Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

धर्मस्थळांची 'श्रीमंती'!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 15, 2011 AT 12:45 AM (IST)
Tags: saptrang,   temple,   maharashtra
सुट्ट्या सुरू झाल्या की मुला-बाळांसह पर्यटनाला जाण्याचे बेत जसे ठरतात; तसेच या काळात देवधर्मासाठी धर्मस्थळी जाण्याच्याही योजना आखल्या जातात. अशा भाविकांची संख्या खूप मोठी असते. गावाकडची यात्रा चुकवायची नाही, असाही काहींचा पण असतो. राज्यातील सर्व धर्मस्थळे आता गर्दीने फुलू लागली आहेत. या देवस्थानांच्या स्थितीवर नजर टाकली तर वेगळेच चित्र समोर येते. वार्षिक उलाढाल 250 कोटी, दरदिवशीची जमा सुमारे 50 लाख आणि बॅंकेतील ठेव आहे 729 कोटी...ही काही एखाद्या कंपनीची आकडेवारी नव्हे! हा तपशील आहे शिर्डी साई संस्थानचा. दुसरे उदाहरण म्हणजे गोरगरीब जनतेचा पांडुरंग. मात्र, त्याची मालमत्ता प्रचंड दागिने व सहा एकर जमीन आणि बॅंकेत 40 कोटी रुपये. तुळजाभवानी मंदिराचीही अशीच मालमत्ता. 50 किलो सोने वितळवून त्याची सुवर्णठेव योजनेत गुंतवणूक, त्याचे व्याजच काही लाख रुपये, विविध बॅंका व किसान विकास पत्रांतील गुंतवणूक 27 कोटींपेक्षा जास्त!

राज्यातील आघाडीच्या उद्योग कंपन्यांची मालमत्ता आपण वाचत आहोत की काय, असा प्रश्‍न पडावा अशी मालमत्ता राज्यातील देवळांची व देवस्थानांची आहे.

या मंदिरांची ही मालमत्ता बघितल्यावर "देव भावाचा भुकेला' या संतवचनातील खरेपणावर विश्‍वास ठेवावा का, असा प्रश्‍न पडतो. यातील संस्थानांच्या विश्‍वस्तपदी आपली निवड व्हावी, यासाठी सगळेजण का इच्छुक असतात, ते या मालमत्तेकडे बघितल्यावर लक्षात येते. या मंदिरांच्या विश्‍वस्त मंडळावर जाणे हे आमदारकीपेक्षा भाग्याचे असल्याचे काहीजण समजतात. अर्थात देवाची सेवा (!) आणि आपला स्वार्थही साधल्या जाणाऱ्या या पदाचे आकर्षण कोणाला का नाही वाटणार? मध्यंतरी साई संस्थानच्या एका विश्‍वस्तांनी आपल्या मंदिराची मक्तेदारी टिकवण्यासाठी एक भन्नाट घोषणा केली होती. "यापुढे देशात ज्यांना साईमंदिर उभारायचे असेल, त्यांना आमची परवानगी घ्यावी लागेल,' ही ती घोषणा. देवस्थानातून मिळणाऱ्या प्रचंड रकमेवर असणारी त्यांची ही "ससाण्या'सारखी नजर केवळ साईबाबांच्या भक्तीपोटी होती, असे म्हणता येईल काय?

कोणे एके काळी पुजाऱ्यांनी व ब्राह्मणवर्गाने तळागाळातल्या भक्तांना देवाच्या दर्शनापासून लांब ठेवले होते. आज व्हीआयपी दर्शन पास, अधिक पैसे मोजून त्वरित दर्शन असल्या प्रथा पाडून हे नवे विश्‍वस्त पुन्हा एकादा आर्थिक वर्गवादाच्या रूपाने "नवी ब्राह्मणशाही' आणू पाहत आहेत. मंदिराच्या तिजोऱ्यांमधील धन कोटी कोटीची उड्डाणे घेत आहे; मात्र दरदिवशी भक्तांच्या हालांत प्रचंड भर पडत आहे. लक्षावधी रुपये मिळवणाऱ्या या मंदिरांच्या परिसरातील अस्वच्छता बघितली तर आत देवळात जाणेसुद्धा नकोसे वाटावे! भक्तांना दर्शनाचे सुखही मिळू न देणारे हे विश्‍वस्त भक्तांसाठी साधी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करत नाहीत; मग बाकी सोई-सुविधांबद्दल काय बोलावे? अक्कलकोट संस्थान किंवा शेगाव येथील गजानन महाराज मंदिराचे विश्‍वस्त यांचा अपवाद वगळता आज मंदिरे आणि देवस्थाने पैसे कमावण्याच्या टांकसाळी बनल्या आहेत. त्यांची बॅंक खाती व कोट्यवधीच्या ठेवी याचीच तर साक्ष देत आहेत!

या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्यांतील काही प्रमुख तीर्थक्षेत्रांचा मांडलेला हा ताळेबंद.

श्रीक्षेत्र पंढरपूर 'भाविकांची लूट; मंदिराच्या भिंतीलगत कचराकुंडी
श्रीविठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या आतील स्वच्छता मंदिर समितीचे सफाई कर्मचारी तर मंदिराच्या परिसरातील स्वच्छता नगरपालिकेचे सफाई कर्मचारी करतात. अनेक वर्षे मुख्य मंदिराच्या अगदी भिंतीलगत स्वच्छतागृह आणि कचराकुंडी होती आणि दर्शनाला मंदिरात जाणारी रांग तेथूनच जात असे. दर्शनाला जाणाऱ्या लोकांना तेथील दुर्गंधीचा त्रास होत असे. नुकतेच ते स्वच्छतागृह बंद करण्यात आले आहे. कचराकुंडी मात्र अजून तिथेच आहे. शहरात घाण दिसत असली तरी मंदिराच्या लगतचा रस्ता कायम स्वच्छ असावा, यासाठी नगरपालिका लक्ष देताना दिसते.

भक्तांची लूट
श्रीविठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकांना दर्शन झाले की, लगेच देवापुढे दक्षिणेची मागणी केली जाते. श्रीविठ्ठलाकडे नारळ, प्रसाद देऊन; तर श्री रुक्‍मिणीमातेकडे भक्तांना साडी देऊन जादा दक्षिणेची मागणी केली जाते. एखाद्या भक्ताने पैसे दिले नाहीत तर दिलेला नारळ, प्रसाद परत घेतला जातो. "भाविकांकडे दक्षिणेची मागणी करायची नाही; स्वतःहून भाविक देवापुढे जी दक्षिणा ठेवतील, तीवरच समाधान मानायचे,' असे गेल्या महिन्यात बडव्यांनी ठरवले आहे; परंतु प्रत्यक्षात नारळ, प्रसाद देऊन भाविकांकडून पैसे घेणे सुरूच आहे.

सरकारी योजना
मंदिरासाठी सरकारच्या योजना राबवल्या जात नाहीत. मंदिराच्या दैनंदिन व्यवस्थेसाठी आणि भाविकांना सुविधा देण्यासाठी सरकारने मंदिर समितीची स्थापना केलेली आहे. या मंदिर समितीच्या माध्यमातून दर्शनाच्या रांगेसाठी दर्शन मंडप बांधणे, वारकऱ्यांना राहण्यासाठी भक्तनिवास बांधणे, यात्राकाळात दर्शनाच्या रांगेसाठी तात्पुरते लाकडी "बॅरिकेड' करून घेणे, रांगेतील लोकांना पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था करणे अशा सुविधा समितीच्या माध्यमातून दिल्या जातात.

उत्पन्नाची साधने
श्रीविठ्ठल-रुक्‍मिणीचे मंदिर उघडल्यापासून ते बंद होईपर्यंतच्या काळात देवाच्या पायाजवळ भक्तांकडून जी दक्षिणा वाहिली जाते, ती घेण्याचा अधिकार मिळवण्यासाठी आदल्या दिवशी लिलाव होतो. या लिलावाच्या माध्यमातून मंदिर समितीला उत्पन्न मिळते. याशिवाय दक्षिणापेट्यांमध्ये जमा होणारी दक्षिणा, देणगी म्हणून जमा होणारी रक्कम, विविध वस्तुरूपी देणग्या, भक्तनिवासमध्ये एक खोली बांधून देणे किंवा एखाद्या मोठ्या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण भक्तनिवास बांधून मिळणे.

वार्षिक उलाढाल
देवस्थानची वार्षिक उलाढाल 21 ते 22 कोटी रुपये आहे.
एकूण मालमत्ता
देवस्थानने विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये 40 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. याशिवाय पंढरपूर येथील सर्व्हे क्रमांक 59 मधील सहा एकर जागा, श्रीविठ्ठलमंदिरालगत बांधण्यात आलेले संत तुकाराम भवन, दर्शनाच्या रांगेसाठी बांधलेल्या दर्शन मंडपाची इमारत ही स्थावर मालमत्ता आहे. श्रीविठ्ठल-रुक्‍मिणीचा पारंपरिक दागिन्यांचा अमूल्य असा खजिना आहे.

शिर्डी : रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा!
साईबाबांची नगरी म्हणून आता शिर्डीची देश-विदेशात ओळख होत आहे. साईभक्तांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने 2000 च्या शासन निर्णयाप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी संस्थानच्या विश्वस्त मंडळावर टाकली आहे. राज्यात शिर्डी, पंढरपूर व सिद्धिविनायक ही तीनच देवस्थाने सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र नियमावली आहे. शिर्डीत येणाऱ्या भक्ताला पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम संस्थान करते. आलेल्या भक्तांना रांगेत दर्शन व्यवस्था करणे, भक्ताला कमी दरात प्रसाद पुरविणे आदी कामे तर संस्थान करतेच. याशिवाय संस्थानचे सर्वात महत्त्वाचे काम आरोग्यसेवेचे आहे. दररोज सुमारे 700 रुग्ण बाह्यरुग्ण विभागाच उपचार घेतात. पूर्वी एक रुपयांत 15 दिवस उपचार मिळायचे. आता ते दहा रुपयांत मिळतात. रुग्णसेवा ही खरी ईश्वरसेवा मानून इथं काम होतं. नफा मिळविणं हा उद्देश इथं नाही. हृदयशस्त्रक्रियेसाठी रुग्णालय आता नावलौकिक मिळवीत आहे. जीवनदायी योजनेच्या माध्यमातून दारिद्य्ररेषेखालील रुग्णांना सर्व उपचार दिले जातात. मूत्रपिंडविकार, नेत्रविकार, अपंगत्व आदींबाबत इथं शिबिरे घेतली जातात. पुण्या-मुंबईच्या तुलनेत अतिशय अल्प दरात इथं आरोग्‌ तपासण्या केल्या जातात. शिक्षण सेवेचंही काम संस्थान करतं. शिर्डीची वाढती गर्दी लक्षात घेऊन जागतिक दर्जाचं मोठं प्रसादालय बांधण्यात आलं आहे. तिथं दररोज 30-35 हजार भाविक प्रसाद घेतात. याशिवाय न्याहारी, लाडूचा प्रसाद याचीही व्यवस्था कणात आली आहे. सध्या भाविकांसाठी सुमारे 1200 खोल्या आहेत. पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत भक्तनिवास उपलब्ध आहे. आणखी दोन हजार खोल्यांचं बांधकाम प्रगतिपथावर आहे. येत्या चार महिन्यांत तिथेही भाविकांची राहण्याची सोय होईल.
साईदर्शनानंतर भक्त आता शिर्डीला फारसे थांबत नाहीत, हे लक्षात घेऊन संस्थानने "साईबाबा थीम पार्क' उभारायचे ठरविले आहे. साईसृष्टी व साईबाबांचा जीवनपट तिथे उलगडून दाखविला जाणार आहे. साईबाबांच्या लीला, त्याचे जीवन भक्तांना दृक-श्राव्य माध्यमातून कळणार आहे. त्याचबरोबर गर्दीचे विभाजन होऊन व्यवस्थापन सोपे होईल. दर्शनरांगाचे व्यवस्थापन करण्याबरोबरच तिथे आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सहाशे खाटाचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे.

उत्पन्नाची साधने
साई संस्थानला भक्तांच्या देणग्या वगळता उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नाही. साई संस्थानने गेल्या काही वर्षांत पैसे मोजण्याच्या व्यवहारात पारदर्शकता आणली आहे. साईभक्ताचे सहकार्य घेतल्याने कामेही लवकर उरकतात. दर तीन दिवसांनी साधारणतः सव्वा ते दीड कोटी रुपये भक्तांच्या देणगीतून मिळतात. संस्थानची वार्षिक उलाढाल सुमारे अडीचशे कोटी रुपये आहे. एक हजार कोटी रुपयांची मालमत्ता असून त्यात 729 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थानच पायाभूत सुविधांवर खर्च करीत असताना सरकारचा हात मात्र आखडता आहे. उलट, विमानतळासाठी साईबाबांच्या झोळीत हात घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. साईबाबांच्या समाधीला आणखी सात वर्षांनी शंभर वर्षे होत असताना केंद्र व राज्य सरकारने एक हजार कोटी रुपये देऊन शिर्डीचा एकात्मिक सर्वांगीण विकास करण्याची आवश्‍यकता आहे.

शहरात अस्वच्छताच
मंदिर परिसर स्वच्छ दिसत असला, तरी शहराची अवस्था तेवढी चांगली नाही. पादचारी पूल, वाहतुकीची कोंडी टाळण्याची उपाययोजना, सर्व शिर्डीला शुद्ध पाण्याची व्यवस्था, चांगले रस्ते, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आदी कामं करायला हवीत. त्यातील काही कामं चालू आहेत, हा भाग वेगळा. संस्थानकडून भक्तांना सुविधा मिळत असल्या, तरी गर्दीच्या काळात "साईराम' कडून फसवणूक होते. अचानक दर वाढून लूट केली जाते. सरकार 15 वर्षांपूर्वी शिर्डीसाठी निधी देत असे. आता सरकारने निधी देण्याऐवजी संस्थानच्या निधीवरच डोळा ठेवला आहे.

सिद्धिविनायक : कालाय तस्मै नम: !
मुंबईसारख्या बहुविध संस्कृतीने नटलेल्या महानगराचा देवाधिदेव म्हणजे श्रीगणेश. मराठी संस्कृतीने कार्यारंभी गणेशाला आवाहन करण्याचा परिपाठ आजही जपला आणि मुंबईत नशीब काढायला आलेल्या अनेकांनी मराठी संस्कृतीचा हा धागा स्वीकारला. प्रभादेवी दादर हा मुंबईचा केंद्रबिंदू. तेथील सिद्धिविनायकाच्या स्थापनेला आता 200 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अक्‍कलकोटच्या स्वामी समर्थांच्या एका शिष्योत्तमाने मंदार वृक्षातून गणेशप्रतिमेचा उदय होईल, असा दृष्टान्त दिला आणि तळ्याकाठी श्रीगणेशाचा उदय झाला. स्वयंभू गणेशाचे महत्त्व तसेही मोठे. मुंबईचे मूळ निवासी असलेल्या आगरी समाजातील पाटील आडनावाच्या एका दांपत्याने आज प्रसिद्धीस आलेले हे मंदिर बांधले. दादरपासून सायनपर्यंतचे मुंबईकर गेली कित्येक वर्षे या देवाधिदेवाचे दर्शन घेत असले तरी सिद्धिविनायकाच्या आजच्या महिम्याला सुरवात झाली ती साधारणत: 1965-70 च्या आसपास. मुंबई त्या काळी चहूबाजूंनी फुगत चालली होती आणि रोजगाराच्या शोधात मुंबई गाठणाऱ्या हजारोंना परक्‍या शहरात आधार हवा होता. प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाने तो आधार पुरवायला प्रारंभ केला आणि म्हणता म्हणता मंदिराचा महिमा वाढत गेला. सुपरस्टार अमिताभ बच्चनला "कुली' सिनेमाचे शूटिंग सुरू असताना अपघात झाला तेव्हा अवघा भारतदेश चिंताक्रांत झाला होता. जया बच्चन यांनी सलग चार मंगळवार सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर अमिताभच्या प्रकृतीला आराम मिळाल्याची दंतकथा प्रसिद्ध झाली. मग देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्‍तांचा ओघ प्रभादेवीकडे वाहू लागला.

वार्षिक उलाढाल
आज मंदिराकडे तब्बल 122 कोटींची जमा आहे. दरवर्षी 8 ते 10 कोटींची दक्षिणा मंदिराच्या दानपेटीत जमा होत असते. क्‍वचितप्रसंगी एखादा हिऱ्याचा दागिनाही देवाधिदेवाला अर्पण केला जातो. दहा दिवसांच्या गणेशोत्सवातल्या लालबागचा राजा नवसाला पावतो म्हणून तेथे बड्या हस्तींची रीघ लागते; पण सिद्धिविनायकाचे महत्त्वही वाढतच जाते आहे. मंगळवार हा सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा खास वार. या दिवशी हजारो भाविक मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रभादेवी गाठतात. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला-अंगारकीला-सरासरी 20 लाख भाविक श्रीचरणी नतमस्तक होतात. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच दानपेटीही फुगत गेली. तिरुपतीचे देवस्थान आणि शिर्डीच्या साईबाबांपाठोपाठचे श्रीमंत देवस्थान म्हणून सिद्धिविनायकाचे नावही घेतले जाऊ लागले. पैसा स्वत:बरोबर वादही घेऊन आला. राज्य सरकारने मंदिराची जागा कायदा करून ताब्यात घेण्यापासूनचे सोपस्कार हळूहळू पार पडू लागले. मंदिराच्या मूळ वास्तूची मालकी जागा असलेले कृष्णकुमार पाटील हे, ही आमच्या कुटुंबीयांची जागा असल्यामुळे आम्हाला येथे मालकीपट्टा द्यावा, अशी मागणी करीत सरकारकडे गेले. अर्ज-विनंत्यांना सरकार बधत नाही हे बघताच पाटील न्यायालयात गेले. राज्य सरकारतर्फे सिद्धिविनायक न्यासावर नेमल्या जाणाऱ्या 12 संचालकांमध्ये पाटील यांचा समावेश करावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या; पण पाटील यांचा स्वभाव शीघ्रकोपी असल्याने त्याबाबत कुणीही उत्सुकता दाखवत नाही. दानराशीत जमा होणाऱ्या निधीतून गरजूंना वैद्यकीय मदत देण्याचा निर्णय घेतला गेला. राज्यभरातून किमान दहा हजार अर्ज या न्यासाकडे जमा होत असतात. यासाठी 5 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांना मदत करण्याचा निर्णयही मधल्या काळात घेण्यात आला. त्यातून एका शिक्षणसंस्थेला तब्बल 5 कोटींची मदत करण्यात आली. सोईच्या संस्थांना खिरापत वाटण्याचा हा निर्णय वादग्रस्त झाला आणि न्यायालयाने देवस्थानाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली. आज या एकसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल बासनात आहे. 12 संचालकांमध्ये आपला नंबर लागावा, यासाठी गणेशभक्तांची रीघ लागली असते. न्यासाचे अध्यक्ष सुभाष मयेकर जातीने सर्व कारभारात लक्ष घालतात. मात्र, भाविकांना आज हे मराठमोळे मंदिर श्रीमंतांचे झाल्याचे सलत असते. त्यातच या हायप्रोफाईल मंदिरावर दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्‍त करण्यात आल्यानंतर मंदिराचे संरक्षण करण्यासाठी भिंत उभारली गेली. या भिंतीमुळे येण्याजाण्यास अडचण होते, अशी याचिका परिसरातील रहिवाशांनी न्यायालयात केली होती. आता ती निकालात निघाली; पण ही भिंत रोषाचा विषय ठरली ती ठरलीच.

व्हीआयपी पासाने दर्शन
मंगळवारच्या व्हीआयपी दर्शनासाठी मोजावे लागणारे 50 रुपये हाही वादाचा विषय आहे. कित्येक मुंबईकर पार बोरिवली-दहिसरपासून चालत दर्शनाला येतात. काहींना एवढा वेळ नसतो. त्यामुळे 50 रुपये मोजून अर्ध्या तासात दर्शन होत असेल तर भाविकांची त्याला ना नसते. देवदर्शनासाठी पैसे आकारावेत, याला काही मंडळींचा विरोध आहे; पण काळाचा महिमा बदलला आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सिद्धिविनायकात पोचणाऱ्या संजय दत्तच्या प्रतिमा दूरदर्शनवर झळकण्याच्या काळात "कालाय तस्मै नम:' म्हणायचे आणि हात जोडायचे....झाले!

अक्कलकोट : सर्व भक्‍तांना समान वागणूक; मोफत दर्शन
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात.
वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वच्छता व धार्मिक पावित्र्य राखले जाते. मंदिराच्या आतील भाग, दक्षिणद्वारातून आत प्रवेश केल्यावरचा श्री गणेशमंदिर मार्ग, जोतिबा मंडप व मुख्य वटवृक्षाखालील परिसरात स्वच्छ राखली जाते. मात्र, मंदिराच्या बाहेरील परिसरात नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता पसरली आहे. येथील मंदिरात दर्शनासाठी कोणत्याही स्वरूपात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मंदिरात भक्‍तांची लूट होत नाही; तसेच भक्‍तांना मर्यादित स्वरूपात स्वामींचा अंगारा व बेसनाचा लाडू प्रसाद म्हणून मोफत देण्यात येतो. "पॉकेट फोटो'सुद्धा मोफत दिला जातो. विशेष म्हणजे सर्वाना समान वागणूक देण्यात येऊन दर्शन दिले जाते. "व्हीआयपी' रांग व सर्वसामान्य भक्‍तांची रांग असा प्रकार येथे नाही. त्यामुळे भक्‍तांमध्ये दर्शनानंतर अत्यंत समाधानाचे वातावरण असते.

सरकारी विकास योजना नाहीत
मंदिरासाठी सरकारकडून कोणताही निधी मिळत नाही. मंदिर व्यवस्थापनासीठी विश्‍वस्त मंडळ आहे. भाविकांकडून जमा होणाऱ्या पैशातूनच मंदिराची देखभाल होते. तीर्थक्षेत्र असूनसुद्धा अक्कलकोटला तीर्थक्षेत्र विकासासाठी पुरेसा निधी मिळाला नाही; तसेच सरकारने तीर्थक्षेत्र म्हणून कोणतीही विकासाची योजना अद्याप राबविली नाही. सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखडा अक्‍कलकोट नगरपालिकेने नगरविकास खात्याकडे अनेक वर्षांपूर्वी सादर केलेला आहे. मात्र, त्यास वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या. मंदिर परिसरातील व मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते खराब आहेत. ते चांगले होण्याची गरज आहे.

उत्पन्नाची साधने
अक्‍कलकोट हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तीर्थक्षेत्र. स्वामी समर्थ देवस्थानच्या उत्पन्नाच्या साधनात प्रमुख म्हणजे भक्‍तांनी दिलेली देणगी व अभिषेक शुल्क होय; तसेच देवस्थानचे भक्‍तनिवास येथे निवासासाठी नाममात्र देणगी शुल्क आकारले जाते. अभिषेकाच्या 25 रुपयांत नारळ, खडीसाखर व अंगारा भक्तांना दिला जातो; तसेच देवस्थानाच्या भक्‍तनिवासातील खोल्यांना नाममात्‌ 250 रुपये शुल्क असून तेथील स्वच्छता, कर्मचारी, सेवेकरी व देखभालीठी त्याहून अधिक खर्च होतो. त्यामुळे भक्‍तांच्या सोईसाठी आर्थिक झळ सोसून देवस्थान भक्‍तनिवास चालविते. साधारणतः वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानची वर्षभराची उलाढाल अदजे तीन कोटी रुपये आहे; तसेच वटवृक्ष देवस्थानची मालमत्ता भक्‍तांच्या सोईसाठी वापरण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने भविष्यात भक्‍तांना विविध सुविधा देण्याकरिता देवस्थानने 20 एकर जागा घेतली आहे; तसेच साडेपाच कोटींचे भक्‍तनिवास, अंदाजे 25 कोटी रुपयांचे गरिबांसाठी 200 खाटांचे नियोजित रुग्णालय होत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्‍निक कॉलेजची साडेतीन कोटीची इमारत व एक कोटी रुपयांचे वसतिगृह देवस्थानने उभे केले आहे. वटवृक्ष देवस्थानकडे येथील ऐतिहासिक विठ्‌ठलमंदिर, राममंदिर व मुरलीधराचे मंदिर आहे. देवस्थानची गोशाळा आहे. भक्‍त हा केंद्रबिंदू मानुन देवस्थान विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्य करत असते.

शेगाव : निःस्वार्थ सेवाकार्य; कमालीची स्वच्छता
निःस्वार्थ भावनेने केले जाणारे सेवाकार्य व कमालीची स्वच्छता यासाठी देशभरात शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचा लौकिक आहे. नित्य कार्यक्रम असोत की, यात्रेच्या निमित्ताने होणारी लाखो भाविकांची गर्दी असो, या ठिकाणी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.
संस्थानमध्ये सुमारे तीन हजारांवर सेवाधारी आहेत. कुठल्याही प्रकारचे मानधन किंवा पगार न घेता "श्री'चरणी आपली सेवा रुजू व्हावी, या भावनेतून ते सेवा देत असतात. भाविकाने टाकलेला साधा कागदाचा तुकडा असो की हार किंवा फुलांची पाकळी असो, पडल्यापासून दोन मिनिटांच्या आत ती उचलून स्वच्छता राखली जाते. या तत्परतेसंदर्भात संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील सांगतात की, या ठिकाणी कुणावरही काम लादले जात नाही; तर अंतरीच्या ऊर्मीतून हे सेवेकरी स्वतःहून सेवेला वाहून घेतात.

लूट होऊ नये याची काळजी
शेगाव शहरात भाविक आल्यापासून त्याची कुठल्याही प्रकारे लूट होऊ नये, याची काळजी संस्थान घेते. शहरात जागोजागी फलक लावून संस्थेच्या भक्तनिवासांची माहिती दिलेली असते. एकदा भाविक भक्तनिवासात आला की, त्याची कुठेही लुबाडणूक होणार नाही हे निश्‍चित. इतर ठिकाणी दिसणारी पुजाऱ्यांची मक्तेदारी किंवा अमुक एक पूजा घालण्यासाठी, अभिषेकासाठी कुठलीही सक्ती केली जात नाही. रंका पासून रावापर्यंत प्रत्येकाला एकाच रांगेने समान अंतरावरून "श्रीं'चे दर्शन घेता येते. भक्तनिवासत अत्यल्प दरात खोल्या व भोजनाची व्यवस्थाही प्रत्येकाला परवडेल अशीच आहे. ज्यांच्याकडे पैसाच नाही, अशांसाठीही महाप्रसादाच्या रूपाने सर्वतोपरी व्यवस्था केली जाते.

देणग्यांमधूनच सेवाकार्य
कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांची गरज संस्थानला पडत नाही. भाविकांनी दिलेल्या देणगीतूनच 42 प्रकारची सेवाकार्ये चालविली जातात. मागील वर्षी सरकारने देऊ केलेला एक कोटी 31 लाखांचा निधी संस्थानने परत करून आपल्या परीने समाधी शताब्दी महोत्सवात भाविकांची व्यवस्था केली.

उत्पन्नाची साधने
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच भाविकांनी दिलेली धान्याच्या व पैशाच्या स्वरूपातील देणगी हेच संस्थानच्या उत्पन्नाचे साधन होय. गेल्या वर्षीपर्यंत सरासरी 20 ते 22 कोटी रुपयांची नगदी देणगी वर्षभरात संस्थानकडे जमा होते. याशिवाय अनेक वेळा निनावी धान्य, भाजीपाला, साखर, तेल आदींची देणगी महाप्रसादासाठी मिळते.
संस्थानच्या वतीने शेगावातील भक्तनिवास, आनंद सागर, मंदिर, वारकरी शिक्षण संस्था, धर्मार्थ दवाखाना याचबरोबर ओंकारेश्‍वर, त्र्यंबकेश्‍वर, आळंदी, पंढरपूर आणि बुलडाणा जिल्ह्यातील गिरडा या सर्व ठिकाणची मिळून संस्थानची 25 ते 30 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. संस्थानकडे वरील सर्व ठिकाणी मंदिर, भक्तनिवास, आनंद सागर मिळून स्थावर मालमत्ता आहे. संस्थान कुठेही पैसे कमावण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करीत नाही.

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर : भाविकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिरात सर्वसाधारणतः दिवसाला 15 ते 20 हजार भाविक येत असल्याची नोंद देवस्थान समितीत आहे. त्यामध्ये परगावच्या भाविकांची संख्या 10 हजारांवर आहे. महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी 120 कोटींचा निधी सरकारने नुकताच मंजूर केला आहे. त्यातून भाविकांना विविध सोई-सुविधा मिळणे अपेक्षित आहे.

भक्तनिवास दूर अंतरावर
महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी धर्मशाळा आहे, ती शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या टेंबलाईवाडी टेकडीजवळ. राज्यातील अनेक मोठ्या व काही महत्त्वाच्या मंदिरातही मंदिराजवळ भक्तनिवासाची सोय समितीमार्फत करण्यात येते; परंतु महालक्ष्मी मंदिरात अशी सोय नाही. त्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे. मंदिराच्या आतील बाजूस स्वच्छता राखणे, अतिक्रमण काढणे, मंदिराचा बायपास म्हणून होणारा वापर रोखणे असे विविध पातळ्यांवरील नियोजन होण्याची गरज आहे. भक्तांच्या सुविधांवर भर देण्यासाठी ठोस योजना तयार करण्याची आवश्‍यकता आहे. तब्बल एक कोटी रुपये खर्चून, कोर्ट-कचेऱ्या करून महालक्ष्मी मंदिराच्या आवारात बसविलेल्या न तापणाऱ्या फरशीवर आता पुन्हा मंडप उभारावा लागतो आहे. मध्यंतरी या फरशीवर मॅटचाही प्रस्ताव पुढे आला होता. आता दर उन्हाळ्यात मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्गावर सुमारे सात हजार 757 चौरस फुटांचा मंडप उभारावा लागतो.

भाविकांची लूट
ंमंदिर परिसरातील काही दुकानदारांकडून सहा वारीऐवजी तीन वारी साड्यांची विक्री केली जाते. दुकानदारांना वेळोवेळी सूचना देऊनही फसवणुकीच्या प्रकारांना प्रतिबंध बसलेला नाही. परिसरात सुमारे 18 दुकाने आहेत. तेथे 75 रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतच्या साड्या मिळतात. पूजेचे साहित्य किंवा साड्यांची फारशी चौकशी न करता भाविक खरेदी करतात. साड्या-खणांच्या घड्याही न मोडता, आहे तशा त्या देवीला अर्पण केल्या जातात. स्वाभाविकच साडी सहा वारी आहे, की तीन वारी आणि खण चांगला आहे की जाळीच्या साडीपासून तयार केलेला आहे, यच विचारपूस फारशी कुणी करीत नाही. दुकानदारांवर देवस्थान समितीसह कुणाचेच नियंत्रण नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत.

नाशिक : सप्तशृंग गड उपेक्षित; भाविक वाऱ्यावर!
तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड या तीन पूर्ण शक्तिपीठानंतरचे सप्तशृंगगड हे सप्तशृंगी देवीचे अर्धे शक्तीपीठ. उत्तर महाराष्ट्रातील हे प्रमुख देवस्थान असले तरी गडाचा विकास कासवगतीने सुरू आहे. सप्तशृंगीगड विकास आराखडा 25 वर्षांपासून कागदावरच आहे. यापूर्वीचे दोन विकास आराखडे केवळ जागेअभावी लाल फितीत अडकले आहेत. वन विभागाची जागा विकासात मोठा अडसर ठरत आहे. नैसर्गिक सौंदर्य, प्रसन्न वातावरण उत्तर महाराष्ट्रासह गुजरातच्या सीमेला लागून असलेले महत्त्वाचे ठिकाण असूनही विकास आणि पर्यटनाच्या बाबतीत सप्तशृंगगड उपेक्षित आहे.
सप्तशृंगगड विकास आराखडा अंमलबजावणीसाठी जागाच नसल्याने अनेक अडचणी आहेत. येथे सुमारे 350 एकर जागा आहे. त्यातील बहुसंख्य जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. यामुळे सप्तशृंग गडावर विकासाच्या योजना सीमित आहेत.

अस्वच्छता ही चिंतेची बाब
देवस्थान परिसरात असलेली अस्वच्छता ही चिंतेची बाब आहे. सुलभ शौचालय, स्वच्छतागृह, कचरा कुंड्या, दैनंदिन सफाई भाविकांची संख्या लक्षात घेता तोकडी ठरत आहे. यामुळे उघड्यावर शौचास बसऱ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. चैत्रोत्सव, नवरात्रोत्सवात तर बिकट परिस्थिती असते. सप्तशृंग गडावर भाविकांची देवस्थान ट्रस्टपेक्षा प्रामुख्याने व्यापारी मोठ्या प्रमाणावर लूट करतात. दोन प्रमुख उत्सवांत खाद्यपदार्थांसह सर्वच वस्तूंचे दर दुपटीने वाढलेले असतात. निवास व्यवस्थाही तोकडी पडते. त्यामुळे भक्तांची अडचण होते. मुक्काम करण्याची इच्छा असूनही अनेक जण मार्गस्थ होणेच पसंत करतात.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पर्यटन विभाग असल्याने सप्तशृंगगड विकास आराखड्याच्या बाबतीत भाविकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे गडावर सुमारे 31 कोटी रुपये खर्चाची फेनिक्‍युलर सिस्टिम (रोपवे) बीओटी तत्त्वावर कार्यान्वित होत आहे. यात व्यापारी संकुल, रस्ते, पार्किंग, उद्यान, विश्रामगृह, सुलभ शौचालय यांसह सर्व सोई-सुविधा आहेत. ट्रॉलीनजीकच पाथ वे करण्याचा प्रस्ताव आहे. शासनाने नांदुरी-सप्तशृंगगड रस्ता करून दिला आहे. दोन पाणीपुरवठा योजना यापूर्वी झाल्या. मात्र, त्या कालबाह्य ठरल्या आहेत. दरड कोसळणे प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत राज्य सरकारने संरक्षक जाळ्या लावण्यासाठी 23 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. हे काम सध्या प्रगतिपथावर आहे. गडासाठी 11 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. या योजनेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. सरकारने गाव अंतर्गत रस्ते, नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता, पथदीप, वन पर्यटनस्थळ आणि गड विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.
गडावर विकासासाठी वन विभागाकडून ट्रस्टसह पर्यटन विकास महामंडळ, परिवहन महामंडळ यांना संयुक्तरीत्या 17 हेक्‍टर जागा अपेक्षित आहे. ही जागा वन विभागाने देऊन त्याऐवजी चांदवड येथील इंद्रायणीवाडीतील पर्यायी जागा घ्यावी, असा प्रस्ताव आहे. मात्र, तो लालफितीत अडकला आहे.

वार्षिक उलाढाल 8 कोटी रुपयांची
सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टची वार्षिक उलाढाल सुमारे आठ कोटी रुपये आहे. देवस्थानची स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे 30 कोटी रुपयांची आहे. अन्यत्र गुंतवणूक नसली तरी 13 किलो सोन्याचे गोल्ड बॉंड आहेत. जिल्हा न्यायाधीश ट्रस्टचे प्रमुख असून कळवण तहसीलदार सरकारचे प्रतिनिधी आहेत. अन्य पाच जणांची नियुक्ती जिल्हा न्यायाधीश करतात. सात जणांचे एकत्रित ट्रस्ट आहे. ट्रस्टचे कार्यालय, भक्तनिवास, प्रसादालय, धर्मशाळा आहे. ट्रस्टतर्फे आगामी काळात शिवालय तलावाजवळ वस्त्रांतरगृह, मोठे भक्तनिवास, प्रसादालय, रस्ते आदी कामांचे प्रस्ताव आहेत.
देवस्थान ट्रस्टला प्रामुख्याने दानपेटीतील दान, भाविकांच्या देणग्या, देवीला अर्पण होणाऱ्या साडी-चोळीची विक्री, सोन्या-चांदीचे अलंकार; तसेच धर्मशाळा आणि भक्तनिवासातून मिळणारा निधी ही उत्पन्नाची साधने आहेत. भाविकांच्या देणग्या आणि दान हेच ट्रस्टच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.

पर्यटनस्थळ म्हणून वाव
नैसर्गिक वैभव असलेल्या सप्तशृंग गडाच्या पर्यटन स्थळ म्हणून विकासाला मोठा वाव आहे. पर्यटकांना गड, सापुतारा, त्र्यंबकेश्‍वर, शिर्डी, शनीशिंगणापूर आणि धार्मिक महत्त्व असलेले नाशिक, सातत्याने खुणावत सत. देवदर्शनाबरोबरच पर्यटनाला चालना मिळण्यासाठी शिर्डीबरोबरच अन्य देवस्थानांचा विकास होणे गरजेचे आहे. सिंहस्थामुळे नाशिक आणि त्र्यंबक यांना निधी मिळतो त्याचप्रमाणे चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवासाठी सप्तशृंग गडाला विशेष विकास निधी प्राप्त व्हावा.

अशा अडचणी; अशा मागण्या
* वन विभागाने सरकारला व ट्रस्टला जागा द्यावी.
* जागेअभावी गडाचा विकास रखडला.
* भाविकांचा तिन्ही ऋतूंत राबता.
* पायाभूत सुविधा मर्यादित.
* निवासव्यवस्था ही मुख्य अडचण.
* गडावर औषधी वनस्पतींचे भांडार.
* पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह प्रस्तावित.
* ट्रस्टकडे निधी असूनही कामांचा अभाव.
* उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसह भाविकांचे नवसाचे ठिकाण.
* चैत्रोत्सवात लाखो भाविकांची पायी यात्रा हे आकर्षण.
* पार्किंगसाठी जागेची अडचण.
* भारतातील पहिली फेनिक्‍युलर यंत्रणा सप्तशृंगगडावर.
* फेनिक्‍युलर प्रकल्पासाठी वनविभागाची दहा एकर जागा.
* वन जमीन हस्तांतरणासाठी राज्य व केंद्र सरकार यांच्यात समन्वयाची गरज.
* दरड प्रतिबंध उपाययोजना गरजेच्या.

तुळजापूर : स्वच्छतेबाबत 'आयएसओ'; मात्र भाविकांची फसवणूकही
तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याचा प्रयत्न मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. गेल्या वर्षीपासून मंदिर परिसरात चांगली स्वच्छता असते. त्यामुळे देवस्थान समितीला आयएसओ नामांकन मिळाले आहे. राज्यातील तीर्थक्षेत्रास आयएसओ नामांकन मिळविणारे पहिले तीर्थक्षेत्र म्हणून तुळजाभवानी देवस्थानची ओळख झाली आहे. कार्यालयीन कामकाजात कागदपत्रांची व्यवस्थित जुळवाजुळव करण्यात आली आहे. मात्र, मंदिरात आराध्यसेवेसाठी बसणाऱ्या परिसरात अस्वच्छता जाणवते. तेथे महिलांना आंघोळीची चांगली सोय नाही. कल्लोळ तीर्थकुंडात आंघोळीव्यतिरिक्त भाविक निर्माल्य टाकतात. त्यामुळे तिथे अनेक वेळा घाण पाणी असते. पाण्यात केळी, साखर, मध अशा पदार्थांची रेलचेल असल्यामुळे घोंघावणाऱ्या माश्‍यांचा प्रादुर्भाव अनेक वेळा दिसतो.

भक्तांची लूट
तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक भावनेने अनेक वस्तू खरेदी करतात. त्यामध्ये हळद-कुंकू, साड्या, प्रासादिक वाण अशा बाबींचा समावेश असतो. भाविकांना केवळ एक दुकान सोडल्यास (नागनाथ वझे) यांच्याशिवाय चांगले हळद-कुंकू मिळत नाही; तसेच साड्यांचे तुकडे, कागदामध्ये गुंडाळून "सीा आहे,' असे दाखवून विक्रेते भाविकांना "साड्या' विकतात. चाणाक्ष भाविक साडी उघडल्याशिवाय खरेदी करीत नाहीत. मात्र, काही भाविक भावनेच्या भरात काहीही न पाहता खरेदी करतात. त्यामुळे भाविकांची फसवणूक होते. पूजेचे आमिष दाखवून अनेक भामटे भाविकांना फसविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पुजारी ओळखपत्रामुळे काही प्रमाणात आळा बसलेला आहे. यापूर्वी भाविकांनी दक्षिणा अर्पण केल्यानंतर देवस्थान समिती कंत्राटदारामार्फत (सिंहासन पेटीचा लिलाव घेणारे कंत्राटदार) नारळ देत असे. मात्र, अलीकडे नारळ देण्याचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे पैसे अर्पण करूनही प्रसादाचा नारळ मिळेलच का, याबाबत शाश्‍वती राहिली नाही. आता देवस्थान समिती स्वतः पेटी चालविते. देवस्थान समितीने भाविकांना बुंदीच्या लाडूची प्रसादविक्री सुरू केली आहे. त्यात मुबलक नफा देवस्थान समितीला मिळतो. (साडेसहा रुपयांना खरेदी आणि 15 रुपयांना पाकीटविक्री आहे.)

सरकारी योजना
सरकारी योजना देण्यासंदर्भात देवस्थान समितीवर सरकारची खप्पा मर्जी असल्याचे दिसते. देवस्थान समितीला तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजाभवानी सैनिकी शाळा; याशिवाय युतीच्या कालावधीत अनुदानित वृद्धाश्रम मंजूर करण्यात आला आहे. एक कोटी 20
लाख रुपये खर्च करून वृद्धाश्रम सुरू करण्यासाठी देवस्थानला पैसे देण्यात आले. मात्र, देवस्थान समितीने वृद्धांना आवाहन करूनही गेल्या 15 वर्षांपासून वृद्धाश्रम सुरू झालेला नाही. अभियांत्रिकी महाविद्यालय कमी शुल्क घेऊन सेवाभावी भावनेतून चालविले जाते. सैनिकी शाळा ही केवळ भटारखाना म्हणून चालविली जाते. तेथे कोणत्याही सैनिकी प्रशिक्षणाच्या सुविधा नाहीत.

उत्पन्नाची साधने
तुळजाभवानी देवस्थानची उत्पन्नाची साधने ः वार्षिक लिलाव, देणग्या, गुप्त दान, पोस्टाद्वारे मनीऑर्डर, अभिषेककर, सिंहासन पूजेसाठी दह्याचा 351 आणि श्रीखंडाच्या सिंहासनातून 451 रुपयांची करपावती फाडली जाते. तुळजाभवानी देवस्थान घाटशीळ मंदिर, पापनास मंदिर, चिंतामणी गणेश मंदिर, दत्तामंदिर, वाहिक वस्त्र, नारळ, खजूर आदी आठ दुकाने यातून देवस्थान समितीला दोन कोटी 27 लाख 61 हजार 500 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. देवस्थानमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या दक्षिणेस सिंहासनपेटी असे म्हटले जाते. ता. 8 ऑक्‍टोबर 2010 पासून 13 एप्रिल 2011 पर्यंत एक कोटी 96 लाख 96 हजार 425 रुपये जमा झाले आहेत. देवस्थान समितीची साधारण उलाढाल मार्च 2009 पर्यंत 13 कोटी 78 लाख आहे.

मालमत्ता आणि स्थावर गुंतवणूक
तुळजाभवानी देवस्थान समितीची गुंतवणूक 27 कोटी 3 लाख 800 रुपयांची आहे. किसान विकास पत्रे, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि मराठवाडा ग्रामीण बॅंकेत ठेवी आहेत.
देवस्थान समितीने 50 किलो चोख सोने भारतीय रिझर्व बॅंकेच्या "मीन्ट'मध्ये वितळवून सुवर्णठेव योजनेमध्ये ठेवले आहे. तुळजभवानी देवस्थान समितीकडे 50 किलो ठेवलेल्या चोख सोन्यासह मार्च 2011 पर्यंत 86 किलो 592 ग्रॅम 862 ग्रॅम सोने आहे. याशिवाय चांदी 723 किलो 441 ग्रॅम आणि 330 मिलिग्रॅम आहे. सुवर्णठेव योजनेतून देवस्थान समितीला महिन्याला सोन्याच्या किमतीवर अदमासे दीड लाख रुपयांपर्यंत व्याज मिळते.

खासगीकरणाचा वरचष्मा
तुळजाभवानी मंदिरात देवस्थानच्या अनेक बाबी कंत्राटदारांना दिल्या जातात. खासगी कंत्राटदार तेथे उत्पन्न घेतात आणि देवस्थानला रक्कम भरतात. तुळजाभवानी देवस्थान 1909 ला सरकारच्या निगराणीखाली आले. त्या वेळेपासून देवस्थानची वाटचाल चालू आहे.
तुळजाभवानी देवस्थानची जमीन एकूण 668 हेक्‍टर आहे. सोलापूर जिल्ह्यात तुळजापूर आणि उस्मानाबाद तालुक्‍यात तुळजाभवानी देवस्थानच्या जमिनी आहेत.

माहूरगड : नेत्यांना पडला आश्‍वासनांचा विसर
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी एक म्हणून माहूरगडची माता रेणुकादेवी ओळखली जाते. इथला विकास मात्र आजही शून्यच आहे. नेत्यांची उदासीनता व संस्थानचे दुर्लक्षच यास कारणीभूत आहे. माहूरगड यवतमाळहून 80 किलोमीटर अंतरावर आहे. संस्थान नांदेड जिल्ह्यात आहे; पण विदर्भाशी अधिक नाळ जुळली आहे. शेजारच्या मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांतील मिळून लाखो भाविक येथे येतात. सोईसुविधांचा इथे अभाव आहे. रेणुका भक्तनिवास व दोन धर्मशाळा आहेत. निवासासाठी ते अपुरे पडते. परिणामी, हॉटेलमध्ये भक्तांची लूट होते. काही वर्षापूर्वी दत्त शिखर ते अनसूया माता व माहूरच्या पायथ्यापासून रेणुकादेवी असा "रोप वे'चा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तो आजही धूळ खात आहे. माता रेणुकादेवी संस्थान आज मुख्य पुजारी राजकुमार भोपी यांच्यासह मुखत्यारांच्या ताब्यात आहे; तर दत्त शिखर संस्थान व अनसूया संस्थान महंतांच्या ताब्यात आहे. दहा वर्षांपूर्वी पर्यटन विकास महामंडळामार्फत माहूरगडाच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कुलदैवत असलेल्या संस्थानसाठी 50 कोटींचा विकास आराखडा तयार केला होता; पण या 50 कोटींतले 50 हजारही संस्थानला मिळाले नाहीत.

भाविकांची लूट, प्रचंड अस्वच्छता
आज रेणुकामाता मंदिर असो की आजूबाजूचा परिसर, सर्वत्र प्रचंड अस्वच्छता आढळून येते. येथील व्यावसायिक पूजाअर्चेच्या वस्तूंच्या विक्रीतून अमाप कमाई करतात. पार्किंगची कुठलीच सुविधा नसल्याने व्यावसायिक मंडळी लूट करताना दिसतात. केवळ पार्किंगच्या भरवशावर संस्थानला नफा कमावता येतो. पण, तसे होत नाही. आजही माहूरगडावर जाणारा रस्ता एकेरी आहे. रस्ते विकासाविषयी कुठलाच आराखडा नाही.

उत्पन्नाची साधने
रेणुकादेवी संस्थानला उत्पन्नाचे साधन भक्तांकडून मिळणारी देणगी व दानपेटीतून मिळणारा पैसा आहे. कोट्यवधी रुपयांची देणगी संस्थानला मिळते. पण, संस्थानने परिसरात भरीव विकासकार्य केले, असे निदर्शनास येत नाही. अनेक कामे प्रस्तावित आहेत, असे सांगितले जाते. केवळ पायऱ्यांचे बांधकाम हेच एक विकासाचे उदाहरण देता येईल. उन्हाळा आला की, इथला पाणीप्रश्‍न भीषण होतो. पायथ्यापासून पाणी वर नेले जाते. या संस्थानच्या तुलनेत दत्त शिखर व अनसूया माता मंदिर परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. वास्तविक शिखर संस्थानची मालमत्ताही कोट्यवधींची आहे. संस्थानचा स्वतंत्र तहसीलदार आहे. संस्थानांतर्गत जी काही देवस्थाने आहेत, त्यावर महंतांचे नियंत्रण आहे. भक्तांसाठी सर्व सोई-सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तिन्ही संस्थानांची मालमत्ता कोट्यवधी आहे. शेतीसह, सागवानाची लाखो झाडे संस्थानकडे आहेत. उत्पन्नाची साधने आहेत. त्यातून मिळारे उत्पन्नही मोठे आहे.

वनविभागाच्या नियमांची आडकाठी
माहूर संस्थानाचा विकास न होण्यामागे वन विभागांचे नियमच आड येत आहेत. कुठलेही विकासकाम करायचे म्हटले की, वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. वन विभागाकडे असे अनेक प्रस्ताव आहेत; पण त्यास मान्यता न मिळाल्याने विकास रखडलेला आहे. हे मुख्य कारण सांगावे लागेल.

प्रतिक्रिया
On 16/05/2011 02:31 PM अभय said:
सोनाली , सचिन चर्च आणि मशीद यांच्यावर त्यांच्या धार्मिक संस्थांचे नियंत्रण असते . हिंदूंच्या मंदिरावर असे कोणाचेही नियंत्रण नाही . तिथला कारभार पूर्वी पुजार्यांच्या मर्जीने चाले आणि आता विश्वस्तांच्या तालावर चालतो .महाराष्ट्रात भरणाऱ्या यात्रा , जत्र प्रामुख्याने हिंदू तीर्थक्षेत्री भरतात . त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधणे योग्यच वाटते . नवी ब्राह्मणशाही या शब्दाबाबत बर्याच जणांचा गैर समज झालेला दिसतोय . इथे जातीने ब्राह्मण असणे अभिप्रेत नाही
On 16/05/2011 01:30 PM ek bhakt, Ankleshwar said:
एक दम बरोबर आहे. माझा हि अनुभव असाच आहे . श्री गजानन महाराज मंदिर आणि देवास्तानाचे विश्वस्त फार चांगले काम करीत आहे बाकी देवास्तानानी ह्याच अनुकरण कराव आणि बाकी देव्स्तानांतील लूट थांबवावी मंजे प्रत्येक भाविकाला दर्शन आणि प्रसादाचा लाभ मिळेल .
On 15/05/2011 07:58 PM Sachin Kapadia said:
सोनाली घोडके अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. भारतात सगळे नियम हिंदू देवस्थानांना लागू होतात चर्च आणि माशिदिना नाही. चर्च आणि मशिदींचे ऑडीट तरी होते का काय माहित.
On 15/05/2011 05:40 PM Sonali Ghodke said:
दिपकजी चर्च आणि मशीद बाबत आपले नेते फारच कमी अश्वषण देतात म्हणूनच त्याचा उल्लेख नाही.
On 15/05/2011 05:20 PM Nilima K W said:
हुंडीत टाकलेल्या दानाच्या पैशांचा विनियोग दवास्थानाच्या स्वच्छते बरोबरच समाजाच्या विशेषतः गोरगरिबांच्या सेवेकरिता होणार असेल तर भक्तांना दान टाकण्यात आनंद वाटेल. श्री सत्य साईबाबांच्या पुतापार्थी चे उदाहरण नेहमी समोर ठेवावे.
On 15/05/2011 05:14 PM sachin said:
हा मृत पैसा आहे ....याला बाजारात आणा लाखो लोकांना काम मिळेल आणि पैसा फिरता राहील ...यामुळे देशाची प्रगती तर होईलच आणि त्याचा फायदा या trustala सुधा होईन .....लोक पैसा देतात याचे कारण आहे त्यांचा देवावरचा विश्वास ...जर एवढा पैसा साई बाबांना दिला असता तर त्यांनी काय केले असते ...असा विचार trustini केला पाहिजे आणि या पैशाचा तसाच वापर केला पाहिजे
On 15/05/2011 04:27 PM Dhiraj said:
गोंदवले - पावित्र्य आणि भगवंता च्या नावाचे प्रेम ..........इतकेच आहे इथे.. भक्तांचा महापूर असतो ..पण नामा ची सत्ता असल्या मुले कलीयुगात सुद्धा अतिशय सुखद असे संत "माणसाचे" घर वाटते...न कोणा विश्वाताची सत्ता ..न कोणी VIP ...फक्त महाराज आणि नाम
On 15/05/2011 04:11 PM kedar said:
वैयक्तिक स्वार्थापुढे सामाजिक जाणीव मागे पडते आहे. आपल्या मुलानाही आपण फक्त स्पर्धा करायला शिकवतो पण नियम पाळायला सार्वजनिक स्वच्छता राखायला सगळ्यांचा विचार करायला शिकवत नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा घोकमपट्टी शिवाय वेगळे काही पदरात पडत नाही. दुनिया पैशाच्या मागे लागली आहे आणि आपणही त्याच्याच मागे भले बुरयाचा विचार न करता धावतो आहोत. आपली विवेक बुद्धी वापरायचीच नाही असं ठरवून जगतो आहोत.
On 15/05/2011 03:14 PM Dr. Khedekar D. J.Buldhana said:
सकाळचा लेख खूप चांगला आहे अभिनंदन डॉक्टर दिगंबर जयवंतराव खेडेकर मराठा सेवा संघ बुलढाणा
On 15/05/2011 02:53 PM Mithun said:
I like SHRI SWAMI SAMARTH TEMPLE AKKALKOT
On 15/05/2011 02:32 PM shri said:
विश्वस्त आर्थिक वर्गावादाने नवी ब्राह्मणशाही अनु पाहत आहेत ह्या वाक्याला माझा पण विरोध आहे. उगीचच जातीय वाद आणू नये. बर्र्र्याच ठिकाणी सदया पुजारी हे जातीने ब्राह्मण नाहीत. सगळे विश्वस्त मात्र नक्कीच ब्राह्मण नाहीत. समाजा मध्ये तेढ कृपा करून वाढवू नकात. आजून एक महत्वाचे - हा लेख फक्त हिंदूंच्या मंदिरा बद्दल का ? हे लेखक याचे काही उत्तर देतील ?
On 15/05/2011 02:15 PM Deepak J said:
मशीद आणि चर्च ह्या बद्दल आसा लेख आणि एव्हडा हिशोब का नाही ?
On 15/05/2011 12:56 PM vR Bhagwat said:
I am waiting for such article on Churches & Mosques. Does the author dare to write such article or he does not know?
On 15/05/2011 11:41 AM Shri said:
साडे तीन शक्ती पिठामध्ये माहूर च्या रेणुका मातेचा समावेश आहे. खरचच तिथल्या परिस्थिती मध्ये सुधारणेची आवश्यकता आहे. बाकी सर्व देवस्थाना मध्ये माहूर विकासा पासून वंचित राहिले आहे. बाकी देव स्थाना कडे एवढी विशाल संपत्ती आहे तर त्यांनी माहूरच्या विकासा साठी निधी द्यावा. सरकारी अधिकारी, मंत्री कुणी या साठी प्रयत्न करतील ? हि सर्वाना नम्र विनंती आहे. जय रेणुका माता !
On 15/05/2011 11:27 AM Deepak J said:
विश्वस्त आर्थिक वर्गावादाने नवी ब्राह्मणशाही अनु पाहत आहेत ह्याला वाक्याला माझा विरोध आहे प्रत्येक ठिकाणी जातीय वाद का आणला जातो ? नुसते पुजारी ब्राह्मणच आहेत ह्याची प्रथम खात्री करा आणि बाकी विश्वस्त कोण आहे ? एका समाजाला का दोषी धरता . दुसर्या समाजाचे नाव घ्याला काय लाज वाटे का हिम्मत नाही सकाळ पापेरची .
On 15/05/2011 10:57 AM goog said:
शेगाव आणि गोंदवले ....................... very different form rest of places....
On 15/05/2011 10:37 AM atesh said:
खरच बाजार लागला आहे देवाचा. पैसा महागला तरी देव करोडपती भक्त मात्र रोडपती . गरिबांना एकवेळचे जेवण मिळत नाही बडवे मात्र तुपाशी खातायेत. म्हणून मी ठरवलंय कधीच कोणत्याही देवळात जाणार नाही. आणि स्वतःची लूट करून घेणार नाही.
On 15/05/2011 09:52 AM sham said:
शेगाव : निःस्वार्थ सेवाकार्य; कमालीची स्वच्छता खरे आहे मला सर्वात आवडलेले क्षेत्र
On 15/05/2011 08:56 AM pankaj L Nilgirwar said:
Dear sir , Very good approch toward sensitive issues and really need your continious support towards maharastra tempels and there cleanly ness ,stay arrangement for needy and local people approch very bad regarding shop near tempel ,parking , hotels etc need huge improvement otherwise oneday you will not find good people around there due to this so plz rase this issue to solve ........thanks
On 15/05/2011 08:38 AM sudhir said:
खुप छान , सगळ्या देवस्थानांची खरी ओळख जाली. शेगाव बेस्ट आहे.
On 15/05/2011 06:28 AM Pradeep Patil said:
उस्मानाबाद जिल्ह्यातले कसबे तडवळे येंथिल श्रीराम मंदिराची १००० एकर जागा आहे पण मंदिराला उत्पन कांहीच नाही रोज आरती लावण्या साठी पण विश्वस्तान कडे पैसे नसतात. सकाळ १००० एकर चे झाल्ये काय हि मालिका चालवू शकतो. हि केस तडवळे च्या वार्ताहरा कडे देवू नका तो कांही लोंकच्या दबावाला बळी पडतो व माय्नेज होतो.
On 15/05/2011 05:30 AM hari said:
हो खर आहे काही ठिकाणी माणसे फसवणूक करतात सावधान.....
On 15/05/2011 04:44 AM Harshal Pandit said:
साई संस्थानच्या ज्या विश्‍वस्तांनी आपल्या मंदिराची मक्तेदारी टिकवण्यासाठी "यापुढे देशात ज्यांना साईमंदिर उभारायचे असेल, त्यांना आमची परवानगी घ्यावी लागेल,' ही घोषणा केली होती त्या अतीमहान व्यक्तीचे नाव काय? म्हणजे आता साई बाबांच्या नावाचेही पेटंट काढा! "साई बाबा हा देव आमच्या देवस्थान संस्थेच्या मालकीचा असून त्याचा कोणीही आमच्या लेखी परवानगी शिवाय वापर करू नये! अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल!!" अशी पाटी पण लावा!!!
On 15/05/2011 03:59 AM Abhijit said:
काय प्रतिक्रिया देणार... मन उद्विग्न होतं. आपणच ह्याला खात पाणी घालतो. देवाला पैशाची गरज नाही. पण दानपेटीत पैसे टाकल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आणि त्या पैशाचा नंतर काय होतं ते वर लिहिलेलंच आहे. ह्यावरून बोध घेतला पाहिजे.
On 15/05/2011 03:54 AM अजित काजळे, Sydney, Australia said:
देवाचा बाजार मांडला आहे............देव स्वःतः हा बाजार बघून ढसाढसा रडत असतील ..............त्याचमुळे मी कित्येक वर्षात शिर्डीला आणि सिद्धी विनायकला गेलो नाही
On 15/05/2011 01:30 AM ketaki said:
आपण लिहिले आहे कि हे विश्वस्त आर्थिक वर्गावादाने नवी ब्राह्मणशाही अनु पाहत आहेत , पण आज कोणत्या मंदिर समितीचे विश्वस्त ब्राह्मण आहेत हे पडताळून पहा, नुसते पुजारीच ब्राह्मण आहेत , पण विश्वस्त सर्व मंत्रांच्या हातचे बाहुले बसवले आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: