पुणे, पिंपरी पालिकेत कलमाडी करणार "डिझास्टर मॅनेजमेन्ट'
गोविंद घोळवे - सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 02:00 AM (IST)
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचारामधून कॉंग्रेस पक्षाने खासदार कलमाडींना किनारा केला असला, तरी त्यांच्या समर्थकांची संख्या सर्वांत जास्त असल्यामुळे कलमाडींच्या प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होण्याबाबत कॉंग्रेसने ठोस भूमिका घेतलेली नाही. पक्षाने कलमाडी यांना थेट निवडणुकीत सहभागी होण्यासाठी किनारा केला असला, तरी त्यांनी व्यक्तिगतरीत्या कोणाचा प्रचार करायचा अथवा नाही, याबाबत त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे कलमाडी समर्थकांना आता पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पुणे शहराच्या राजकारणात खासदार सुरेश कलमाडी येणार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विरुद्ध खा. कलमाडी असा राजकीय सामना पुन्हा रंगणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आज श्री. ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडून एकप्रकारे अप्रत्यक्षरीत्या खा. कलमाडी यांनी आपल्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी त्यांच्यापरीने प्रयत्न करावेत, असा संदेश दिला.
पक्षाने खा. कलमाडी यांना निलंबित केले असले, तरी ते पुणे शहराचे खासदार आहेत. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याने जर उद्या त्यांना प्रचाराला बोलविले तर जायचे का नाही, याबाबतचा निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. आम्ही पक्ष म्हणून प्रचाराला जा, असे त्यांना सांगणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
पुणे शहरासह अनेक ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस आपला प्रमुख विरोधक पक्ष असणार आहे. राष्ट्रवादीने आमच्यापेक्षा जास्त जागा आणायचा प्रयत्न केला तरी शेवटी जनता खूप हुशार आहे, असा प्रयत्न त्यांनी मागील विधानसभा, लोकसभा आणि आता नगरपरिषदेलादेखील केला आहे. शेवटी एक जागा आम्ही पुढे आहोत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवडणूक जिंकण्याचे सर्व राजकीय डावपेच खा. कलमाडी यांना अवगत असल्यामुळे प्रदेश कॉंग्रेस पक्षाने चांगला चेहरा म्हणून वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे नेतृत्व सोपविले असले, तरी खरे राजकीय "डायरेक्टर' कलमाडीच असणार आहेत.
खासदार कलमाडीदेखील जवळपास आपल्या 80 ते 90 समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावत आहेत; तसेच निवडणुकीतील बारकावे त्यांना अवगत असल्यामुळे कॉंग्रेस पक्ष कलमाडी यांचा राजकीय वापर मोठ्या प्रमाणावर करून घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खासदार कलमाडी यांना पालिका निवडणुकीतील अनेक क्लृप्त्या माहीत आहेत. त्यामुळे नेमके निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बाहेर आल्यामुळे शहर कॉंग्रेसची संभाव्य पडझड रोखू शकतील, अशी चर्चा आहे. म्हणूनच पक्षाने त्यांच्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.