Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

होय, आमचा पुनर्जन्मच झाला!
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 02:45 AM (IST)
एसटी चालकाचा थरार पाहणाऱ्यांच्या प्रतिक्रिया
वारजे माळवाडी - माथेफिरूने एसटी पळविली. ती सारसबाग सिग्नल ते मित्रमंडळ चौकात विरुद्ध बाजूने आल्यानंतर जो थरार उडाला तो अनुभवणारे रोहिदास कांबळे व पार्वती गुलाबराव काळे यांनी, "होय, आमचा पुनर्जन्म झाला हो' असे "सकाळ'शी बोलताना सांगितले.

कांबळे व काळे हे कोथरूड-एरंडवणा येथील मोरे श्रमिक वसाहतीमध्ये राहतात. ते दोघेही धनकवडी येथील भारती हॉस्पिटलमध्ये काम करतात. या घटनेबद्दल सांगताना रोहिदास कांबळे म्हणाले, ""मी काळे मावशींना दुचाकीवरून घेऊन सारसबाग येथील सिग्नल सुटल्यावर उजव्या बाजूने मित्रमंडळ चौकाकडे जात होतो. थंडीमुळे आमच्या गाडीचा वेग जास्त नव्हता. कालव्यावरील पूल ओलांडून पुढे आलो तर, मित्रमंडळ चौकाकडे जाताना आमच्या लेनमध्ये समोरून एक एसटी नागमोडी वळणे घेत येत होती. त्यामुळे मी दुचाकी पाटील प्लाझाच्या बाजूला वळविली. काही सेकंदात ती एसटी आमच्या समोरून निघून गेली. बाजूला होऊन आम्ही पाहिले तर एसटीने एका ऍक्‍टिव्हा चालकास धडक दिली, तर एसटीच्या पुढील बम्परमध्ये एक राखाडी- मेहंदी रंगाची पल्सर गाडी अडकली होती. ती एसटीबरोबरच फरफटत सारसबागेच्या दिशेने गेली. असे भयानक दृश्‍य मी प्रथमच पाहत होतो. आमचा मृत्यूच आमच्याकडे येत असल्याचे आम्हाला दिसत होते. परंतु, आम्ही वाचलो. ही घटना पाहिल्यामुळे माझे पाय काही वेळ लटपटत होते. काही वेळाने आम्ही मित्रमंडळ चौकात एक मुलगा तडफडत असताना पाहिल्यावर पोटात गोळा आला.''

पार्वती काळे म्हणाल्या, ""आम्ही दोघे दुचाकीवरून जात असताना समोरून एसटी आली. तशी रोहिदासने बाजूला गाडी वळविली. एका मुलाला उडविलेले पाहून पोटात गोळा आला होता. परमेश्‍वर व लेकी- बाळाच्या कृपेने आम्ही वाचलो. होय, आमचा पुनर्जन्म झाला.'' 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: