चोरटा जेव्हा एसटी बस पळवितो....
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 02:30 AM (IST)
सोलापूरजवळची घटना - अपघातात चोरट्याचा मृत्यू
तारीख 27 जुलै 2009. वार रविवार.. स्थळ सोलापूर बसस्थानक... रात्री अकराची वेळ. थांबलेली बस अचानक चालू होते. टपावर झोपलेले चालक-वाहक जागे होतात. काही कळायच्या आत बस स्थानकातून बाहेर पडते. टपावरील चालक-वाहक चोर-चोर म्हणून रस्त्याने आरडाओरड करतात. रात्रीची वेळ असल्याचे नागरिकांचे दुर्लक्ष होते. बस तशीच भरधाव वेगाने तुळजापूर रस्त्याच्या दिशेने जाते. टपावरील दोघे जण जीव मुठीत धरून निपचित बसलेले. काही वेळाने बस ट्रकवर आदळते. टपावरील चालक-वाहक खाली कोसळतात. बस पळविणाऱ्याचा जागीच मृत्यू होतो. हा थरार सोलापुरातही घडला होता. मात्र त्या घटनेत त्या चोरट्याचा मृत्यू झाला होता. बस वाहक विजय कारभारी महापुरे (वय 35, रा. बेसळ, खुलताबाद, औरंगाबाद), बसचालक राजेंद्र भटा भटगुजर (वय 39, रा. धुळे) हे दोघेही जखमी झाले होते. भटगुजर आणि महापुरे हे औरंगाबाद बस डेपोत कार्यरत होते. ते कन्नड-सोलापूर बस (एमएच 20 डी 8799) घेऊन सोलापुरात आले होते. मध्यरात्री हीच बस घेऊन चोरटा निघाला. मात्र उळे येथे अपघातात तो मृत्युमुखी पडला.