
पुणे - ""सद्गुणांसाठी आणि मानवतेच्या प्रसारासाठी दर्जेदार शिक्षणाची आवश्यकता असून असे शिक्षण देणे हीच काळाची गरज आहे,'' असे मत आध्यात्मिक गुरू भैयूजी महाराज यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित समारंभात "सिंबायोसिस'चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना भैयूजी महाराज यांच्या हस्ते गुरुवर्य कानिटकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी "प्रोग्रेसिव्ह'चे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह श्यामकांत देशमुख, संजीवनी मुजुमदार आदी व्यासपीठावर होते.
भैयूजी महाराज म्हणाले, ""दर्जेदार शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. या माध्यमातून आदर्श व्यक्तिमत्त्वे त्यांच्यापर्यंत पोचयला हवीत.'' डॉ. मुजुमदार म्हणाले, ""एका तपस्वी शिक्षकाच्या नावाचा पुरस्कार मिळणे, हा मोठा गौरव आहे. शिक्षणात गुणवत्ता आणि आधुनिकतेला फार महत्त्व आहे. अशा शिक्षणासह वंचित घटकांपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे.'' ज्योत्स्ना एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रकाश दीक्षित यांनी आभार मानले.