"क्यूआरटी' उरली "मॉक ड्रील' पुरती
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 01:00 AM (IST)
पुणे - शहरात कोणताही घातपात, मोठा अपघात घडल्यानंतर त्याची तीव्रता रोखण्यासाठी पोलिसांनी निर्माण केलेली "क्यूआरटी' केवळ "मॉक ड्रील' पुरतीच उरल्याचे आजच्या स्वारगेटच्या घटनेवरून दिसून आले. "क्यूआरटी'ला तातडीने कार्यान्वित केले असते, तर स्वारगेटच्या घटनेतील बळींची संख्या नक्कीच कमी झाली असती, असे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
"अतिशीघ्र दल' (क्यूआरटी)चा तळ शिवाजीनगर मुख्यालयात आहे. येथे "एनएसजी'च्या (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) धर्तीवर प्रशिक्षण दिलेले 96 जवान कार्यरत आहेत. त्यावर सहा फौजदार आणि एक पोलिस निरीक्षक आहे. त्यांच्याकडे दहा स्कॉर्पिओ आहेत. त्यांची कार्यप्रणालीही निश्चित करण्यात आली आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यानंतर त्याची माहिती "क्यूआरटी'ला कळल्यास या पथकाने सात ते दहा मिनिटांत तेथे पोचावे, असा दंडक आहे. याचा सरावही सरासरी रोज केला जातो. या पथकाकडे "वज्र' हे चिलखती वाहन आहे. या वाहनाचा वापर आजच्या घटनेमध्ये करता आला असता, असेही मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मात्र, स्वारगेटच्या घटनेची माहिती "क्यूआरटी'ला केव्हा दिली गेली आणि हे दल तेथे केव्हा पोचले, याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र, या पथकातील काहींच्या म्हणण्यानुसार आजच्या एसटीचालकाला ताब्यात घेतल्यानंतर हे पथक तेथे पोचले. ही परिस्थिती असेल तर या दलाचा योग्य वापर होतो की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एक एसटीचालक एवढा घातपात करू शकतो. त्याऐवजी दहशतवादी किंवा इतर काही अनुचित प्रकार करणारे असते, तर आणखी किती बळी गेले असते. मग अशा तातडीच्या प्रसंगात "क्यूआरटी'चा वापर कसा होणार, असेही या निमित्ताने विचारले जात आहे.
या पथकातील जवान वय वर्षे तीसपर्यंतचे असतात. त्यांना दीडपट वेतन दिले जाते. त्यांचा रोज कसून सराव केला जातो. मॉल, विविध कार्यालये, आयटी कंपन्या या ठिकाणी बॉंब ठेवला आहे किंवा तेथे काही अनुचित प्रकार घडला आहे, असे सांगून या पथकाला कार्यान्वित केले जाते. या दलाच्या जवानांनी शस्त्रे "लोड' करून ठेवावीत, ड्यूटीवर असताना बूट काढून ठेवू नयेत, अशा बारीकसारीक सूचना दिलेल्या असतात. बूट घालण्यासाठीचा वेळही वाया जाऊ नये, असे त्यामागचे गृहीतक आहे. हे दल मॉक ड्रीलच्या प्रसंगी वेळेत पोचते की नाही, याचा अहवाल खुद्द पोलिस आयुक्तांकडे जातो. प्रसंगी "नो एंट्री' मोडत सात ते दहा मिनिटांत हे दल पोचत नसेल तर संबंधितांची कानउघाडणीही केली जाते. मात्र, हे सारे सरावाच्या पातळीवरच घडते. प्रत्यक्षातील घटनांत या दलाचा वापर केला जात नसल्याचे आजच्या प्रसंगावरून दिसून येते.
"क्यूआरटी' काय करू शकले असते?
1) या दलाकडे चिलखती वाहन आहे. हे वाहन एसटीपुढे नेता आले असते.
2) हे दल वेगवान हालचालींसाठी तयार केले आहे. इतर कर्मचाऱ्यांपेक्षा ते वेगाने पोचू शकले असते.
3) या दलातील जवानांचा नेमबाजीचा सराव नेहमीच असतो. त्यांनी प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेतला असता.
4) या दलाकडे वाहने सुस्थितीत आहेत. ती वेगाने धावू शकतात.
5) प्रशिक्षित जवान असल्याने निर्णयक्षमताही विकसित झालेली असते. अशा प्रसंगी काय करायचे, हे ते ठरवू शकतात.