निसर्गाच्या निरीक्षणाला अभ्यासाची जोड द्या
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 26, 2011 AT 03:15 AM (IST)
पौड रस्ता - ""निसर्गाचे निरीक्षण करताना त्यास अभ्यासाची जोड देणे गरजेचे आहे,'' असे मत वनस्पती आणि फुलांचे अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर यांनी रविवारी व्यक्त केले.
ऍड-व्हेंचर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा "श्री. मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार' या वर्षी इंगळहळीकर यांना मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
"सकाळ'चे कार्यकारी संपादक नवनीत देशपांडे, वनस्पती तज्ज्ञ श्री. द. महाजन, फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे, सदस्य अनिल गोहाड या वेळी उपस्थित होते. महाजन यांच्या "विदेशी वृक्ष' या पुस्तकाचे प्रकाशन इंगळहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
इंगळहळीकर म्हणाले, ""निसर्गाचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करण्यास चितमपल्लींनी शिकविले. तंत्रज्ञान; तसेच अभ्यासक्रमातील बदलामुळे शहरात होणारी वृक्ष व पक्षी संमेलने बंद झाली आहेत. पूर्वी ब्रिटिश लोक निसर्गाचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करून उपयोगी; तसेच सुंदर झाडांचे संग्रह करीत असे. त्यामुळे त्यांचे अनुकरण करत निसर्ग अभ्यासणे गरजेचे आहे.''
महाजन म्हणाले, ""परदेशातून भारतात आलेले परकीय वृक्ष कोणते, भारतात कोणते वृक्ष लावावे किंवा कोणते कमी प्रमाणात लावावे यासाठी "विदेशी वृक्ष' हे पुस्तक लिहिले आहे. परदेशी वृक्षांपेक्षा भारतीय वृक्ष हे पर्यावरणपूरक आहेत.''
अरुणाचलमधील धनेश पक्ष्यावर केलेल्या विशेष संशोधनाबद्दल अमृता राणे हिचा व 2012 मध्ये एवरेस्ट मोहीम आयोजित करणाऱ्या उमेश झिरपे यांचा सत्कार फाउंडेशनतर्फे करण्यात आला.