Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

धामधुमीआधीच 40 लाखांचा खर्च
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 01:00 AM (IST)
पुणे - उमेदवारी मिळणार की नाही हे अद्याप निश्‍चित नसले, तरी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अनेक इच्छुकांनी स्वतःला "प्रोजेक्‍ट' करण्यासाठी आणि मतदारांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने आतापर्यंत सरासरी 35 ते 40 लाख रुपये खर्च केला आहे. हा खर्च करण्यात उपनगरांतील इच्छुकांची संख्या मोठी आहे. व्यक्‍तिगत प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि पैशाच्या जोरावर राजकारण करता येते, यातून हा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे.

निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा आणण्यासाठी अनेक बंधने आणली. त्यातून खर्चावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या. पण आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच जास्तीत जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. पुण्यात दसरा-दिवाळीपासूनच इच्छुकांनी खर्चाला प्रारंभ केला आहे. यात सर्वाधिक खर्च विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि यात्रांवर झाला आहे. यंदा सर्वच उमेदवारांनी उच्चभ्रू सोसायट्यांपासून झोपडपट्ट्यांपर्यंत विविध निमित्ते काढून सर्व प्रकारच्या वाटपावर अधिक भर दिला.

आतापर्यंत "मराठी बाणा', "ऑर्केस्ट्रा' आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर प्रत्येक इच्छुकाने सुमारे 5 लाखांपासून 25 लाखांपर्यंत खर्च केला आहे. साड्या, भांडी, मिक्‍सर आदी वस्तूंच्या वाटपासाठी 5 ते 8 लाख रुपये खर्च केले आहेत. स्वतःचे परिचय पत्रक, कार्य अहवाल, पत्रके यांची छपाई व वाटपावर 5 ते 7 लाख रुपये, निवडणूक सर्वेक्षणासाठी 3 ते 4 लाख रुपये, तीर्थक्षेत्रांच्या यात्रांवर 8 ते 10 लाख, कार्यकर्त्यांच्या जेवणावळी, गाड्या, नेत्यांची बडदास्त यावर 3 ते 4 लाख रुपये, पक्षाचे आतापर्यंत झालेले मेळावे, उमेदवारी अर्ज भरताना केलेले शक्‍तिप्रदर्शन यावर 3 ते 4 लाख, लकी ड्रॉसाठी 5 ते 10 लाख रुपये असा सरासरी खर्च सुमारे 35 ते 40 लाखांवर गेला आहे. वडगाव शेरी, कात्रज, औंध, वारजे-माळवाडी आदी परिसरात काही उमेदवारांनी आतापर्यंत दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंत खर्च केल्याची चर्चा आहे.

""आपण निवडणुकीसाठी चार "सीआर' (कोटी), पाच "सीआर' बाजूला काढून ठेवले आहेत. त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी द्या,'' असा आग्रह अनेक इच्छुकांनी धरला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा प्रत्येक उमेदवाराचा खर्च कोटीच्या घरात जाणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांना चार लाखांची खर्चाची मर्यादा ठेवली आहे. आयोगाच्या या अव्यवहार्य रकमेमुळे अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या खर्चाचे प्रमाण वाढत असल्याचे एका इच्छुक उमेदवाराने सांगितले.

उपनगरांमध्ये जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या भागात राहणाऱ्यांच्या हाती अल्पावधीत कोट्यवधी रुपये आले असून, या पैशातून नगरसेवक होऊन प्रतिष्ठा मिळविणे हाही अनेकांचा निवडणूक लढविण्यामागील हेतू आहे. आपल्या विविध व्यवसायांस राजकारण पोषक आहे. त्यामुळे काही जण निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: