Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

इन्याचे नाक्यावारी शाला बांधेली... राजू भडके
दीपा देशमुख uth@esakal.com
Saturday, May 21, 2011 AT 11:18 AM (IST)
मजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबात जन्मलेला राजू भडके हा चंद्रपूर जिल्ह्यातला तरुण. आपण चांगलं शिकलो, तर आईवडिलांचे कष्ट कमी होतील, ही त्याची भावना. आर्थिक परिस्थिती नसल्यानं तो डॉक्‍टरऐवजी डी.एड. झाला. त्या वेळी एसटीडी बूथ, शिकवणी अशी कामं करत त्यानं शिक्षण पूर्ण केलं आणि आज तो आदिवासींसाठी काम करत आहे.

धूसर जग दिसू लागलं स्पष्ट
कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेताना राजूला निर्माणविषयी माहिती मिळाली. कुतूहलापोटी निर्माणमध्ये दाखल झालेल्या राजूला धूसर जग आता स्पष्ट दिसू लागलं. ""लोकांची गरज आहे, तिथे जाऊन काम करा. सामाजिक क्षेत्रच आपलं करियर होऊ शकतं,'' या डॉ. अभय बंग यांच्या वाक्‍यानं राजूच्या विचारांमध्ये बराच बदल घडवला. त्याचप्रमाणे गांधीजींच्या शिक्षण प्रणालीवर आधारित रमेश पानसे यांच्या "नई तालीम', अनुताई वाघ यांच्या "कोसबाडच्या टेकडीवर' या पुस्तकांनी राजूला प्रवासाची दिशा सापडली.

ग्राममंगल संस्थेबरोबर काम सुरू
निर्माणशी सहयोगी असलेल्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची फेलोशिप घेऊन राजू ग्राममंगल या संस्थेत दाखल झाला. ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्‍यात ऐना हे 800 लोकसंख्येचं चिमुकलं आदिवासी गाव आहे. तिथे गेली 28 वर्षं ग्राममंगल ही संस्था आदिवासींच्या शिक्षणासाठी काम करतीये. ग्राममंगलचे विश्‍वस्त रमेश पानसे यांचे शिक्षणावरचे नवनवे प्रयोग सातत्यानं चालू असतात. मेंदू शिक्षणावर आधारित आणि जगातल्या विविध शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या चिकित्सांचा शैक्षणिक अभ्यास करून ग्राममंगलच्या शिक्षण पद्धतीची रचना केली आहे.

काम करणाऱ्यांच्या दाही दिशा
या संस्थेत विविध नैसगिक वस्तूंचा शैक्षणिक साधन म्हणून वापर केला जातो. इथं मुलं भूगोल विषयही खेळाच्या माध्यमातून शिकतात. त्यामुळे शिक्षण सहजपणे मुलांत रुजलं जातं. राजूनं ग्राममंगलमध्ये आदिवासी जीवन, पाडे, त्यांच्या चालीरीती, पद्धती, सण, उत्सव, खेळ, नृत्य आदी समजून घेण्यास सुरवात केली. पाड्यांवरची शिक्षण पद्धतीची माहिती मिळवण्याबरोबरच त्यानं मुलांना शिकवणं, परिणामांच्या नोंदी ठेवण्याचं काम केलं. यातून राजूचा प्रवास आकार घेऊ लागला. काम करणाऱ्याला दाही दिशा खुणावतात, असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे राजूनं मूल्यमापन, वसतिगृहाची जबाबदारी, पालकभेटी, शाळा आणि शिक्षकांचं प्रशिक्षण या कामांमधला सहभाग वाढवला.

आदिवासी संस्कृतीचं जतन
आजूबाजूच्या जगात चालणाऱ्या घटना, वार्ली कलेचं महत्त्व पटवणं, त्यातून रोजगारनिर्मिती कशी होईल, आदिवासी तारफा नृत्य, आदिवासी गाणी हे सगळं जोपासण्यासाठी राजू तरुणांचं संघटन करून, त्यांना प्रोत्साहित करतो आहे. आदिवासींमध्ये रमलेला राजू त्यांच्यातलाच एक होऊन गेलाय. ""या मुलांसोबत काम करताना, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मला उमेद वाढवणारं वाटतं,'' असं म्हणणाऱ्या राजूच्या वाटचालीत तुम्ही साथ देणार?
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 10/06/2011 07:39 AM sujata said:
अतिशय कौतुक वाटले. त्यांचा पत्ता द्याल का? भेटायची इच्छा आहे


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: