सात पुणेकरांना पद्म पुरस्कार
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 01:00 AM (IST)
पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये सात पुणेकरांनी आपला ठसा उमटवला आहे. यात संचेती हॉस्पिटलचे डॉ. के. एच. संचेती यांना पद्मविभूषण, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना पद्मभूषण, तर पद्मश्री पुरस्कारांमध्ये कायनेटिक मोटर्सचे अरुण फिरोदिया, नाटककार सतीश आळेकर, अंधांसाठी समाजकार्य करणारे निरंजन पंड्या, डेक्कन महाविद्यालयातील के. पदय्या आणि सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ खान यांचा समावेश आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर या पुरस्कारार्थींनी आपल्या भावना "सकाळ'शी बोलून दाखविल्या.
डॉ. के. एच. संचेती - या पुरस्कारामुळे अतिशय आनंद झाला आहे. माझ्यासाठी हा पुरस्कार अनपेक्षित आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल सरकारने दखल घेतली याचा मी आभारी आहे. याचे श्रेय मी माझे कुटुंबीय आणि सर्व कर्मचाऱ्यांना देऊ इच्छितो.
डॉ. शां. ब. मुजुमदार - अतिशय मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने मनापासून आनंद होत आहे. खरे तर हा एका शिक्षकाचा आणि सिंबायोसिस परिवाराचा सन्मान आहे. त्यामुळे संस्थेतील सेवकापासून संस्थाचालकांपर्यंत अनेकांचा या माध्यमातून गौरव झाला आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जाते. इथे केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल मिळत असलेल्या या सन्मानाला वेगळा अर्थ आहे.
अरुण फिरोदिया - सामान्यांसाठी लूना आणि कायनेटिक या वाहनांच्या निर्मितीला मिळालेली ही पावती आहे, असे मी समजतो. हा पुरस्कार अनपेक्षित आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सामाजिक असल्यानेच आजोबा, काका आणि वडील यांच्या कार्याचा हा गौरव असल्याचे समजतो. या वेळी मला माझ्या आईची प्रकर्षाने आठवण होत असून, तिच्या स्मृतीला हा पुरस्कार समर्पित करतो.
सतीश आळेकर - मी गेले चाळीस वर्षे नाट्यकलेशी संबंधित आहे. हा पुरस्कार म्हणजे या काळात माझे सहकलाकार, नाटककार यांच्यासोबत करता आलेल्या कामाचा मी सन्मान समजतो. माझी नाटकसंस्था, पुणे विद्यापीठ या ठिकाणी केलेल्या कामाची ही पावती आहे. चंद्रकांत काळे, आनंद मोडक, मोहन आगाशे, जब्बार पटेल, विद्याधर वाटवे यांचा मी ऋणी आहे. हा पुरस्कार पत्नी अनिता हिला समर्पित करतो.
उस्ताद शाहीद परवेझ खान - पुरस्कार मिळाल्याबद्दल अतिशय चांगले वाटत आहे. संगीत क्षेत्र या ठिकाणी पोचू शकत नाही; पण माझा आवाज सरकारदरबारी पोचला याचा आनंद झाला. पुरस्काराबद्दल गर्व वाटत आहे. माझे वडील आणि गुरू उस्ताद अजीज खान यांच्या स्मृतीला हा पुरस्कार समर्पित करतो.
निरंजन पंड्या - पुरस्काराने अत्यंत आनंद झाला आहे. 46 वर्षांच्या अंधांच्या सेवा केली. त्या कामाचे आज चीज झाल्यासारखे वाटत आहे. या पुरस्कारामुळे कामाचा उत्साह वाढला असून, शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील, असा विश्वास आहे. माझे आई-वडील आणि प्राचार्य डी. बी. दादावाला यांना हा पुरस्कार समर्पित करतो.