Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

तिळाच्या पदार्थांनी अन्‌ दागिन्यांनी सजली बाजारपेठ
-
Saturday, January 14, 2012 AT 01:01 AM (IST)
पुणे - खास संक्रांतीसाठी तिळगूळ, वड्या, लाडू या पदार्थांबरोबरच हलव्याच्या दागिन्यांनी बाजारपेठ सजली आहे. संक्रांत आणि वाढत्या थंडीच्या निमित्ताने तिळगुळाचे पदार्थ खरेदी करण्याला पुणेकर प्राधान्य देत आहेत.

महिलांनी बाजारपेठेमध्ये तिळगुळाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा थंडी जास्त असल्याने या सगळ्या पदार्थांना मागणी वाढली आहे. लाडू, वडी, पापडी यांसारख्या वेगवेगळ्या तिळाच्या पदार्थांनी बाजारपेठ सजली आहे. तीळ व गुळाच्या वड्या खरेदी करण्यालाही ग्राहकांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. हलव्याच्या दागिन्यांमध्ये हार, मुकुट, नथ, ब्रेसलेट, कोल्हापुरी साज, कर्णफुले, पैंजण, मेखला, कमरपट्टा आदी प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

काका हलवाईचे मालक महेंद्र गाडवे म्हणाले, ""संक्रांतीसाठी तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ व हलव्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिळगुळाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत.''

पारंपरिक तिळगुळाच्या पदार्थांबरोबरच काजू, बदाम, वेलची, लवंग व भोपळ्याच्या बियांचा वापर करून केलेला "जावई हलवा' खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल आहे. साबुदाण्याचा पांढरा हलवा, तसेच मॅंगो, पिस्ता, काजूकंद या प्रकारांमधील तिळाच्या वड्या या यंदाचे वैशिष्ट्य आहेत. ""मऊ व कडक तिळवड्यांना मागणी आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा यंदा तिळवडीमध्ये काही बदल करण्यात आला असल्यामुळे महिला त्या खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत,'' असे महाराष्ट्र गुडदाणी अँड स्वीटस्‌चे मालक प्रकाश ढेंबे गुडदाणीवाले यांनी सांगितले.

हलव्याच्या दागिन्यांचा "मोबाईल'!
संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने खरेदी करण्यात येत असल्याने त्यामध्ये वेगळेपणा देण्याचा प्रयत्न विक्रेत्यांकडून करण्यात येतो. यंदाच्या संक्रांतीसाठी खास "हलव्याच्या दागिन्यांचा मोबाईल' हा ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या मोबाईलच्या कव्हरभोवती हलव्याच्या दागिन्यांची आकर्षक पद्धतीने सजावट केली असल्याने हे मोबाईल लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: