गुन्हेगार, नातेवाइकांना भाजपची उमेदवारी नाही - मठकरी
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 01:45 AM (IST)
पुणे - "गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, तसेच पक्ष नेत्यांच्या नातेवाइकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार नाही,' असे भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ मंडळी अडचणीत आली आहेत.
पक्षाच्या एक आमदाराने मुलीसाठी, तर एका नेत्याने मुलासाठी पक्षाकडे उमेदवारीचा आग्रह धरला आहे. तसेच काही नामचीन गुंडांच्या कुटुंबांतील व्यक्तींनीही पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मठकरी यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.
मठकरी म्हणाले, ""पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, महाराष्ट्राचे प्रभारी वेंकय्या नायडू आणि प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीच ही बाब स्पष्ट केली आहे. पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या नातेवाइकांना उमेदवारी देण्यात येणार नाही. तसे त्यांनी आदेशही दिले आहेत. त्यामुळे त्या आदेशाची शंभर टक्के अंमलबजावणी केली जाईल. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी भाजपने यापूर्वीच गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रणशिंग फुंकले आहे. या निवडणुकीत याच धोरणाची अंमलबजावणी होईल; त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अथवा त्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नाही.''
""पक्षाने 104 जागांची मागणी केली होती. महायुती असल्यामुळे शंभर टक्के अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही,'' असे सांगून मठकरी म्हणाले, ""आरपीआयबरोबर आज सायंकाळी जागावाटपासंदर्भात अंतिम चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे. महायुती असल्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ, नियोजन, नेत्यांच्या सभा या सर्व गोष्टींचे नियोजन एकत्रित करण्यात येणार आहे. निवड मंडळाची बैठक उद्या सायंकाळी होणार असून त्यानंतर यादी जाहीर करण्यात येणार आहे.''