Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

मंगेशकर रुग्णालयांसी साष्टांग नमस्कार... !
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 10, 2012 AT 01:00 AM (IST)
पुणे - "दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांसी साष्टांग नमस्कार...' कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधावा असा सहज संवाद साधला आहे, कवी ग्रेस यांनी. "ग्रेस म्हणजे कविता अन्‌ ग्रेस म्हणजे लेखन' हेच माहीत असलेले आपण. पण, गेले काही दिवस त्यांचा या रुग्णालयाशीही ऋणानुबंध जुळला. कारणही तसेच आहे, याच ठिकाणी त्यांना दोनदा मिळालेला पुनर्जन्म... त्यामुळेच नव्या पुस्तकाची सुरवातच त्यांनी केली आहे, या रुग्णालयास पत्र लिहून.

ग्रेस यांच्या "ओल्या वेळूची बासरी' या ललितबंधसंग्रहाचे प्रकाशन मंगळवारी होत आहे. त्यानिमित्ताने झालेल्या संवादात ग्रेस यांच्या मनाचे काही पदर पुन्हा उलगडले गेले. आयुष्यात कर्करोगाचा दोनदा सामना करताना मिळालेल्या पुनर्जन्माचे श्रेय ते देतात, पं. हृदयनाथ मंगेशकर आणि डॉ. धनंजय केळकर यांना. ग्रेस म्हणाले, ""पहिल्यांदा घशात कर्करोग झाला. तो बरा झाला. पण, आता यकृतात कर्करोगाने शिरकाव केला. गेले पाच महिने या रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावर मी राहत आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी मला कुटुंबातीलच एक सदस्य केले आहे. त्यामुळे मी इथे आहे. माझ्या दोन्ही मुली डॉक्‍टर असून मला इथे उपचार घ्यावे लागतात. त्यामागे केवळ पंडितजींचे प्रेम आहे. या दुसऱ्या कर्करोगातूनही मी पूर्ण बरा झालो आहे. पण, केमो उपचाराने चांगल्या पेशींचेही नुकसान झाले. ही जगण्याची किंमत आहे.''

ग्रेस आणि रुग्णालय हा संबंधही जुना असल्याचे सांगून ते म्हणाले, ""माझ्या हाडांना आतापर्यंत 13 ते 14 वेळा अपघात झाला आहे. वेल्लोर येथील रुग्णालयावरही मी लिहिले आहे. माझी पत्नीसुद्धा डॉक्‍टरच होती. दोन मुली मुंबईला डॉक्‍टर आहेत.'' त्यामुळेच रुग्णालयासारख्या काहींना रुक्ष वाटणाऱ्या गोष्टीही ग्रेस यांच्या शब्दांमधून थेट हृदयाला भिडतात.

"मी आहे तसा आहे!' ग्रेस आपल्या शैलीत ठासून सांगतात. ""मी 18 वर्षांचा होतो, तसाच आजही आहे. मी हातात काही शस्त्र घेत नाही. पण, लोक मला घाबरतात. कारण मी खोटं बोलत नाही.''

आयुष्यात मित्र कुणीच नसतं... ग्रेस पुन्हा एक पत्र हातात देऊन सांगतात. एका शाळेसंदर्भात त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने सांगितल्यावर लिहिलेले हे पत्र. त्या व्यक्तीलाही ग्रेस "प्रिय मित्र...' असे म्हणत नाहीत. ते म्हणतात, "माझे सहवासी सहोदर...' खास ग्रेस यांच्या भावनांतून आकाराला आलेला हा ग्रेस यांचाच शब्द. ""या जगात दोन जरी मित्र मिळाले असते, तरी ख्रिस्ताची आणि गांधींची हत्या वाचली असती. पण, इथे मित्र कुणी नाही हेच खरे..,'' असे ग्रेस स्पष्टपणे सांगतात.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सौद बाहवान सभागृहात सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर व डॉ. धनंजय केळकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: