महापालिकेची निवडणूक लढविणार नाही - मठकरी
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 01:45 AM (IST)
पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी घेतला आहे. त्यामुळे ते कोणत्या प्रभागातून रिंगणात येणार, याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
मठकरी यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी ही घोषणा केली. मठकरी म्हणाले, ""पक्षाने शहराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. त्यामुळे महायुतीला सत्तेत आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे निवडणुकीस उभे राहून एका प्रभागात अडकून पडण्यापेक्षा 76 प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना बळ देणे आणि त्यांना निवडून आणणे माझे कर्तव्य समजतो. मी निवडणूक लढविणार नसल्याचे प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही स्पष्ट केले आहे.''
आरक्षणामुळे मठकरी यांना वॉर्ड राहिला नव्हता. त्यामुळे ते कोणत्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत उत्सुकता होती. 1997 आणि 2002 ची निवडणूक त्यांनी ज्या भागातून लढविली होती, त्याच वॉर्डाचा मोठा भाग प्रभाग क्र 50 मध्ये आला होता. त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर ते याच प्रभागातून येतील, अशी दाट शक्यता होती, ती आता मावळली आहे. एकीकडे पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी नातेवाईक आणि मुलांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरत असताना दुसरीकडे मठकरी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ते अडचणीत आले आहेत. "एक व्यक्ती एक पद' या पक्षाच्या धोरणानुसार मठकरी यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.