरूच्या जेलींची माहिती आहे. त्याचबरोबर बिनतेलाची फोडणी, केवड्याच्या कणसाची भाजी, केवड्यात ठेवून सुगंधी केलेला काय, या जुन्याच पण नवीन वाटणाऱ्या पदार्थांची आणि पद्धतींची रेलचेल आहे.

याच पुस्तकातला हा एक किस्सा. धिरडी सहसा मोडतात, त्याला उपाय काय? त्यावरचा उपाय त्यांनी गोष्टीरूपात सांगितला तो असा : जावई म्हणतो, माझी आई धिरडी करायला घातल्यावर तुळशीला एक फेरी मारून येते. तर इथे मुद्दा तुळशीच्या फेरीचा नाही, तर धिरडं उलटवण्याची घाई न करता त्याला योग्य वेळ देऊन मगच ते उलटवावं, म्हणजे मग धिरडं मोडतं नाही. पारंपरिक पदार्थ विस्मरणात जाण्याची बरीच कारणं आहेत. एक तर आपल्याला सतत नवीन काही तरी हवं असतं. नवीन मिळालं तर जुनं आपोआप विस्मरणात जातं.

काही पारंपरिक पदार्थ करायला कठीण असत. त्यामुळे साहजिकच माणूस नवीन सोप्या पदार्थांकडे वळला. काही पदार्थांच्या बाबतीत असं झालं की त्याला लागणारं अन्नधान्य मिळणंच दुरापास्त झालं. उदाहरण घ्यायचं झालं, तर काही काळापूर्वी जवस हे विदर्भातलं मुख्य पीक मानलं जायचं. जवसाच्या तेलापासून अनेक पदार्थ तयार केले जायचे. त्यानंतर सोयाबीन आलं. सोयाबीनच्या लागवडीत शेतकऱ्याला जास्त नफा दिसल्यामुळे हळूहळू जवसाची लागवड कमी झाली व त्यामुळे जवसाची कमतरता जाणवायला लागली. साहजिकच त्यापासून तयार होणारे पदार्थसुद्धा नामशेष व्हायला लागले. याचबरोबर, पदार्थ दिसतो कसा यामुळेसुद्धा लोक नवीन पदार्थांकडे वळतात.

खाद्यसंस्कृतीतील क्रांती
सध्याच्या युगात तर टी.व्ही.ने खाद्यसंस्कृतीमध्ये क्रांतीच घडवून आणली आहे. पण या भाऊगर्दीतसुद्धा पारंपरिक मराठी पदार्थांना अजूनही मागणी आहे. पदार्थ विस्मरणात जाण्याचं अजून एक कारण असंही असू शकतं, की काही समाजांतील लोकांना त्यांच्या पदार्थांवर आपली मक्‍तेदारी राखायची असल्यामुळे आपले पदार्थ इतर लोकांना बनवता येऊ नयेत, म्हणून ते फारसे बाहेरच आले नाहीत. हा प्रकार या काळातसुद्धा पाहायला मिळतो. हॉटेलमधील हेड कुक त्याच्या हाताखालील पोरांकडून भरपूर मेहनत करून घेतो व नेमके मसाले किंवा महत्त्वाचे जिन्नस घालतेवेळी त्यांना पाणी आणायला पाठवतो. तुम्हाला आठवत असेल, जुन्या काळी आपली आई किंवा आजी भाजी करताना वाटण नावाचा प्रकार करायची. त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, ओलं खोबरं इत्यादींचा समावेश असायचा. कालांतराने या वाटणाचं कालवण कधी झालं आणि कालवणाचं फाइन इंडियन ग्रेव्हीत रूपांतर कधी झालं हे कळलंच नाही. जुन्या काळी म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत तिखटाचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे तिखटपणासाठी कांदा, लसूण, काळी मिरी इत्यादींचाच वापर व्हायचा. नंतर तिखट कुठून आलं, त्याच्या एवढ्या वेगवेगळ्या जाती कशा तयार झाल्या व तो आपल्या भारतीयांच्या जेवणातला अविभाज्य घटक कसा झाला हा एक अभ्यासाचा विषय आहे. काही पारंपरिक पदार्थ करायला एकाग्रता लागते आणि ते वेळखाऊ पण असतात. त्यामुळेसुद्धा हे पदार्थ मागे पडले असावेत.

ऍपल जिलेबी
आता वेळ आली आहे अशा या पारंपरिक पदार्थांना नव्याने पुढे आणण्याची. एक किस्सा आठवतो. एकदा आमच्या किचनमध्ये जिलेबीचं पीठ होतं. तिथे एक माणूस जिलेबी काढत होता. मी एक सफरचंद खात खात तिथे पोहोचलो. ते पीठ आणि सफरचंद पाहून माझ्या डोक्‍यात एक कल्पना आली, की या सफरचंदाची चकती करून ती या पिठात बुडवून त्याची जिलेबी केली तर? हा प्रयोग मी लगेच अमलात आणला, आणि लोकांनासुद्धा हा प्रकार आवडला. मी त्याला "ऍपल जिलेबी' नावं दिलं. मी अभिमानाने लोकांना सांगत असे, की हा पदार्थ मी शोधून काढला आहे; पण माझा हा अभिमान काही दिवसच टिकला. कारण लक्ष्मीबाई धुरंधरांचं 100 वर्षं जुनं पुस्तक माझ्या वाचनात आलं, त्यामध्ये अशाच प्रकारच्या पदार्थाचा उल्लेख केला होता.
'खाजा' हा पदार्थ तोंडात घातल्याबरोबर विरघळतो, पण तो अतिशय सुबकपणे आणि हलक्‍या हाताने तयार करावा लागतो. त्याबरोबरच हातावरचे मांडे, केळाची तेलपोळी, चनोडे, सांदया, अमृतपोळी, सरगुंडे इत्यादी पदार्थ निगुतीने करावे लागतात. आपल्याकडील वाळवण हा प्रकारसुद्धा नामशेष होत चालला आहे. खरं तर वाळवणाचे दोन-तीन फायदे असतात. ते असे, की जेवणात इतर पदार्थांबरोबर तोंडी लावायला वेगळं असं काही तरी मिळतं. त्यामुळे जेवणाची लज्जत वाढते. वाळवणावरुन आठवलं, की जुन्या काळी लोक भाज्यासुद्धा वाळवून ठेवत असत, जेणेकरून ज्या सीझनमध्ये भाज्या मिळत नाही त्या सीझनमध्ये या वाळवलेल्या भाज्या कामी येतील. आपले उकडीचे मोदक हासुद्धा एक छान प्रकार आहे, पण तो करायला सवय लागते. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे साचे बाजारात उपलब्ध असल्यामुळे उकडीचे मोदक आपण चांगल्या प्रकारे करू शकतो.

उकडीच्या मोदकावरून आठवलं, की उकडीच्या मोदकाचेच जिन्नस वापरून डेझर्टचा एक छान प्रकार मी तयार केला होता आणि त्याला नाव दिलं होतं स्टीम्ड कोकोनट रोल. यामध्ये उकड काढून ती एका प्लास्टिकवर ठेवून त्यावर दुसरं प्लास्टिक ठेवलं. लाटण्याने लाटून पोळीवर खोबऱ्याचं सारण पसरवलं. नंतर याचे रोल करून त्याला स्टीम केलं. हासुद्धा डेझर्टचा एक उत्तम प्रकार होऊ शकतो.

यानंतर असाच एक प्रकार माझ्या डोक्‍यात आला. तो पुरणाच्या पोळीला पर्यायी नवा पदार्थ म्हणता येईल. ज्यांना पुरणाची पोळी लाटता येत नाही अशांनी जमेल तशी साधी पोळी लाटावी. त्यावर पुरण पसरवून त्याचा रोल करावा. हा रोल कापडात गुंडाळून याला स्टीम करावं आणि खाताना वरून साजूक तूप घालावं. तसाच बेसन पोळी (खारा) हासुद्धा एक उत्कृष्ट पदार्थ आहे, पण दुर्दैवाने तो आता मागे पडला आहे. यामध्ये पोळीवर बेसनामध्ये मीठ, हळद, तिखट, आंबट ताक मिसळून त्याची पेस्ट करून लावतात व या पोळीचे रोल करून वाफवून घेतात. 8 मिनिटं वाफवल्यावर बेसनामुळे याचे घट्ट रोल तयार होतात. नंतर हे रोल कापून त्यावर हिंग, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊन स्टार्टरचा प्रकार म्हणून सर्व्ह करू शकता.

पूर्वी कोकणात एक पदार्थ हमखास केला जायचा. अजूनही काही ठिकाणी करत असतील. तो म्हणजे तांदूळ आणि तूरडाळीची नारळाच्या दुधात शिजवलेली खिचडी. आजकाल जेवणात उसळीचं व कडधान्याचं प्रमाण कमी असतं. सॅलडमध्ये फॅशन म्हणून उसळी वापरतात, पण त्या खाण्यात किती येतात? इथे मला बिरड्यांची आठवण येते. जुन्या काळी स्त्रियांचा बिरड्या सोलण्यात हातखंडा असे. दुपारचं जेवण झालं की दोन्ही हातांनी त्या बिरड्या सोलत. मोड आलेला हा दाणा अक्षरशः मोत्याप्रमाणे दिसतो. त्याची उसळ करताना सढळ हाताने बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्याची हिरवी चटणी व लालचुटूक तिखट आणि नारळाचं दूध घालून मंदाग्नीवर शिजवलेल्या या बिरड्या नॉनव्हेजच्या थोबाडीत मारतील असं समजा! याबरोबर बुक्कीने फोडलेला कांदा व लिंबाची फोड, साजूक तूप घातलेला गरमागरम भात असो वा तांदुळाची भाकर एकदम लाजवाब मेन्यू!

कुकीजऐवजी अनरसा
अनरसा हा पदार्थही तुम्ही नव्या रूपात आणू शकता. तो अगदी एका आकारात करायचा. व्हेजिटेबल आइलमध्ये तळायचा. कुकीजसारखं छान डब्यात पॅंकिंग करायचं. आपण अनरसा खसखशीबरोबर करतो तसा कधी कोकोनट फ्लेवरही वापरता येतो. दिवाळीच्या दिवसांत तर भेट म्हणून असे बॉक्‍स किती छान वाटतील आणि एक व्यवसायच उभा राहू शकेल.

तर असे हे विस्मरणात गेलेले पदार्थ पुढे आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ते पदार्थ जसेच्या तसेच करायला हवेत असं नाही. खरं तर जुन्या काळी आजच्याएवढी साधनसामग्री व तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. आज आपल्याला त्याची कमतरता नाही. त्यामुळे त्या पारंपरिक अवघड पदार्थांमध्ये थोडे बदल केले आणि नव्या साधनांची मदत घेतली तर आपल्या खाद्यसंस्कृतीची श्रीमंती किती तरी वाढेल.

आंबील
आंबील हा पदार्थ फक्त प्रसादापुरता मर्यादित राहिलेला आहे, तो पण विदर्भातच. पण आंबील हा एक पौष्टिक व सहज होणारा पदार्थ आहे. एक वाटी आंबील जर खाल्ली तर तुम्ही एक वेळचं जेवण सहज टाळू शकता. त्यासाठी ज्वारीच्या पिठात ताक घालून रात्रभर भिजवतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी यात थोडं पाणी घालून मिश्रण पातळ करतात व लसूण, हिंग, मोहरी, हळद, मिरचीचे तुकडे, खोबऱ्याचे तुकडे यांची फोडणी करून यामध्ये ते पीठ घालतात व शिजवतात. शेंगदाण्याच्या कच्च्या तेलाबरोबर ते अतिशय चवदार लागतं.

पोळीचे बेसन रोल

साहित्य : पोळ्या (तयार) 5 नग, हिंग 2 चिमूट, हळद पाव चमचा, मोहरी अर्धा चमचा, ओलं खोबरं अर्धी वाटी, 1 लिंबाचा रस, तेल, अर्धी वाटी बेसन, बारीक चिरलेला लसूण 2 चमचे, दही 3 चमचे; आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरे घालून केलेली चटणी 3 चमचे.
कृती : डाळीच्या पिठात हिरवी चटणी चवीनुसार मीठ, हळद, दही घालून घट्टसर भिजवा. 1 पोळी घेऊन त्यावर याचा लेप लावा. रोल करून 8 ते 10 मिनिटांत कुकरमध्ये वाफवून घ्या. बाहेर काढून फ्रायपॅनवर थोडं परतून (तेलाबरोबर) किंवा डीप फ्राय करून नाही, तर सरळ गोल गोल चकत्या कापून वरून मोहरी, हिंग, लिंबाचा रस, साखर यांची फोडणी घालून व कोथिंबीर-खोबरं घालून सर्व्ह करा.

पुरण रोल
साहित्य : चण्याच्या डाळीचं तयार पुरण 1 वाटी, कणीक 1 वाटी, तेल 2 चमचे, मीठ छोटा पाव चमचा, दूध-तूप कणीक भिजवण्याइतकं.
कृती : थोड्या कोमट दुधात तेल, 2 चिमूट मीठ घालून कणीक भिजवून घ्या. त्याच्या पातळ गोल पोळ्या लाटून त्यावर पुरण पसरा. हलक्‍या हातांनी त्याचा रोल करून वाफवून घ्या. गरम असताना काप करून साजूक तूप घालून सर्व्ह करा.

रसातल्या शेवया
आजकाल मुलांना नूडल्सची आवड अधिक आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन जुन्या काळातील एक पदार्थ पुन्हा नव्याने येण्याची गरज आहे. त्याचं नाव आहे रसातल्या शेवया. यामध्ये तांदळाची उकड काढून त्याची शेव तयार करतात व ती आमरसात उकळतात. हा पदार्थ नारळाच्या घट्ट दुधाबरोबर खायला देतात.

इन्स्टंट अनरसा
साहित्य : रवा 2 वाट्या, खाण्याचा डिंक 1 वाटी, दही 2 चमचे, एकतारी साखरेचा पाक, तळण्यासाठी तूप, खसखस.
कृती : रवा दह्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवा. नंतर या गोळ्यात जाडसर कुटलेला डिंक घालून नेहमीच्या अनरशासारखे अनरसे खसखशीवर थापून डीप फ्राय करा. डिंकाने ते छान फुलतात. नंतर याला साखरेच्या पाकात लगेच काढा, किंवा पाक वापरायचा नसेल तर वरून पिठीसाखर घालून खायला द्या.

झुणका
साहित्य : बेसन 1 वाटी, बारीक चिरलेले कांदे अर्धी वाटी, तेल अर्धी वाटी, आलं-लसूण पेस्ट 1 चमचा, हळद पाव चमचा, धने पावडर अर्धा चमचा, तिखट, आमचूर पावडर, मीठ, साखर चवीनुसार, मोहरी अर्धा चमचा.
* कृती : तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. त्यात लसूण आणि कांदे घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावं. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ, साखर घालून थोडा वेळ परतावं. शेवटी बेसन घालावं व वरून थोडं पाणी घालून वाफेवर शिजवावं. वरून सजावटीकरिता कोथिंबीर घालावी.

भाकरी सॅंडविच
हा एक झुणका-भाकरीचा प्रकार आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने सर्व्ह केला तर अगदी इंटरनॅशनल पिटा-ब्रेडच्या तोडीचा आहे.
कृती : ज्वारीच्या भाकऱ्या (पुरीएवढ्या) 4 नग, झुणका 1 वाटी, हिरवी चटणी 1 चमचा, हिरवी मिरची-आलं-लसूण- कोथिंबिरीची पेस्ट, लांब चिरलेला कांदा 1 नग, लोणी 1 चमचा.
कृती : तयार भाकरीचे मधून दोन भाग करा व अर्धा भाग फुलवून भाकरीच्या दोन्ही पापुद्य्रांच्या मध्ये जी जागा तयार होईल त्यामध्ये थोडंसं लोणी, हिरवी चटणी, लांब चिरलेले कांदे व झुणका भरा. असं तयार झालेलं सॅंडविच सर्व्ह करा

कोकोनट रोल
साहित्य : तांदुळाची बारीक पिठी 1 वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, वेलची पूड, मीठ चिमूटभर, तूप.
कृती : उकडीच्या मोदकाची उकड काढतो तशी तांदुळाची उकड काढून ती एका प्लॅस्टिकमधे ठेवा आणि वरून दुसरं प्लॅस्टिक ठेवा व लाटण्याने लाटून पोळीवर खोबऱ्याचं सारण पसरवा. नंतर याचे रोल करून त्याला स्टीम करा. सर्व्ह करतेवेळी मधून एक रोल कापून त्यावर साजूक तूप, वेलची पूड व मध घाला किंवा आइस्क्रीमच्या स्लॅबवर गरमागरम रोल ठेवून वरून मध घाला. हासुद्धा डेझर्टचा उत्तम प्रकार होऊ शकतो.

ढोकळी डोसा रोल
साहित्य : ढोकळ्याचं पीठ 2 वाट्या, ओलं खोबरं अर्धी वाटी, कोथिंबीर, लिंबू 1 नग, मीठ, साखर, तिखट चवीनुसार.
कृती :- ढोकळ्याच्या पिठाचा पातळ डोसा करून त्यावर खोबरं, कोथिंबीर, लिंबू पिळा. थोडी साखर पण भुरभुरा. वाटल्यास थोडं तेल पण घाला. नंतर याला तव्यावरच रोल करून बाहेर काढा. लांब लांब तुकडे कापून सर्व्ह करा.


पाककौशल्य बद्दल वाचा तनिष्कामध्ये. "तनिष्का'चे वर्गणीदार होण्यासाठी संपर्क करा - tanishka@esakal.com
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 29/06/2011 12:51 PM MEGHA said:
GOOD
On 19/05/2011 08:43 AM yuvaraj said:
khupach chan aahe i like it....
On 17/05/2011 07:48 AM priti said:
thanks for आंबील.हा माझा आवडता पदार्थ आहे
On 16/05/2011 12:47 AM archana said:
puran roll sarkhach ek paramparik prakar mhanje ... "PURANACHE DIND" . Ha padarth "Nag-Panchami" la kela jato. Baki chya pak-kruti chanch.
On 15/05/2011 05:44 PM chandrakant gode said:
सध्याच्या फास्टफूड च्या जमान्यात आणि कामाच्या धावपळीत एका जागी बसून जेवण्याच्या कल्पनेला थोडे बाजूलाच ठेवावे लागतेय .त्यामुळे ,जुने ते सोने असून त्याचे स्वरूप नव्याने समोर आणावे लागेल .सध्या ,एका जागी बसून फक्त दारू ढोसता येते .हे ,सगळे पाश्चात्य संस्कृतीचे द्योतक आहे .पण ,आपण आपल्याला हवा तेवढा भाग घ्यावा हेच बरे .
On 14/05/2011 04:56 PM Ashwini said:
खूपच CHAN ..... पण मला एक विचरायचं कि आब्रास उकळा तर ते फुटण नाही न ?
On 13/05/2011 03:07 PM paurnima said:
तू गुड यार... मस्तच आहे lekh.
On 11/05/2011 02:20 PM Anjali said:
baghunach tondala pani sutat आहे................
On 11/05/2011 02:17 PM Anjali said:
baghunach tondala pani sutat आहे................
On 10/05/2011 10:47 AM Anupama said:
खूप नवीन padartha shikayla मिळाले. मला ek विचारायचं ki पुरण रोल करताना तयार poli तयार घ्यायची ki कच्ची?
On 09/05/2011 08:33 PM pallavi said:
मस्त ! बेसन रोल नक्कीच करून बघीन..
On 09/05/2011 07:17 PM kumar said:
मी जो पदार्थ करतो, तो कदाचित दुसर्या लोकांनी केलाही असेल.. मी एक pasta fusion अशी दिश करतो.. बर्याच वेळा मला tomato sauce खायचा कंटाळा येतो, म्हणून मी घरी pasta करताना मराठी पद्धतीने करतो.. कांदा टाकून, पोह्याप्रमाणे त्याला फोडणी देतो.. वाटलाच तर थोडे मसाले पण टाकतो. सुंदर चव लागते.
On 09/05/2011 03:18 PM Anu said:
Khupacha chan lekh aahe .. agadi tondala pani sutala .. agadi sathya, sopya ani chan dishesh sangitalya aahet.
On 09/05/2011 02:05 PM sandeep said:
लई भारी तोंडाला पाणी सुटल................ मस्तच................... लई भारी..............
On 09/05/2011 01:49 PM sasonkar yardena israel said:
विष्णू राव मला तुमचा लेख खूप खूप आवडला माहिती खूप सुंदर आणि उपयोगी पण आहे असेच खूप लेख माहितीचे द्या आम्हाला खूप आनंद होईल वाचायला बेस्ट ऑफ लक विष्णू राव आम्हा इस्राएल्च्या भारतीय जू लोकान कडून मिसेस सासोन्कर यार्देना इस्राईल
On 09/05/2011 01:01 PM shailaja wagh said:
व्वाव .....मस्तच आहे... मुले खुष आणि आपणही ...चपाती मध्ये रोज तयार असलेली भाजी त्या वर थोडे चीज किसून रोल म्हणजे फ्र्यान्की करावी मुले खूप आवडीने खातात .


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: