Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

इक ऐसे गगन के तले...
दीपा देशमुख uth@esakal.com
Thursday, May 12, 2011 AT 12:03 PM (IST)
Tags: uth tube
जगातल्या समस्यांचं मूळ आपल्या जीवनशैलीतच आहे. आपल्या जीवनशैलीला विज्ञान आणि पर्यावरण यांची जोड देण्याचा प्रयत्न करणारी मुक्ता लहानपणापासूनच सर्वोदयी विचारांच्या वातावरणात वाढलेली आहे. मुक्ता नावरेकर अवघी एकवीस वर्षांची असून आज नाशिकमध्ये काम करतेय.

कामाची ऊर्जा संवादात
"माझ्यावर प्रियदर्शन आणि निर्माणच्या मित्र-मैत्रिणींचा खूप प्रभाव आहे. तसंच डॉ. आयडा स्कडर यांचं काम माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी आहे,' असं मूळची नाशिकची असणारी मुक्ता नावरेकर कायमच म्हणते. मुक्‍ताने बारावीची परीक्षा दिली. त्यानंतर तिनं मुख्य प्रवाहाच्या शिक्षणात न जाण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात निर्माणमुळे समविचारी मित्र-मैत्रिणी मिळाल्या. त्यांच्याबरोबरच तिला जाणवलं, की कामासाठी मिळणारी ऊर्जा मैत्रीच्या परस्पर संवादात दडली आहे.

आणि तीन तासांत निर्माल्य जमलं...
तिनं नाशिक येथे निर्मलग्राम संस्थेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या "जीवनउत्सव' कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. त्याचबरोबर मुक्‍ताला कचरा व्यवस्थापन हा विषय खूप महत्त्वाचा वाटल्यामुळे ती सध्या "कचऱ्यातून रोजगारनिर्मिती' या विषयावर अभ्यास करतीये. नाशिक शहरातली अनेक गणेश मंडळं आणि कुटुंबं गणपती विसर्जनासाठी मूर्तींसोबत निर्माल्यही नदीत सोडतात. गेल्या वर्षी मुक्‍ता आणि तिच्या मित्र-मैत्रिणींनी रस्त्यावर थांबून लोकांना निर्माल्य देण्याचं आवाहन केलं. फक्त तीन-साडेतीन तासात प्रचंड निर्माल्य जमा झालं.

मोबाईल व्हॅनने होणार जनजागृती
मुक्‍ता आणि तिच्या काही मित्र-मैत्रिणींनी "शाश्‍वत' नावाने निसर्गस्नेही वस्तूंचं विक्रीकेंद्र सुरू केलं. त्याचबरोबर ते आता मोबाईल व्हॅन सुरू करणार आहे. जेणेकरून जीवनशैली आणि वस्तूंचे महत्त्व लोकांपर्यंत पोचू शकेल. नाशिकमध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे शाळांमधल्या मुलांसाठी होणाऱ्या कार्यशाळेत मुक्‍ता "जीवनशैली' या विषयावर सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे सत्र घेते. हे प्रशिक्षण ती खेळातून, कृतीतून आणि प्रयोगातून देते. मुलांची मानसिकता समजण्यासाठी तिनं कौन्सिलिंगचा कोर्स केला आहे.

पर्यावरणाबरोबरच मुलींमध्ये जागृती
ती हॅंडमेड पेपर आणि कागदापासून पुन्हा कागद बनवणे यांच्या कार्यशाळा घेते आहे. सॅनिटरी नॅपकिनचा वापर, त्यातलं प्लॅस्टिक, जागतिक कंपन्यांचं त्यामागचं राजकारण, गावातल्या मुलींचं लैंगिक विषयातलं अज्ञान अशा अनेक गोष्टी मुक्‍ताला लक्षात आल्यानंतर ती वयात आलेल्या मुलींशी बोलली. त्यांना अनेक उपाय सुचवले. मुक्‍ता कटाक्षाने खादीच वापरते. तुम्हालाही करायचाय या जीवनशैलीचा स्वीकार, तर मग भेटायचंय मुक्‍ताला?
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 28/06/2011 04:08 PM JAYASHREE said:
मुक्ताच्या या कार्यास माझ्या शुभेच्छा.
On 27/05/2011 09:03 AM Poonam said:
खूप छान मुक्ता. बदल घडवायचा असेल, प्रगती करायची असेल तर सुरवात ही स्वतः पासूनच करायला हवी. आणि याच मूर्तिमंत उदाहरण आज आमच्या समोर आहे. नक्कीच आम्हीही तुझ्या कार्यात सहभागी होत आहोत. पुन्हा एकदा तुझ हार्दिक अभिनंदन... :)
On 13/05/2011 12:52 PM ASHOK PHALLE said:
A VERY NICE WORK MUKTA TAI. PLEASE PROVIDE YOUR MAILS & MOBILE SO TAHT OTHERS CAN ALSO CONTACT YOU TO INCREASE YOUR ACTIVITY IN VARIOUS LOCATIONS IN OUR COUNTRY. ASHOK
On 13/05/2011 12:39 PM vikas shelke said:
मुक्ताचे कार्य खूपच प्रेरणादायी असून, तरुण पिढी त्यातून नक्कीच काहीतरी घेईल, तिच्या या कार्यास माझ्या शुभेच्छा.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: