
पुणे - ""स्वारगेट अपघात प्रकरणाची पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून बारकाईने चौकशी केली जाईल,'' असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिले. एसटीच्या व्यवस्थेतील दोषांची तपासणी करण्यासाठी महामंडळाची तांत्रिक समिती नियुक्त करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एसटी अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संध्याकाळी ससून रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
चव्हाण म्हणाले, ""एसटी कायदा आणि सरकारच्या निकषानुसार जखमी आणि मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. आचारसंहितेमुळे सरकारला मदत करता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाशी चर्चा करूनच या विषयावर निर्णय घेतला जाईल. आरोपीच्या अहवाल तपासणीवरून घटनेचे धागेदोरे पुढे येतील.''
चालक माथेफिरू कसा काय? गाणगापूर येथून प्रवाशांना पुण्यात सुरक्षित पोचविणारा चालक माथेफिरू कसा असेल, असा प्रश्न सामान्य पुणेकरांबरोबरच उपमुख्यमंत्री पवार यांनाही पडला. त्यांनी तो माध्यमांसमोर बोलूनही दाखविला. ""या प्रश्नाचा उलगडा पोलिस करू शकणार नाहीत, तर त्यांना डॉक्टरांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे. चालकाने अमली पदार्थ घेतला होता की तो माथेफिरू होता; त्याच्यावर यापूर्वी कोणते उपचार करण्यात आले आहेत का, हे सर्व प्रश्न माझ्याही मनात आहेत,'' असे ते म्हणाले.