
पुणे - ""सकारात्मकता वाढवणारी व गुणवत्तेला योग्य स्थान देणारी शिक्षणपद्धती हवी. मात्र, दुर्दैवाने आपल्याकडील शिक्षणपद्धती ही सक्तमजुरीच्या शिक्षेसमान आहे. हे चित्र बदलण्यासाठी आता दुसऱ्या शैक्षणिक क्रांतीची आवश्यकता आहे,'' असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी गुरुवारी येथे केले.
गडचिरोलीच्या शाळेतील अनुभवावर गो. ना. मुनघाटे यांनी लिहिलेल्या "काटे मुंढरीची शाळा' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. बंग यांच्या हस्ते "साधना' येथे झाले. या वेळी "वनराई'चे अध्यक्ष मोहन धारिया, लेखक हेरंब कुलकर्णी, "साधना'चे विश्वस्त सचिव डॉ. नरेंद्र दाभोलकर हे उपस्थित होते.
डॉ. बंग म्हणाले, ""शिक्षणाचे सार्वत्रीकरण होत आहे. गळतीचे प्रमाण कमी होत आहे, ही बाब अत्यंत चांगली आहे. त्यासाठी शिक्षणाची पहिली क्रांती करणाऱ्या सर्व महापुरुषांना आपण सलाम करायला हवा. त्यांचे ऋण कधीच विसरता येणार नाही. पण, आता शिक्षणाची पद्धत बदलायला हवी. सध्या शिक्षण सर्वांपर्यंत पोचत असले तरी दुसरीकडे "पाचवीतील मुलाला पहिलीचे पुस्तक वाचता येत नाही', हे समजले की शिक्षण पद्धतीतील दोष समोर येऊ लागतात. याकडे आपण गांभीर्याने पाहायला हवे. मुलांना बेरोजगार करणारे, कुचकामी बनवणारे शिक्षण उपयोगाचे नाही.''
गडचिरोली महाराष्ट्रातच आहे ?
ज्या तऱ्हेने गडचिरोली होरपळत आहे, हे पाहिले की गडचिरोली महाराष्ट्रातच आहे का, असा प्रश्न मनात येतो. पण, मुनघाटे यांचे हे पुस्तक गडचिरोलीला जवळ आणणारे आहे, असेही डॉ. बंग यांनी सांगितले. धारिया, कुलकर्णी, डॉ. दाभोलकर यांनीही मनोगत व्यक्त केले.