... आणि मित्र परिवार धावून आला
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 02:45 AM (IST)
खडकवासला - स्वारगेट चौकातून गावी जाण्यासाठी निघालेले दोघे जण एसटी अपघातात जखमी झाले. त्यांना पाहण्यासाठी काही जण गेले असता त्यांना ते आपल्या मित्राचे वडील, तर दुसरी त्याची चुलत सासू असल्याचे समजताच स्वारगेट व मालुसरे रस्त्यावरील त्यांचा अवघा मित्र परिवार मदतीला धावून आला.
चांगदेव भांडवलकर (वय 60) व गोदाबाई किसन लुगडे असे जखमींचे नाव आहे. दोघेही नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील रामनगर येथील रहिवासी आहेत. भांडवलकर यांच्या भावाच्या मुलाला लुगडे यांची मुलगी दिलेली आहे. तसेच भांडवलकर व लुगडे कुटुंबीय मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील वाटेफळ येथील आहेत. ते दोघे कामानिमित्त सकाळी रामनगर येथून गावाला जाण्यास निघाले होते. स्वारगेट चौकात आल्यानंतर एसटीच्या झालेल्या अपघातात ते जखमी झाले. जखमी कोण झाले, हे पाहण्यासाठी मालुसरे रस्त्यावरील पॅगो चालक गेले. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, आपला मित्र श्रीकांत भांडवलकर (पॅगो रिक्षाचालक) याचे ते वडील आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला जबर जखम असल्याने तेथून त्यांना स्कॅनिंग करण्यासाठी कमला नेहरू रुग्णालयात आणले. त्यानंतर ससूनमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती माणिकबाग येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख राजू चव्हाण यांना समजली. त्या वेळी त्यांनी राम, श्रीकांत, भाऊ नाना, पुतण्या दत्ता भांडवलकर, तसेच लुगडे यांचे नातेवाईक बिभीषण मुंढे, किसन लुगडे यांना घेऊन ससूनमध्ये आले. त्यांच्याबरोबर रामनगर येथील जांबुवंत कांबळे, अब्दुल शेख, बाजीराव जाधव, संजय बालगुडे होते.